विश्वात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले, केवळ स्वप्नं पाहतात आणि दुसरे, प्रत्येक स्वप्न सत्यात उतरवण्याचा ठाम निर्धार करतात. एका मनुष्यानं स्वप्न पाहिलं, की मी या जगाला चंद्राची सफर घडवेन. पण लोकांनी त्याची टर उडवली. तरीही एक दिवस असा उजाडला, जेव्हा चंद्रावर जाण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं. एका मनुष्यानं देशाला जातिपातीच्या बंधनांतून, भेदभावातून मुक्त करण्याचं आणि अन्यायरहित समाज निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं. पण हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच लोक त्याला पाठिंबा देण्यासाठी तयार झाले. तरीही त्याचं स्वप्न साकार झालं. ‘प्रत्येेक घरात असा संगणक असायला हवा, जो इंटरनेटशी जोडलेला असेल’, कोणाच्या तरी मनात हा नवविचार रुंजी घालत होता. अर्थात, कित्येकांना ही केवळ एक कविकल्पना वाटली. पण काही वर्षांनी घराघरात इंटरनेटशी जोडलेला संगणक दिसू लागला. न्यूटननेही एक असंच स्वप्न पाहिलं होतं. अंधारात हरवलेल्या जगाला प्रकाशात न्हाऊ घालण्यासाठी बल्बचा शोध लावण्याचं स्वप्न… खरंतर हजारो प्रयोग करूनही त्याला यश मिळत नव्हतं. पण न्यूटन स्वतःच्या निर्णयावर ठाम होते आणि काय आश्चर्य! एक दिवस हा शोध पूर्णत्वास पोहोचला. अखिल विश्व प्रकाशानं उजळलं. अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्येक घरात पोहोचायला हवं, हे स्वप्न साकारण्याचा एका मनुष्यानं निर्णय घेतला. परिणामी, आज प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन दिसताहेत. स्वामी विवेकानंदांसारख्या युवकानं मोहमायेचा त्याग करून सत्यमार्गावर वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच अनेक युवकांना अध्यात्ममार्गावर चालण्याची प्रेरणा लाभत आहे.
तुमच्याही आयुष्यात नेमकं हेच तर घडतंय. तुम्ही काही स्वप्नं पाहता. पण ती वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न करता का? नाही ना! म्हणूनच घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहण्याची कला शिकणं आवश्यक आहे.
आजच्या युवापिढीने तर हा विषय सविस्तरपणे समजून घ्यायला हवा. कारण युवाजीवनात काही टप्पे असे येतात, जेव्हा ठाम निर्णय घ्यावा लागतो. मग तो करिअरचा असो, अभ्यासाचा असो, योग्य संगत निवडण्याचा असो किंवा आपला जीवनसाथी निवडण्याचा असो… मोबाइलसारख्या गॅझेट्समध्ये हरवण्याचा असो वा शिस्तबद्ध आयुष्य जगण्याचा असो… आजच्या युवापिढीला क्षणोक्षणी काही निर्णय घ्यावे लागतात. पण केवळ ‘लोक काय म्हणतील’ या अनाठायी भीतीमुळे युवक-युवती त्यांच्या निर्णयांवर ठाम राहू शकत नाहीत. यासाठीच खाली देण्यात आलेल्या चार पावलांवर मार्गक्रमण करा. कारण ही पावलं तुमच्या जीवनाची दिशा बदलतील-
पहिलं पाऊल- ‘लोक काय म्हणतील’ या भीतीतून मुक्ती
बरं झालं, भारताच्या शोधार्थ बाहेर पडलेल्या कोलंबसनं लोकांच्या टिकाटिप्पणीकडे दुर्लक्ष केलं. त्यानं जर लोकांच्या मतांना अतिमहत्त्व दिलं असतं, तर आज अमेरिकेचा शोध लागला असता का? एकेकाळी लुप्त असणारी अमेरिका केवळ कोलंबसमुळे आज सर्वपरिचित आहे.
‘आकाशात भरारी मारण्याच्या गोष्टी करू नकोस. तू तुझ्या कामाचं बघ! अरे, केवळ पक्षीच उडू शकतात…’ विमानाचा शोध लावणार्या राइट बंधूंचीही अनेकांनी अशीच टर उडवली होती. पण राइट बंधुंनी मात्र कोणालाच दाद दिली नाही. ते शोधकार्यात मग्न झाले आणि विमानाचा शोध लावण्याचा मान अखेर त्यांनाच लाभला. नंतर लोकांनीच त्यांच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवला.
आजवर या विश्वात तेच लोक महान निर्मिती करू शकले, जे स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी लोकांच्या टिकेकडे दुर्लक्ष केलं. मग तुम्हालाही स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहायचं असेल, तर या प्रश्नांवर मनन करा-
‘लोक काय म्हणतील’ ही भीती मला कधी सतावते?
‘लोक काय म्हणतील’ हा विचार करून मी आजवर कोणती नवीन पावलं उचलण्यात टाळाटाळ केली आहे?
या प्रश्नांवर सखोल मनन-चिंतन करताच एक रहस्य तुमच्यासमोर उलगडेल. ते म्हणजे- ‘लोक काय म्हणतील’, या अनाठायी भीतीपोटी मी कित्येक वेळा नवीन पाऊल उचललंच नाही. याच कारणास्तव मनुष्य ‘अखंड जीवना’चा अनुभव घेऊ शकत नाही. कारण त्याला खूप काही करण्याची इच्छा असते, पण लोकांच्या भीतीपोटी तो योग्य कृती करू शकत नाही. म्हणूनच या भयातून मुक्त होण्याचा आजच संकल्प करा. बहुतांश विद्यार्थी योग्य करिअर निवडू शकत नाहीत. कारण त्यांच्या मनात ‘माझे मित्र काय म्हणतील, आई-बाबा काय विचार करतील, शिक्षकांना माझ्याबद्दल काय वाटेल’ ही भीती ठाण मांडून बसलेली असते. खरंतर त्यांना स्वतःच्या क्षमतांची, गुणवैशिष्ट्यांची, कलेची पूर्णतः जाणीव असते. पण लोकांच्या टिकेची भीती त्यांना योग्य निर्णय घेण्यापासून परावृत्त करते. तुम्हाला जेव्हा अशी भीती वाटू लागेल, तेव्हा वर उल्लेख केलेल्या महान व्यक्तींकडे पाहा. केवळ त्यांनाच तुमचा प्रेरणास्रोत बनवा.
दुसरं पाऊल- तुमच्या जीवनाचे सिद्धान्त बनवा
एखादा मनुष्य जेव्हा त्याच्या जीवनाचे सिद्धान्त (तत्त्वं, प्रिन्सिपल्स) ठरवतो आणि त्यानुसारच जीवन जगण्याचा निश्चय करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यातील 99 टक्के निर्णय आपोआप होतात. पण बहुतांश लोकांनी त्यांच्या जीवनाचे सिद्धान्तच ठरवलेले नसतात. परिणामी, त्यांच्या आयुष्यात वारंवार संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते. ‘मी अमुक काम करू की नको… माझ्या डिपार्टमेंटमध्ये सगळेच लाच घेतात, मग मी घेऊ की नको… मला तर या मार्गाने गेल्यावर सुखसोयींनी युक्त आयुष्य जगता येईल, मग मी सत्यमार्गावर वाटचाल करू की नको…’ तुमचीही अशी द्विधा मनःस्थिती होत असेल, तर याचाच अर्थ तुम्ही तुमच्या जीवनाचे सिद्धान्त बनवलेले नाहीत.
सिद्धान्त म्हणजे जीवनाचे नियम, तत्त्वं, ज्याआधारे तुम्ही संपूर्ण आयुष्य व्यतीत करणार आहात. जसं- कपट न करणं, नेहमी सत्य बोलणं, स्वतःशी, कुटुंबीयांशी आणि आपल्या गुरूंशी प्रामाणिक असणं, इतरांसोबत स्वतःची तुलना न करणं, सर्वांप्रति मंगलभावना बाळगणं इत्यादी.
अनेक लोक त्यांचं करिअर निवडताना केवळ पद-प्रतिष्ठा, पैसा आणि पॉवर याच गोष्टींचा विचार करतात. पण याआधारे घेतलेला निर्णय केवळ दुःखालाच आमंत्रित करतो. तुम्ही निर्णय घेताना जर आनंद, सर्जनशीलता, आत्मसमाधान, निःस्वार्थ भावना या गोष्टींना प्राधान्य दिलंत, तरच तुम्ही योग्य कार्यक्षेत्र निवडू शकाल.
लक्षात घ्या- तुम्ही आतापर्यंत जे करत आलात, तेच पुढेही करत राहिलात, तर तुम्हाला नवीन गोष्टी कशा बरं प्राप्त होतील? तेव्हा नाविन्यपूर्ण विचार करा, नवीन निर्णय घ्या, पण सिद्धान्तांच्या, तत्त्वांच्या आधारेच!
तिसरं पाऊल- केवळ बुद्धीचं नव्हे, हृदयाचंही ऐका
नियती मनुष्याला सर्वोच्च मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच उत्सुक असते. जेणेकरून त्यानं योग्य तोच निर्णय घ्यावा. पण या प्रक्रियेतील मुख्य अडथळा म्हणजे ‘मनुष्याची बुद्धी’ होय. ‘निर्णय घेताना बुद्धीचा वापरच करायचा नाही’, असं मुळीच नाही. किंबहुना बुद्धी आणि हृदय या दोन्हींचा समन्वय साधायला हवा. काही लोक बुद्धीला म्हणजेच तर्काला अतिमहत्त्व देऊन फसतात. खरंतर हृदयापासून घेतलेल्या निर्णयामुळे तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि दृढता अशा गुणांचा ओघ सुरू होतो. कारण हृदयाशी संबंधित असणारी महत्त्वाची बाब म्हणजे ‘भावना’ होय. बर्याचदा तुमच्या सहज मनात निर्माण होणारे भाव तुम्हाला योग्य मार्ग दाखवत असतात. मात्र अशा मार्गांवर चालण्याचं साहस करायला हवं. लक्षात घ्या, इतिहास केवळ त्याच महान व्यक्तींची दखल घेतो, जे नव्या वाटा धुंडाळतात. समजा, एखादा निर्णय घेताना तुमचं हृदय ‘तू आता बुद्धीचा कौल घे’ असं सांगेल, तेव्हा नक्कीच तर्काच्या कसोटीवर तुमचा निर्णय तपासून घ्या. पण ‘हृदय’ आणि ‘बुद्धी’ यात संतुलन साधणं खूपच महत्त्वपूर्ण आहे.
चौथं पाऊल- स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वतःच घ्या
स्वतःच्या अपयशाचं खापर इतरांवर फोडणं, ही मनुष्याची सर्वांत मोठी दुर्बलता आहे. याच कारणास्तव अनेक युवक निर्णय घेताना कचरतात. कारण त्यांना त्या निर्णयासोबत ‘सक्सेस गॅरंटी’ हवी असते. अनेक लोक चुकीच्या निर्णयासाठी आई-वडील, मित्र किंवा परिस्थिती यांना जबाबदार ठरवतात. पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, की मी काल घेतलेल्या निर्णयांमुळे वर्तमानाला आकार मिळतो आणि आज घेतलेल्या निर्णयांमुळे माझं भविष्य सावरतं. थोडक्यात, स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घ्या. यश कधीच गॅरंटी-वॉरंटीसोबत येत नाही. आत्मविश्वास, दृढता आणि जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती हीच यशप्राप्तीची खात्री असते. काही निर्णय घेणं खूपच कठीण असतं. अशा
वेळी लोकांच्या टिकेला सामोरं जाण्याची, एकाकी पडण्याची, इतरांनी उडवलेली खिल्ली सहन करण्याची, न्यूनगंडानं पछाडण्याची भीती सतावत असते. मग मनुष्याला अशा कठीणप्राय अनुभवांना सामोरं जाणं म्हणजे जोखीम पत्करल्यासारखं वाटतं. पण यशस्वी होण्यासाठी तुम्हाला ही जोखीम पत्करावीच लागेल. योग्य निर्णय घेऊन त्याची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.
या चार पावलांवर वाटचाल करून तुम्ही निर्णय घेण्याच्या कलेत तरबेज व्हाल. शिवाय, घेतलेल्या निर्णयावर ठामही राहू शकाल. योग्य निर्णय घेण्याची कला केवळ भौतिक यशप्राप्तीचं नव्हे, तर आध्यात्मिक उन्नतीचं देखील रहस्य आहे. आयुष्यात केवळ एक निर्णय असा असतो, जो घेतल्याने तुमचे इतर सर्व निर्णय अचूक होऊ शकतात. तो म्हणजे, स्वतःला जाणण्याचा, सत्यमार्गावर वाटचाल करण्याचा निर्णय! आध्यात्मिक समज प्राप्त करून घेतलेला प्रत्येक निर्णय प्रेम, आनंद, शांती, समृद्धी, संतुष्टी आणि पूर्णता या गोष्टींसाठी कारण ठरतो.
तुमचा प्रत्येक निर्णय सर्वोच्च चेतनेसह, सजगतेसह व्हावा, हीच शुभेच्छा… हॅपी थॉट्स!

One comment
Gopalkrishna Wandhare
Great knowledge, it will help everyone to get the dreams true.