This post is also available in: English Hindi
आपल्या भारत देशात अनेक धर्म आणि संस्कृती गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना दिसतात. असा देश जगात विरळाच! अनेक रीतीभाती, सणवार असलेला आपला देश अनोखा मानला जातोे. प्रत्येक आनंदाचा प्रसंग, सण किंवा राष्ट्रीय उत्सवाच्या रूपात साजरा करण्याची आपल्या देशाची प्राचीन परंपरा आहे. वर्षभराचे बारा ही महिने कोणत्या न कोणत्या सणाच्या रूपात, उत्सवाच्या रूपात साजरा करण्याची आपली प्राचीन गौरवपूर्ण परंपरा, आपल्या देशाची संस्कृती सभ्यतेची ओळख दर्शवते. प्रत्येक आनंदाचा प्रसंग, सुख शांतीचे प्रतीक या उत्सवाच्या स्वरूपात आपण साजरा करतो. शिवाय ही परंपरा अनादिकाळापासून प्रचलित आहे. आपले सर्व सण सार्थक आणि शास्त्रीय दृष्टीने परिपूर्ण आहेत.
आपल्या प्रत्येक सणामागे एक गहन अर्थ दडलेला आहे. आपल्या देशातील प्रत्येक सण कोणत्या तरी गोष्टीचे प्रतीक आहे. ज्या महान ज्ञानी व्यक्तींना सत्याचा साक्षात्कार झाला, त्यांनीच हे प्रतीकात्मक सण साजरे करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी जी अनुभूती अनुभवली ती शब्दातीत होती, म्हणूनच प्रत्येक युगात त्याला विभिन्न सणांचे आणि उत्सवाचे रूप दिले गेले.
हे सारे सण उत्सव त्याच सत्याच्या साक्षात्काराचे प्रतीक आहेत, ज्यांना सेल्फ, चैतन्य, आत्मसाक्षात्कार, समाधी, तेज सत्य इ. नावांनी संबोधले जाते. तेज सत्य कालातीत आहे. ते पूर्वीही होते, आताही आहे आणि पुढेही राहील.
आपण जे सणवार साजरे करतो, त्या मागे गहन अर्थ दडलेला आहे, मग तो दिवाळी-दसरा असो, होळी, संक्रांत, शिवरात्र अथवा नवरात्र असो वा रक्षाबंधन. जर त्या मागचा सखोल अर्थ लक्षात घेतला तर अंधश्रद्धा, भय, व्यर्थ धारणा दूर होऊ शकतील. जेव्हा आपण हे लक्षात घेतो, की सर्व पूजाअर्चा सणवार हे केवळ प्रतीक आहेत, तेव्हा आश्चर्यचकित होतो. जर सणवारामागील खरा अर्थ लक्षात घेतला, तर दीपावलीची पूजा का करतो? गणपती विसर्जन म्हणजे नेमके कशाचे विसर्जन आहे? महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करताना शिव आपल्या अंतरातच विराजमान आहे, हे गहिरे सत्य लक्षात येईल.
शिवरात्रीच्या निमित्ताने शिवलिंग (ज्योतिर्लिंग) प्रकट झाले, याचाच अर्थ आकार आणि निराकार एकच आहेत. साकार आहे म्हणून त्याला एक आकार आहे, निराकार आहे म्हणून त्याला नाक, डोळे किंवा मानवी मुखाचा आकार नाही.
शिवाचे बाह्यरूप आंतरिक गुण दर्शवते. शंकराचे तिसरे नेत्र, जटांमधील चंद्र, गंगा व नीलकंठ हे सर्व केवळ संकेत आहेत, प्रतीक आहेत. त्यांच्या मदतीने मानवाची आंतरिकस्थिती दर्शविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गंगा हे ज्ञानाचे रूप आहे, जे दर्शविते की अंतरात कोणते ज्ञान आहे. समजरूपी नेत्र सांगतो, जीवनातील प्रत्येक घटनेकडे तिसर्या नेत्राने पाहायला शिका. हा ईश्वरीय गुण आहे. ईश्वर प्रत्येकाकडे एकाच दृष्टीने पाहतो. जर तुम्ही कोणाकडे पाहत असाल तर स्वतःला विचारा, मी काय पाहत आहे? तिसर्या नेत्राने पाहिलं तर सारे दुःख विलीन होतील. सांसारिक नेत्रांनी जगाकडे पाहाल तर दुःखच निर्माण होईल.
सांसारिक दृष्टीने पाहणे म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्या समोरून गेली आणि तिने तुमच्याकडे पाहिले नाही तर तुमच्या मनात विचार येतो, बहुधा त्या व्यक्तीला मी आवडत नाही. त्याचे माझ्यावर प्रेम नसावे, त्याने माझ्याकडे लक्षच दिले नव्हते. असे विचार मनात येणे म्हणजे त्या तुच्छ घटनेकडे तुम्ही सांसारिक दृष्टीने पाहत आहात. पति-पत्नी, भाऊ-बहीण, मित्र परस्परांकडे अशाच दृष्टीने पाहतात. लोकांना सतत असे वाटत राहते, माझ्याकडे कोणाचे लक्ष नाही, कोणाचेही प्रेम नाही. ही सांसारिक दृष्टी झाली. या विपरीत तुमचा तिसरा नेत्र उघडला तर तुमच्या मनात विचार येईल, तुमचे स्वतःवर तरी प्रेम आहे का? तुम्ही जर स्वतःकडे लक्ष दिले असते तर कधीच आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला असता. तुम्ही जे आहात त्याच्याकडे तुमचे लक्ष आहे का? जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते, त्याचे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष असते. तो खाण्याचा अतिरेक कधीही करत नाही. जर तुम्ही मनन केले तर अशा अनेक व्यक्ती तुम्हाला दिसतील, ज्यांची तक्रार असते माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही. त्या आधी तुमचे स्वतः वर किती प्रेम आहे, हे पडताळून पाहा. जर तुमचे स्वतःवर प्रेम नसेल तर इतरांकडून आशा करणे व्यर्थ आहे. आधी स्वतःवर प्रेम करायला शिका.
व्यक्ती जेव्हा तिसर्या नेत्राने समजून उमजून प्रत्येक घटनेकडे पाहू लागते, तेव्हा त्याचे त्याला आश्चर्य वाटते. हेच येथे सांगायचे आहे. तिसरा नेत्र उघडणे म्हणजे ऑपरेशन करून नवा डोळा बसवणे असा नाही. ही तर मूर्तिकारांची कृपा आहे, ज्यांनी तिसरा नेत्र असलेल्या मूर्ती तयार केल्या. त्यांचे देवावर प्रेम होते म्हणून विचित्र दिसले तरी त्यांनी त्रिनेत्र असलेल्या मूर्ती घडविल्या.
मूर्तिकारांचा उद्देश्य खरंतर लोककल्याणाचा होता. लोकांचे मंगल व्हावे, मंगलमूर्तीची निर्मिती व्हावी, ही त्यांची मनापासून इच्छा होती. लोकांनी त्या मूर्ती पाहून काही बोध घ्यावा. शंकराच्या डोक्यावर चंद्र म्हणजे डोके शांत, शीतल, पवित्र असायला हवे, ज्यात सात्विक विचार असायला हवेत.
शिवाने कंठात विष रोखून धरलेे. कारण मनुष्याच्या कंठातून सतत ‘मी-मी’चा जप निघत होता. तेव्हा शिवाने संकेत दिला, तुमच्या शरीरात विष, नकारात्मक विचार कुठे असायला हवेत. ते हृदयाप्रत (तेजस्थानाप्रत) पोहोचता कामा नये आणि ते लोकांपर्यंत पोहोचू देऊ नयेत. काही लोक राग गिळतात आणि मग त्यांंना हार्टअटॅक येतो तर काही लोक आपल्या क्रोधाचा दुसर्यांवर वर्षाव करतात. त्यांच्या क्रोधाने त्रस्त होऊन लोकांना हार्टअटॅक येतो. अशा प्रकारे लोक एक तर स्वतःला अटॅक देतात किंवा इतरांना. जीवन कसे जगावे हे लोकांना ठाऊक नाही. केवळ शिवाचीच मूर्ती नव्हे तर प्रत्येक मूर्ती हेच दर्शवत असते, की जीवन कसे जगायला हवे. प्रत्येक मूर्तित हे रहस्य दडलेले आहे.
शंकराचा डमरूदेखील एक संकेत देत असतो. डमरू आठ नंबरच्या आकाराचा असतो. तो आतील व बाहेरील संकेत देत असतो. शिवलिंगही अंर्तबाह्य संकेत देत असतो. आतील हिस्सा लोक समजू शकत नाही. म्हणून आतील व बाहेरील जीवनाची स्थिती संतुलित हवी. तुम्ही डमरू वाजविता म्हणजे संतुलित आहात. आठ आकड्याच्यामधे हृदय, (तेजस्थान) सूक्ष्मस्थान असते. त्याच्या आत व बाहेर जाणे सोपे असते. हेच ट्रेनिंग व टीचिंग आहे. स्वतःला संतुलित ठेवा, हेच ते सांगत असते. स्रोतावर राहून डमरू वाजवायला हवा अन्यथा लोकांचा आठ संतुलित होत नाही. आठ अंकातील काही लोकांचा वरील शून्याचा भाग मोठा असतो तर खालील भाग लहान. संन्यासी व्यक्तींचा शून्याचा खालील भाग मोठा व वरील भाग लहान असतो. अर्थात आठचे दोन्ही भाग समतोल नसतात. या विपरीत तेजसंसारी व्यक्तीचे दोन्ही शून्य सम असतात. अर्थात संसारातून पलायन करायचे नाही व त्यात अडकूनही बसायचे नाही. संसारात राहून विरक्त राहायचे.
शिव त्रिशूल तीन गोष्टींचे संकेत देतो. श्रवण, सेवा व भक्ती. प्राचीन युगात त्रिशूल तीन संकेत देत असे. कर्म, ज्ञान व भक्ति. दोन्हीचा अर्थ एकच आहे. त्रिशूलाच्या तीन संकेतांच्या साहाय्याने आपल्या तुलनात्मक मनाला संतुलित करायला हवे. डमरूच्या दोन्ही शून्यांना एकसाथ वाजवायचे आहे. आता तुम्हाला समजले असेल, की त्रिशूल काय संकेत देतो. डमरू काही संकेत देत आहे. प्रत्येक वस्तु काहीतरी सांगत आहे. नंदीला मंदिराबाहेर बसवून त्याचे तोंड देवाकडे ठेवले आहे. याचा अर्थ, तुलनात्मक मनाचे तोंड नेहमी देवाकडे असावे, संसाराकडे नसावे, तर ईश्वराकडे, शिवाकडे असावे. अन्यथा तो लाल वस्त्रे पाहून क्रोधित होतच राहील.
अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या प्रसंगी शिवाच्या प्रतिमेचे मनन करावे. शरीर केवळ शव आहे, जे जीवित आहे ते शिव आहे. मनुष्य आपल्या शरीरालाच शिव समजून जगतो. शिव म्हणजे आंतरिक अवस्था. जेव्हा आपण ‘मी कोण आहे?’असे ध्यान करतो, स्वानुभवाकडे जातो, तेव्हा आपण शिवाकडे वाटचाल करतो.
शिवाप्रमाणे आपणही मृत्यूवर विजय मिळवू या. साधना करून मनाला वश करू या. आपण खरे शिवभक्त होऊ या. आपण जर मनःशुद्धिचे महत्त्व जाणले, तर तीच खरी शिवपूजा, शिवभक्ती ठरेल. जसं, शिव गंगा (ज्ञान) सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी निमित्त बनूू या. आपल्या अहंकाराला कंठापर्यंतच सीमित राहू देऊ या. जगाला अमृत देऊ या. मात्र हे त्यालाच शक्य आहे, ज्याला समजलंय शिवशक्तीचे रहस्य!
…सरश्री
Add comment