This post is also available in: English Hindi
आधी आत्मबळ वाढवा, मगच इतर संकल्प करा:
नववर्षासाठी सरश्रीं द्वारा संदेश…
आपल्यापैकी बहुतेकजण नव्या वर्षात काही संकल्प करत असतात. उत्तम स्वास्थ्यासाठी, आर्थिक प्रगतीसाठी आपण अनेक नवनवे संकल्प करतो. पण यांपैकी बहुतांशी संकल्प फार काळ टिकू शकत नाहीत. यावरील उपाय म्हणजे ‘आत्मबळ प्रदान करणाऱ्या प्रतिज्ञा करणं’. त्यासाठी नवीन वर्षात खालीलप्रमाणे चार प्रतिज्ञा करा. या मौल्यवान प्रतिज्ञांचा सकारात्मक परिणाम तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर दिसून येईल. मग तुम्ही संतुलित जीवनाचा नक्कीच आनंद घ्याल.
पहिली प्रतिज्ञा- मानसिक स्वास्थ्यप्राप्ती: आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य तेव्हाच प्राप्त करता येईल, जेव्हा आपलं मन आणि शरीर स्वस्थ, निरामय असेल. बहुतेकजण शारीरिक आजारांतून मुक्त होण्यासाठी खूप प्रयत्न करतात. पण मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यायला मात्र ते विसरतात. मानसिक स्वास्थ्य प्राप्त करणं म्हणजे मनाला खोलवर झालेल्या जखमा, दुःखद आठवणी आणि मनावर पडलेले नकारात्मक ठसे नष्ट करणं होय. या गोष्टी ‘क्षमासाधने’ ने सहजशक्य होतात. तेव्हा यावर्षी एक प्रतिज्ञा करा, ‘मला जेव्हा चिडचिड, भय, क्रोध यांसारख्या नकारात्मक भावना त्रस्त करतील, तेव्हा मी त्वरित क्षमा मागून अशा भावना विलीन करेन.’ अशा भावना जागृत होताच त्यांना तुमच्या ध्यानक्षेत्रात (awareness) आमंत्रित करा आणि क्षमायाचना करून त्यांतून मुक्त व्हा. प्रतिज्ञा करा, ‘मी दररोज स्वतःची क्षमा मागून, स्वतःला सर्व प्रकारच्या कर्मबंधनांतून मुक्त करेन.’ यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात प्रामुख्याने कोणत्या भावना तुमच्या मनात निर्माण झाल्या होत्या, याचं अवलोकन करा. जसं, संताप, असहाय्यता, भीती, अपराधबोध इत्यादी. अशा नकारात्मक भावनांमुळे निर्माण झालेल्या कर्मबंधनांसाठी क्षमा मागून त्यांपासून मुक्त व्हा. अशी क्षमासाधना करताना म्हणा, ‘जाऊ दे… जाऊ दे… हे मना, कोणत्याच गोष्टीशी आसक्त होऊ नकोस… मी स्वतःला प्रत्येक बंधनातून मुक्त करतोय… माझ्या अंतर्मनानं ज्या नकारात्मक गोष्टींना घट्ट धरून ठेवलंय, त्या मी ईश्वराला अर्पण करतोय आणि क्षमा मागून त्यांतून मुक्त होतोय… भूतकाळात माझ्याकडून जे काही घडलं, ते माझ्या समजेनुसार आणि त्यावेळच्या परिस्थितीनुसार योग्यच होतं. आता मात्र तो भूतकाळ आहे. जाऊ दे! मी स्वतःला क्षमा करतो. मी स्वतःवर प्रेम करतो.’
नव्या वर्षामध्ये आपल्या मनाला वचन द्या, ‘मी मानसिक स्वास्थ्य नक्कीच प्राप्त करणार आहे.’
दुसरी प्रतिज्ञा – भविष्याची वर्तमानाशी सांगड घाला: आपलं भविष्य हे वर्तमानातील क्रियांवर अवलंबून असतं. आपण आजवर साचेबद्ध पद्धतीने जे करत आलोय तेच जर वर्तमानातही करत राहिलो, तर आपलं भविष्य कसं बरं बदलेल? मग आपलं भविष्य लवचीक न बनता, ते कठोर आणि संकुचित होईल. आता मनन करा, नव्या वर्षात आपल्याला कशा प्रकारचं भविष्य हवंय? भविष्याला ईश्वराच्या दिव्य योजनेनुसार योग्य आकार देण्यासाठी ‘मी आज कोणतं योग्य पाऊल उचलायला हवं’ यावर मनन करा. एका नेत्यानं स्वतःच्या अनुयायांसाठी किंवा एका सीइओनं कंपनीच्या खऱ्या विकासासाठी सर्वप्रथम याच गोष्टीचा विचार करायला हवा. तो म्हणजे, ‘उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीसाठी मी आज कोणत्या प्रकारचं कार्य करायला हवं?’ अशा प्रकारे, वर्तमानाची उज्ज्वल भविष्याशी सांगड घालता येईल. मनुष्यानं ध्यान करताना जर भविष्याविषयी विचार केला, तर त्याला वर्तमानात काय बदल करायला हवेत याविषयी कर्मसंकेत (इंट्युशन) मिळतील. मग असे कर्मसंकेत तुम्हाला हृदयापासून जाणवतील.ज्या लोकांना असे कर्मसंकेत मिळत नसतील त्यांनी पुढे दिलेला प्रयोग करायला हवा- तुम्हाला माहीत असलेला ध्यानविधी करा. त्यानंतर तुमचं मन एकदम शांत आणि स्थिर होईल. कारण मौनामध्ये सर्व विचार विलीन झालेले असतात. आता अशा शांतचित्त अवस्थेत स्वतःला एक प्रश्न विचारा, ‘मला माझं भविष्यातील जीवन कशा प्रकारचं हवंय?’ या प्रयोगामुळे तुम्हाला भविष्यातील जीवनाची सुस्पष्ट कल्पना येऊ लागेल. तुम्ही हा प्रयोग जितक्या वेळा कराल, तितकं तुमच्या नजरेसमोर उज्ज्वल भविष्याचं चित्र स्पष्ट होऊ लागेल. दररोज काही मिनिटांसाठी का असेना, हा प्रयोग अवश्य करा. जेणेकरून भविष्यात डोकावणं तुमच्यासाठी एकदम सहज, सरळ आणि सोपं होईल.
नव्या वर्षामध्ये आपल्या भविष्याला वचन द्या, ‘मी भविष्य काळातून साद घालणारे कर्मसंकेत नक्कीच ग्रहण करणार आहे.’
तिसरी प्रतिज्ञा – मुखवटे दूर करा: कल्पना करा, एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या चेहऱ्यावर एक मुखवटा धारण केलाय आणि त्या मुखवट्यावर तिनं सोळा शृंगारही केले आहेत… आपण अशा व्यक्तीकडे पाहिल्यावर नक्कीच हसत म्हणाल, ‘या मनुष्यानं मुखवट्यावर किती मेक-अप केलाय ना! खरंतर त्यानं त्याच्या चेहऱ्यावर मेक-अप करायला हवा, मुखवट्यावर नाही.’ पण नेमकी हीच चूक आपण सर्वजण स्वतःच्या भावनांबाबत करत असतो. समजा, तुम्ही क्रोधित झाला आहात. मग अशा वेळी तुम्ही तुमचा राग इतरांवर थोपवता. कारण त्यावेळी रागापासून सुटका मिळवण्याचा तुम्हाला हाच सहजमार्ग वाटतो. पण अशा प्रकारे, स्वतःच्या भावना इतरांवर थोपवणं म्हणजेच मुखवट्यावर शृृंगार करण्यासारखंच आहे. यासाठी तुमच्या क्रोधामागे असणारं खरं कारण (तुमचा खरा चेहरा) शोधण्याचा प्रयत्न करा. कदाचित क्रोधाच्या मुखवट्यामागे तुमची भीती किंवा असहाय्यता दडलेली असेल. प्रस्तुत उदाहरणात ‘भीती’ हा तुमचा खरा चेहरा असून, त्यावर चढवलेला मुखवटा म्हणजे ‘तुम्ही केलेला क्रोध’ होय. तसंच त्या मुखवट्यावर केलेला शृंगार म्हणजे तुम्ही इतरांवर केलेली आगपाखड आणि त्यासाठी दिलेलं सबळ कारण! इथे केवळ राग आणि भीती या भावनांचं प्रतिकात्मक उदाहरण देण्यात आलंय. पण तुम्ही या उदाहरणाशी तुमच्या सर्व प्रकारच्या भावना पडताळून पाहू शकता. स्वतःच्या भावनांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. ती म्हणजे, तुम्ही इतरांवर व्यक्त करत असलेला क्रोध म्हणजे कदाचित ‘लोक काय म्हणतील?’ ही भीती असू शकते. पण भावनांचं अशा प्रकारे दमन करण्याऐवजी, मनात निर्माण झालेल्या भावना ओळखा. त्यांचा स्वीकार करून जगायला शिका. जेणेकरून तुम्ही तुमच्या खऱ्या चेहऱ्यावर मुखवटा धारण करण्याऐवजी स्वतःसोबत प्रामाणिक राहाल. स्वतःचा मुखवटा ओळखण्याचा तुम्ही जितका जास्त अभ्यास कराल, तितकी तुमची समज अधिक प्रगल्भ होत जाईल. अशा प्रकारे, तुम्ही देत असलेल्या प्रतिक्रियांमागे नेमके कोणते विचार, भावना दडल्या आहेत, यावर सखोल मनन करा आणि स्वतःचा मुखवटा दूर करा. शिवाय, स्वतःच्या भावना समर्थपणे हाताळण्याची जबाबदारीही स्वीकारा. परिणामी, तुम्ही तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांचा दोष इतरांवर थोपवणं बंद कराल. लक्षात घ्या, एखादी भावना नेमक्या कोणत्या कारणामुळे मनात निर्माण झाली, यावर मनन करणं, हीच आध्यात्मिक विकासाची गुरुकिल्ली आहे. शिवाय ही पद्धत अतिशय व्यावहारिक आणि उपयुक्त आहे. अशा प्रकारे, मनातील नकारात्मक भावनांचं दर्शन घडताच क्षमा मागा आणि त्यांतून त्वरित मुक्त व्हा.
नव्या वर्षामध्ये स्वतःला वचन द्या, ‘मी नकली मुखवट्यांमागे माझा खरा चेहरा मुळीच लपवणार नाही.’
चौथी प्रतिज्ञा- पृथ्वीवर येण्याचा उद्देश सार्थ करा: आपल्या पृथ्वीवरील जीवनाचा एक विशिष्ट उद्देश असतो. नियती आपल्याला एक विशिष्ट बोध देऊ इच्छिते. त्यासाठीच आपल्या जीवनात काही घटनांची पुनरावृत्ती होत असते. अशा घटना आपल्या जीवनात तोपर्यंत घडत राहतात, जोपर्यंत आपण त्यातून योग्य ती समज (बोध) प्राप्त करत नाही. प्रत्येक मनुष्यात काही चुकीच्या वृत्ती, धारणा आणि सवयी असतात. अशा चुकीच्या गोष्टींतून आपण मुक्त व्हावं, ही नियतीची इच्छा असते. यासाठीच ती विविध घटनांच्या माध्यमातून आपल्याला बोध देत असते. समजा, ‘शरीर प्रशिक्षित करणं’, हा एखाद्या मनुष्यासाठी महत्त्वाचा बोध असू शकतो. आता या मनुष्याच्या जीवनात अशा काही घटनांची तोपर्यंत पुनरावृत्ती होत राहते, जोपर्यंत तो स्वतःच्या शरीराला प्रशिक्षण देत नाही.अशा प्रकारे, मनुष्याला काही ‘बोध’ आत्मसात करायचे आहेत, तर काही ‘महाबोध’ही शिकायचे आहेत. विचार करा, ‘अशी कोणती घटना आहे, जी माझ्या जीवनात वारंवार घडतेय? अशी कोणती वृत्ती (वाईट सवय) आहे, जी वारंवार उफाळून येते?’ मनन-चिंतन केल्यावर अशी एक विशिष्ट सवय (वृत्ती) तुमच्यासमोर येईल. याचाच अर्थ, या वृत्तीतून मुक्त होणं हा तुमच्यासाठी ‘महाबोध’ आहे. खरंतर ‘महाबोध’ प्राप्त करणं, हाच आपल्या पृथ्वीवरील जीवनाचा मूळ उद्देश आहे. समजा, तुमचा महाबोध असेल,’परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाणं’, तर तुमच्यासमोर अशा घटना वारंवार येतील, ज्यात तुम्ही पलायन करण्याचा प्रयत्न कराल. समजा, ‘स्वज्ञान प्राप्त करणं’ हा जर तुमचा महाबोध असेल, तर तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतील, ज्यामुळे तुमचा अहंकार दुखावला जाईल. काहीजणांना ‘साहस’ किंवा “योग्य प्रकारे संवाद साधण्याची कला’ हा महाबोध आत्मसात करायचा असतो. काही लोकांचा महाबोध असतो, ‘धैर्यवान बनणं’ तर काहीजणांसाठी “आत्मनिर्भरता’ हा महाबोध असतो. दररोज काही वेळ ‘मी या पृथ्वीवर कोणता महाबोध प्राप्त करण्यासाठी आलोय?’ यावर मनन-चिंतन करा. सातत्यपूर्वक मनन केल्यावर “मी कोणता महाबोध आत्मसात करायला हवा’, हे तुमच्या लक्षात येईल. मग त्यानुसार तुमच्या जीवनात काही बदल अवश्य करा. कारण जेव्हा तुम्ही तुमचा ‘महाबोध’ आत्मसात करता, तेव्हाच तुम्हाला खरी संतुष्टी जाणवते.
नववर्षात पृथ्वीमातेला वचन द्या, ‘मी या पृथ्वीवर जो महाबोध आत्मसात करण्यासाठी आलोय, तो नक्कीच आत्मसात करणार आहे.’
या चार प्रतिज्ञांद्वारे तुमचंं आत्मबळ वाढवा. मग या आधारे, तुमच्या प्रतिज्ञा सहजतया पूर्ण होऊ लागतील. 2016 या नवीन वर्षात या चार प्रतिज्ञांद्वारे तुम्ही अध्यात्माची नवीन उंची गाठावी, याच शुभेच्छा!
… सरश्री
Sishree is the founder of Tejgyan Global Foundation. For more information about the foundation and its retreats, visit tejgyan.org
Add comment