This post is also available in: English Hindi
सर्वप्रथम तुमच्या तोंडात तूप-साखर! यात्रेकरूचा प्रवास यशस्वी व्हावा म्हणून प्रवासाला निघताना त्याला तूप साखर खाऊ घालतात हे तुम्हाला ठाऊक आहे.त्याप्रमाणेच जीभेने जग जिंकणे हा सुद्धा एक प्रवासच आहे. तो यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सुरुवातीलाच तूप साखर खाऊ दिली जाते. तूप साखर तुमच्या जिभेत गोडवा आणि शक्ती असल्याची आठवणसुद्धा करून देते. तिच्या साहाय्याने तुम्ही जग जिंकू शकता. अर्थात माणसाची जीभ ही ब्रम्हांडाची सारी रहस्य उलगडण्याचं महाद्वार आहे, मात्र तिचा उपयोग उत्कृष्टपणे व्हायला हवा.
कदाचित जीभेच्या या शक्तीवर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र थोडं थांबा आणि विचार करा, खरोखर जीभ म्हणजे काय आहे? तर जीभ जादू आहे. यावर कोणी म्हणेल, की जीभ जर खरोखरच जादू आहे तर मला तिचे चमत्कार का दिसत नाहीत? चला या प्रश्नाचे उत्तर एका उदाहरणाद्वारे शोधण्याचा प्रयत्न करू या.
बालपणी मुलांना अनेकदा एका राजकुमाराची गोष्ट सांगितली जाते. त्या गोष्टीत मुलाजवळ जादूचा घोडा असतो. घोड्यावर बसून तो उंच आकाशात झेप घेतो आणि क्षणार्धात इच्छित स्थळी पोहोचतो. अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील परंतु इच्छित स्थळी पोहोचल्यावर घोड्याला खाली कसं आणावं हे राजकुमाराला ठाऊक आहे की नाही? असा विचार तुम्हाला कधी आला आहे का?
तात्पर्य, केवळ हवेत उडणारा घोडा प्राप्त करणं पुरेसं नसून त्याला हवेतून खाली आणण्याची कला सुद्धा अवगत असायला हवी. अन्यथा त्या राजकुमाराला किती संकटांना तोंड द्यावं लागू शकतं, याची कल्पनाच न केलेली बरी.
बरेच लोक या पद्धतीनं विचार करू शकत नाहीत. त्यांना वाटतं , माझ्याजवळ असा घोडा असता तर मलाही त्वरित माझं ध्येय गाठता आलं असतं ! वास्तविक तुम्ही सुद्धा ही जादू तुमच्या सोबत घेऊन फिरत आहात आणि ती आहे तुमची जीभ! एवढेच की तुम्ही तिचा योग्य पद्धतीने पुरेपूर उपयोग करू शकत नाही. त्यासाठी या ठिकाणी काही प्रश्न विचारले आहेत. उदाहरणार्थ,
* माझ्यावर कोणत्या शब्दांचा परिणाम होतो?
* मी संवादासाठी कोणत्या शब्दांचा उपयोग करतो?
* माझ्या शब्दांमुळे इतर लोक खूश होतात की दुःखी?
* शब्दांच्या नकारात्मक परिणामातून मुक्त होण्यासाठी मी काही ठोस पावलं उचलू शकतो का?
* माझी जीभ स्वार्थापोटी खोटं बोलते किंवा नाटक करते का?
* मी माझ्या जिभेची ताकद अनुभवली आहे का? * जिभेद्वारे जग जिंकण्याचा प्रवास सुरू करण्यासाठी मला कोणत्या कार्याची सुरुवात करावी लागेल?
या प्रश्नांवर मनन केल्यामुळे जीभेच्या शक्तीचे वेगवेगळे आयाम तुमच्या समोर येतील. ‘जिभेत जादू आहे’ या गोष्टीवर तुमच्या मनाने विश्वास ठेवला तरच तिच्या शक्तीचा योग्य पद्धतीने ते उपयोग करू शकेल. आवश्यकता आहे फक्त तुमच्या जिभेसाठी शब्द- स्वाद लक्ष्य ठरवण्याची. त्यासाठी स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेणे आवश्यक आहे.
आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? माझा अमुक नातेवाईक माझ्याशी नेहमी कडवटपणे बोलतो, ‘माझा द्वेष करतो, माझा जोडीदार नेहमी माझ्याशी भांडत राहतो, अशावेळी कुणी कसं बरं आनंदी राहू शकेल?’
तुमच्या मनात असे काही नकारात्मक विचार येणे स्वाभाविक आहे, पण त्यामुळे तुम्ही दुःखी राहता. लक्षात ठेवा, असा विचार करून तुम्ही तुमच्या आनंदाची जबाबदारी इतरांवर सोपवत असता. मात्र आता स्वतःच्या आनंदाची जबाबदारी स्वतः घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिभेबरोबरच जीवनाचाही स्वाद वाढणार आहे. माझ्या आनंदाची जबाबदारी मीच कसा घेऊ या विचाराने कदाचित तुम्ही संभ्रमित झाला असाल. हे कसं शक्य आहे? विश्वास ठेवा ; ‘शब्द- स्वाद लक्ष्य’ बाळगून जिभेद्वारे जग जिंकणं पूर्णतः शक्य आहे.
जिभेचे खरे लक्ष्य
यासाठी स्वतःमध्ये लहानसा बदल करा. जिभेचा उपयोग करताना जेव्हा तुम्ही उत्साही असाल तेव्हा उदासीन व्हा आणि जेव्हा उदासीन असाल तेव्हा उत्साही व्हा. तात्पर्य; तुमच्या जिभेला शब्दांसाठी गोड आणि स्वादाच्याबाबतीत उदासीन राहण्याचे लक्ष्य द्या. यालाच म्हणतात ‘शब्द – स्वाद लक्ष्य’. हे अमलात आणून तुमच्या जीवनात जिभेची जादू प्रकट व्हायला लागेल. लोक बर्याचदा स्वादासाठी एवढे उत्साही असतात, की जणू ते केवळ खाण्यासाठीच जगतात. जगण्यासाठी खायचं आहे, खाण्यासाठी जगायचं नाही हे विसरूनच जातात. तसेच काही लोक आपल्या शब्दांच्या बाबतीत एवढे उदासीन असतात, की जिभेचा चुकीचा वापर करून त्यांची शक्ती वाया घालवतात.
या दोन्ही अतिरेकांपासून वाचून आपल्या शब्दांच्या बाबतीत सजगता आणि स्वादाबाबत उदासीनता बाळगा. सुरुवातीला हे अवघड वाटत असलं तरीही मनन सुरू ठेवून तुमच्या ध्येयावर ठाम राहा. सखोलपणे विचार करा, माझ्या जीवनात कोणते शब्द प्रभावी ठरतात? माझ्या जीवनावर कोणत्या शब्दांचा प्रभाव पडतो? तुमच्या विचारांचं निरीक्षण केलं तर अनेकदा लोक नकळत दुसर्यांवर स्वतःचे शब्द लादतात हे तुमच्या लक्षात येईल. तसेच इतरांच्या शब्दांमुळे स्वतःही प्रभावित होतात. एखादा शक्तिशाली मनुष्य केवळ नकारात्मक शब्दांच्या प्रभावाने दुर्बल जीवन जगू शकतो. असा मनुष्य इंद्रियांचा गुलाम होऊन दुःखाची गाणी गात आयुष्य घालवतो आणि शब्द – स्वाद लक्ष्यापासून वंचित राहतो. अजून एका उदाहरणाद्वारे हे समजून घेऊ या.
एका जमातीचे लोक शत्रूशी लढण्यासाठी वेगळ्या प्रकारचं हत्यार वापरत असत. त्यांच्याकडे एक लांब पाईप असायचा. त्याच्या टोकावर विषात बुडवलेली सुई ठेवली जायची. त्यांना जेव्हा एखाद्याला ठार मारायचं असेल तेव्हा ते त्या पाईपात जोरात फुंकर मारायचे. त्यामुळे त्या सुईने समोरची व्यक्ती ठार होत असे. या प्रयोगात सर्वांत महत्त्वाची गोष्ट होती, त्यांच्या जिभेची ताकद (तोंडाची ताकद) यामुळेच समोरची व्यक्ती ठार होऊ शकत होती.
माणसाच्या बाबतीतही हीच गोष्ट लागू होते. त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दांमुळे एखाद्याला जीव गमवावा लागू शकतो, म्हणूनच त्याने प्रत्येक वेळी तपासावं की त्याची जीभ कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, याचं अवलोकन करावं. उदाहरणार्थ, एखादा तुम्हाला म्हणाला, की आज तुम्ही आजारी दिसत आहात तर थोड्याच वेळात तुम्हाला तब्येत बरी नसल्याचे जाणवू लागेल. अर्थात जेव्हा तुमचं मन आजार हा शब्द स्वीकारतो तेव्हाच हे शक्य आहे, सांगण्याचं तात्पर्य हे की जिभेच्या बरोबरच तुमच्या कानांना ही प्रशिक्षित करायला हवं. त्यांच्याद्वारे कोणते शब्द अंतर्मनापर्यंत पोहोचतात त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. अनवधानाने एखादा शब्द जरी तुमच्या मनाने स्वीकारला तर त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो म्हणूनच बोलतांना संभाषणात आणि ऐकतांना योग्य शब्दाची निवड करा.
दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला आठवण द्या, की तुमच्या जिभेत असलेली शक्ती घेऊनच आज तुम्ही दिवसभर वावरणार आहात. शब्दांची निवड करून लोकांच्या चेतनेचा स्तर वाढवावा की घटवावा हे तुमच्या निवड करण्यावर अवलंबून आहे. बर्याचदा एखादा मनुष्य त्याच्या मनात उठलेले नकारात्मक विचार इतरांवर लादत असतो. या शब्दांमुळे दुसरा दुखावला जाईल यावरही त्याचं लक्ष नसतं. त्याला जे बोलायचं असेल ते बोलून तो मोकळा होतो. मात्र शब्द स्वाद लक्षात ठेवून आपल्या शब्दांच्या योग्य उपयोगाकडे ध्यान द्यायला शिकायला हवं. या प्रयोगामुळे सर्व आनंदित होतील. जीभेची शक्ती एवढी वाढवा की सकारात्मक शब्दांचा उपयोग हा तुमचा स्वभावच बनेल. शिवाय तुमच्या आजूबाजूच्या सर्व लोकांना आनंदी ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
कोणत्याही माणसाचं व्यक्तिमत्त्व त्याच्या बोलण्यावर अवलंबून असतं उदाहरणार्थ गोड बोलणार्या व्यक्तीचे नातेसंबंध चांगले राहतात तर कडवट बोलणार्या लोकांच्या नातेसंबंधात कडवटपणा येतो. जिभेच्या योग्य उपयोगाने सफल, आनंदी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगणं शक्य आहे. याउलट अप्रशिक्षित जीभ अपयश, दुःख आणि आजारांना निमंत्रण देते, अर्थातच जिभेच्या साहाय्याने मनुष्य आपलं जीवन सुधारू शकतो किंवा बिघडवू शकतो, म्हणूनच ‘शब्द- स्वाद लक्ष्य’ ठरवून आपल्या जिभेचा उत्तम उपयोग करा आणि आपल्या जीवनाचे नवनिर्माते व्हा!
One comment
Sanjay
Dhanyawad