This post is also available in: English Hindi
एका गावात एक संत होते. गावातले लोक त्यांच्याकडे नेहमीच काही लोकांच्या तक्रारी घेऊन यायचे. कारण त्यांच्यामुळे ते अतिशय त्रस्त झाले होते. त्या संताला ते म्हणत, “बाबाजी, असा काही जादूटोणा करा, ज्यामुळे आमच्या शत्रूंचं नुकसान व्हावं.” त्यावर संत म्हणाले, “ज्या ज्या लोकांविषयी तुम्हाला तक्रार आहे, त्यांच्या नावाने एक एक बटाटा घेऊन या.” आता हे संत आपल्या शत्रूंवर काहीतरी जादूटोणा करतील, या अपेक्षेने लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मग दुसर्याच दिवशी गावातील लोक पिशव्या भरभरून बटाटे घेऊन आल्याचं त्या संताच्या दृष्टीस पडलं. ते पाहून संत म्हणाले, “आता हे बटाटे एक महिनाभर चोवीस तास आपल्यासोबत ठेवा.” असेच काही दिवस गेले. पण 10-12 दिवसांनी ते बटाटे सडून त्यातून दुर्गंधी येऊ लागली. विसाव्या दिवशी तो वास असह्य झाल्याने गावातील लोक संताला विनंती करू लागले, “कृपया ते बटाटे फेकण्याची आम्हाला आज्ञा द्यावी.” त्यावर संत म्हणाले, “बटाट्याची दुर्गंधी तुम्ही 20 दिवसदेखील सहन करू शकला नाहीत. मग मनात साठवून ठेवलेल्या नकारात्मक भावना आयुष्यभर कशा बरं सांभाळून ठेवत आहात?” हे ऐकताच गावकर्यांना जाणीव झाली, ‘खरोखरंच नकारात्मक भावनांमध्ये अडकून आपण आपलं आयुष्य उगाचच व्यर्थ दवडत होतो.’
ही गोष्ट माणसाच्या आंतरिक अवस्थेबद्दल संकेत देते. अनेक वेळा माणूस आपल्या भावनांवर ताबा ठेवू शकत नाही. परिणामी तो द्वेष, भय, चिंता, क्रोध, तणाव यांसारख्या नकारात्मक भावनांमध्ये अडकतो. या नकारात्मक भावनांत अडकून तो आपल्याच पायांवर कुर्हाड मारून घेतो. अशा वेळी काय करावं, तर बहुतांश लोक जे दोन उपाय वापरतात ते मुळीच वापरु नयेत. ते दोन उपाय म्हणजे –
पहिली पद्धत – दुसर्यांवर राग काढणं:
भावनांना विलीन करण्यासाठी, त्यांचा निचरा करण्यासाठी पहिली पद्धत असते, स्वतःचा संताप इतरांवर काढणं! ही पद्धत खूपच धोकादायक आहे. आपल्या भावना दुसर्यांवर थोपवल्यामुळे माणूस कर्मबंधनात अडकतो. इतरांचा द्वेष करणं, ईर्ष्या करणं, राग करणं यांसारख्या गोष्टींमुळे मनुष्य पश्चात्तापाच्या अग्निमध्ये होरपळून जातो. क्रोधाची सुरुवात कोणत्याही गोष्टीनं झालेली असो, त्याचा शेवट नेहमी पश्चात्ताप आणि ग्लानितच होतो. ज्या व्यक्तीवर आपण आपल्या नकारात्मक भावना थोपवतो, ती आपल्याला प्रत्युत्तर देण्याची संधी शोधत राहते. मग हे दुष्टचक्र चालूच राहतं. राग व्यक्त केल्यावर माणसाला थोड्या वेळासाठी बरं वाटतं खरं, पण ही भावनांवर ताबा ठेवण्याची योग्य पद्धत नक्कीच नाही.
तुम्ही उसाचा रस काढण्याचं मशीन बघितलं आहे का? त्या मशीनमध्ये ऊस टाकल्यावर, ऊसाचा गोडवा पहिल्यांदा मशीनला चाखायला मिळतो, मग इतरांना. पण त्याच मशीनमध्ये जर दगड टाकले तर? आधी नुकसान त्या मशीनचंच होणार ना? आपलं शरीर त्या मशीनसारखंच आहे. दगड म्हणजे नकारात्मक भावना. थोडक्यात सर्वप्रथम नुकसान आपल्या शरीराचंच होणार आहे. एखाद्याला आपण शिवी दिली तर त्याचा नकारात्मक परिणाम समोरच्या व्यक्तीवर होईल, न होईल; पण शिवी देणार्यावर आधी होईल हे निश्चित!
दुसरी पद्धत – भावनांचं दमन करणं
या दुसर्या पद्धतीत माणूस आपल्या भावना दाबून टाकतो. तो वरवर इतरांना दाखवतो, ‘बघा मी किती खंबीर आहे.’ पण आतून मात्र तो आक्रसत जातो. या दाबून ठेवलेल्या भावनांचा जेव्हा स्फोट होतो, तेव्हा मनुष्य आरडाओरडा, आदळआपट करतो. धरतीच्या पोटात जसा ज्वालामुखी दबून असतो तसंच हे आहे. धरतीची सहनशक्ती संपुष्टात आल्यावर, ज्वालामुखीचा स्फोट होतो.
काही माणसांच्या भावना ऋतूप्रमाणं बदलत जातात. ऋतुनुसार त्यांच्या भावना उचंबळून येतात. बर्याच लोकांना उन्हाळ्याच्या दिवसांत परीक्षेची आठवण येते आणि ते अस्वस्थ होतात. पण या भावना त्यांना योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाहीत. भावनांचे येणारे कढ ते आतल्या आत दाबून टाकतात. परिणामी या दबलेल्या भावना, निरनिराळ्या आजारांच्या रुपानं व्यक्त होऊ लागतात.
तात्पर्य, भावना व्यक्त करण्याच्या या दोन पद्धतींपासून सावध राहा. नकारात्मक भावनांतून मुक्त होत आनंदाच्या शिखरावर पोहोचायचं असेल, तर मुक्तीची पाच पावलं जाणून घ्या –
1) शुभचिंतकांचा सल्ला घेणं:
या पावलावर माणूस आपल्या शुभचिंतक लोकांशी बोलतो. हे शुभचिंतक कोणीही असू शकतात – तुमचा मित्र, नातेवाईक किंवा समुपदेशक. त्यांच्याशी बोलल्यानंतर मनुष्याला हलकं-फुलकं वाटू लागतं. दुःखद भावना विश्वासार्ह माणसासोबत वाटून घेतल्याने त्याचा ताण कमी होतो. बर्याचदा असं दिसून येतं, की फक्त बोलल्यानंसुद्धा माणसाच्या अनेक नकारात्मक भावनांचा निचरा होऊन जातो. ऐकणारा शुभचिंतक (मित्र, नातेवाईक किंवा समुपदेशक) मोकळेपणाने बोलून, मनात किंतु न ठेवता त्याला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. विकासमार्गावर चालताना सुरुवातीला तुम्ही हे पाऊल उचलू शकता; पण लक्षात ठेवा, हा अंतिम उपाय नव्हे.
2) भावनांना सामोरं जाणं:
काही लोक बुद्धीचा वापर करून भावनांना सामोरं जातात. एखाद्याला जर भीतीची भावना सतावत असेल तर तो आव्हान समजून त्या भावनेशी लढतो. तिला निपटून काढतो. एखादा माणून चिंतातूर अवस्थेत स्वतःला पुढचे प्रश्न विचारुन चिंतेला सामोरं जातो-
प्रश्न – ज्या वस्तूंबद्दल, घटनांबद्दल, गोष्टींबद्दल आजपर्यंत मी चिंता करत होतो, त्या सगळ्या प्रत्यक्षात आल्यात का?
उत्तर – नाही. पण त्यातल्या काही गोष्टी, घटना मी विचार केल्याप्रमाणं घडल्या आहेत.
प्रश्न – ज्या घटना घडल्या, त्या माझ्या कल्पनेइतक्याच भयानक होत्या का?
उत्तर – नाही. सगळ्याच घटना काही तेवढ्या भयानक नव्हत्या, पण काही मात्र खरोखरच भयावह होत्या.
प्रश्न – ज्या काही एक दोन घटना घडल्या, त्यांच्याशी मी दोन हात केले. केले की नाही?
उत्तर – खरंच, जवळजवळ सर्व घटनांना मी सामोरा गेलो, त्यांच्याशी लढलो आणि जिंकलोसुद्धा!
या पद्धतीनं माणूस आपली तर्कशक्ती वापरून भावनांना सामोरा जातो. पण भावनांवर नियंत्रण आणण्यासाठी अजून एक उच्च पद्धत आहे. ती म्हणज, भावनांना साक्षीभावानं जाणणं.
3) भावनांना साक्षीभावानं जाणणं:
भावनांना काबूत ठेवण्याचा सर्वांत परिणामकारक मार्ग म्हणजे, आपल्या भावनांना साक्षीभावानं जाणणं. भावना या समुद्रात येणार्या वादळांसारख्याच असतात. काही वेळानं वादळ शांत होतं. पण ‘वादळ येणं’ आणि ‘वादळ शांत होणं’ या दोन्ही घटनांच्या मधला वेळ आपण कसा पार करतो, हे जास्त महत्त्वाचं आहे. खरंतर हीच वेळ असते, जागृतीची! आपल्या भावनांना जाणून, त्या योग्य शब्दांत अभिव्यक्त करणं म्हणजेच सफलतेचं शिखर गाठणं.
4) सकारात्मक शब्दांत भावना व्यक्त करा:
घडणारी कोणतीही घटना वाईट नसते. ती तेव्हाच वाईट ठरते, जेव्हा आपण तिला नकारात्मक शब्द देतो. आपण घटनेकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो, तेव्हा आपण त्या घटनेचं वर्णनही नकारात्मक करतो. जसं, मला खूप भीती वाटू लागली होती, मला असुरक्षित वाटू लागलं होतं, मला धक्का बसला, मी वैतागलो होतो, मी घुसमटून गेलो होतो, मी वैतागून-त्रासून गेलो, मी निराशेने ग्रस्त झालो होतो, मला प्रचंड राग आला होता, मी काळजीत होतो, माझी मनःस्थिती खूप अशांत, अस्वस्थ झाली होती…
अशा प्रकारे आपण आपल्या प्रत्येक भावनेला वेगवेगळ्या शब्दांचे रंग देतो. पण नवल हे आहे, की तुम्ही त्या भावनेला जे शब्द जोडले ते सगळे नकारात्मकच का? असुरक्षितता, भीती याऐवजी आपण आपल्या भावनांना सकारात्मक शब्द दिले तर नकारात्मक शब्द त्रास द्यायचं बंद करतील. आपल्याला असुरक्षित वाटत असेल तर खबरदारी घेणं आवश्यक आहे. पण भीती वाटते, असुरक्षित वाटतं, असं म्हणून आपण निराशेच्या गर्तेत का जातो? आपल्या मनातील भावनांना शब्दरूप द्यायचं असेल तेव्हा थोडं थांबा, थोडा शांतपणे विचार करा आणि स्वतःच्या मनाला विचारा, ‘या भावनेचं वर्णन करताना मी कोणता शब्द वापरू?’
आपल्या मनातील भावनेसाठी ‘त्रास’ हा शब्द वापरताच त्रासाला प्रारंभ होतो. ‘त्रास’ शब्दाऐवजी आपण जर असा विचार केला, की जो प्रसंग आला आहे, जी घटना घडत आहे, त्यावर इलाज आहे, तो प्रसंग पार करता येईल. त्या प्रसंगातून काही समज, बोध प्राप्त होईल. हा प्रसंग माझ्यासमोर केवळ एक आव्हान म्हणून आला आहे. त्यात माझा कस लागणार आहे, ही घटना यश देण्यासाठी परीक्षा म्हणून समोर आली आहे. असा विचार करताच त्या घटनेचा अजिबात त्रास होणार नाही. उलट ती आनंदाचं कारण ठरेल.
5) प्रत्येक घटनेची किंमत ठरवा:
तुम्ही बाजारात काडेपेटी खरेदी करायला गेलात आणि त्या वेळी जर दुकानदारानं एका काडेपेटीची किंमत तुम्हाला दहा रुपये सांगितली, तर तुम्ही दहा रुपये देऊन ती काडेपेटी विकत घ्याल का? तुम्ही कदापि असं करणार नाही. कारण तुम्हाला माहीत आहे, की तो दुकानदार काडेपेटीचे जास्त पैसे मागत आहे. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात घडणार्या एका घटनेची किंमत किती असू शकते? एखादी घटना जेवढी काळजी करण्यासारखी असेल तेवढेच तुम्ही बेचैन होऊ शकता, त्यापेक्षा अधिक नाही. परंतु एखाद्या छोट्या घटनेमुळेदेखील आपण अस्वस्थ होत असाल तर याचाच अर्थ त्या घटनेला तुम्ही नको तेवढी किंमत देत आहात. समजा, एखाद्या नातेवाईकानं तुमच्या माघारी तुमची निंदा केली. तुम्हाला ही बातमी समजताच तुम्ही त्याच्यावर नाराज होता, पण तुम्ही हे जाणण्याचा प्रयत्न करता का, की या बातमीत कितपत तथ्य आहे?
खरंतर आपल्याला हे माहीत नसतं की समोरची व्यक्ती स्वतःच्या भावना काबूत ठेवू शकत नाही. अशा व्यक्तीकडूनच अपेक्षा करून आपण अपेक्षाभंगाचं दुःख भोगत राहतो. लक्षात घ्या, त्या माणसाचं जीवनलक्ष्य तुमच्या ध्येयापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. म्हणूनच आपल्याला स्वतःच्या भावना नीट जाणून घेऊन योग्य प्रतिसाद द्यायचा आहे.
दुःखद, नकारात्मक भावनांतून मुक्त होण्याची ही पाच पावलं आपल्याला अनेक दिव्य गुणांची देणगी बहाल करतात. आत्मनियंत्रण, निर्भयता, विवेक शक्ती, धैर्य, लवचिक बुद्धी, मनाची स्थिरता, आश्चर्य, संतुष्टी, प्रेम, आनंद, शांती असे अनेक गुण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतात. या महिन्यात बुद्धजयंतीचा सण येतो. आपणही नकारात्मक भावनांतून मुक्त होत शुद्ध बना, बुद्ध बना. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची कला शिकून ‘बुद्धावस्थेत’ (चेतनेच्या सर्वोच्च अवस्थेत) पोहोचून, सर्व नकारात्मक भावनांतून मुक्त व्हा, याच शुभेच्छा… हॅपी थॉट्स!
~ सरश्री
One comment
Reshma Deshmukh
Sir Shri apka bahut bahut dhanyawad is magadarshan ke liye. Ye padh ke man me chal rahe negative thoughts Kam ho Gaye aur posstive feel hone laga.