This post is also available in: English Hindi
एकदा मीरा आपल्या परिवारासोबत आजोबांसह एका कार्यसिद्धीच्या निमित्तानं दूरच्या गावी निघाली होती. वाटेत त्यांना एक साधू भेटला. त्याच्याजवळ कृष्णाची छोटीशीच पण फार सुरेख अशी मूर्ती होती. ती कृष्णाची मूर्ती मीरेला खूपच आवडली. ‘ही मूर्ती मला हवी’ म्हणून मीरा हट्ट करू लागली. खूप विनवण्या करूनही त्या साधूनं ती मूर्ती तिला दिली नाही.
‘तुला अशीच दुसरी मूर्ती मिळेल,’ असं सांगून आजोबांनी मीरेची समजूत काढली. परंतु मीरेनं मात्र आपला हट्ट सोडला नाही. ती म्हणाली, ‘मला दुसरी नको, हीच मूर्ती हवी.’ मीरा कोणाचंच ऐकायला तयार नव्हती. इतकंच काय पण त्या दिवशी ती जेवलीदेखील नाही.
रात्री जेव्हा तो साधू झोपला, तेव्हा त्याच्या स्वप्नात साक्षात् भगवान श्रीकृष्ण प्रकटले. त्यांनी साधूला बजावलं, ‘तू जर माझी प्रतिमा कोणाला देऊ शकत नाहीस, तर मग भक्ती कशी प्रदान करणार? लोकांना भक्ती प्रदान करणं, हे तर तुझं कर्तव्य आहे.’ रात्री पडलेल्या स्वप्नातील संकेत ओळखून साधू प्रभावित झाला आणि सकाळीच त्या राहुटीत जाऊन त्यानं कृष्णाची मूर्ती मीरेला दिली. ती मूर्ती मिळताच मीरेची कळी खुलली, ती खूप आनंदी झाली.
प्रस्तुत कथेतून एक महत्त्वाचा बोध प्राप्त होतो. तो म्हणजे, ज्या गोष्टीविषयी आपल्या मनात भक्तिपूर्ण कृतज्ञतेचा भाव असतो, ती आपल्याला निश्चितच प्राप्त होते. संत मीरेच्या मनात श्रीकृष्णाप्रति ‘भक्तियुक्त कृतज्ञता’ होती. म्हणूनच तिच्या मनातील प्रेमभाव अखेर फळास आला. तुम्हीही या भावनेत दंग होऊन संत मीरेप्रमाणे संतुष्टी प्राप्त करू इच्छिता? ‘मला यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करण्यासाठी निसर्गातील दृश्य-अदृश्य शक्ती सक्रिय व्हाव्यात’, असं तुम्हाला वाटतं का? समृद्धी, उत्साह, भक्ती, मधुर नाती, सकारात्मक कार्य आणि पूर्णत्व अशा पैलूंनी तुमच्या आयुष्याची सफर अविस्मरणीय व्हावी, असं तुम्हाला वाटतं का? तुमचं उत्तर ‘हो’ असेल, तर आजच ‘कृतज्ञतेची शक्ती’ जाणा.
‘कृतज्ञता’ म्हणजे आपल्याला जे काही प्राप्त झालंय, त्याबाबत मनात कृतार्थतेची भावना असणं… एखाद्या गोष्टीबाबत धन्य झाल्याची भावना अनुभवणं… कृतकृत्य झाल्याची भावना अंतःकरणा पासून व्यक्त करणं… कृतज्ञता म्हणजे केवळ शब्द नसून तो ‘प्रेमभाव’ आहे. असा भाव जो जीवनरूपी प्रवासाला योग्य दिशा देतोे. मग तुमची वाटचाल
सुरू होते… अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधकारातून प्रकाशाकडे, अंधश्रद्धेतून आत्मश्रद्धेकडे, आंतरिक संघर्षातून परमशांतीकडे, अस्वास्थ्यातून स्वास्थ्याकडे आणि अपयशाच्या दरीतून यशाच्या शिखराकडे! तेव्हा दोन्ही हात खोलून म्हणा, ‘मला आजवरच्या जीवनात जे काही लाभलंय, त्यासाठी मी कृतज्ञ आहे, कृतार्थ आहे… धन्यवाद… धन्यवाद… धन्यवाद!’
नियतीचा एक नियम आजच मनात ठसवा-
‘दिल्याने वृद्धिंगत होतं, घेतल्यानं घटतं.’ अर्थातच ज्या गोष्टीप्रति आपल्या मनात कृतज्ञतेचे भाव उमटतात, ती वृद्धिंगत होते.
आज तुमच्या आयुष्यात जितकी धनदौलत आहे, त्याविषयी जर तुमच्या मनात कृतज्ञतेचे भाव नसतील, तर जीवनात समृद्धी कशी बरं येईल? केवळ आर्थिक समृद्धीबाबतच नव्हे, तर स्वास्थ्य, मधुर नाती, यशस्वी जीवन, आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती अशा सर्वच बाबतीत हा नियम लागू होतो. कारण कृतज्ञता हा गुण तुम्हाला एक असा चुंबक बनवतो, जो केवळ समृद्धी आणि सकारात्मकता आकर्षित करतो. मग तुमच्याकडे असणार्या प्रत्येक गोष्टीत दिवसेंदिवस वृद्धी होत जाते.
लक्षात घ्या, तुमच्या मनात निर्माण होणारा प्रत्येक विचार आणि भावना म्हणजे एक ‘बीज’ आहे. एका बीजात संपूर्ण जंगल सामावलेलं असतं. एका फळात किती बिया असतात, हे कोणीही सांगू शकेल. पण एका बिजात किती फळं सामावली आहेत, हे कोण बरं सांगू शकेल? थोडक्यात, तुम्ही आज एक बीज पेरलंत, तर त्यातून भविष्यात असंख्य रसाळ फळं तयार होतात. कारण हा निसर्गनियम आहे. निसर्गात पेरलेलं प्रत्येक बीज तुम्हाला अनंत पटीने फळं देतं… मग तुम्ही पेरलेलं बीज नकारात्मक असो वा सकारात्मक! तुम्ही जे देता, ते निसर्ग स्विकारतो आणि तीच गोष्ट कैक पटीने तुमच्या आयुष्यात पुन्हा येते. तुम्ही नियतीला ‘धन्यवाद’रूपी बीज दिलंत, तर तुम्हाला एका गोष्टीचा विलक्षण अनुभव येईल. ती म्हणजे, तुमच्या कृतज्ञतेला प्रतिसाद देण्यासाठी निसर्गही तुम्हाला अनंत वेळा धन्यवाद देतोय.
प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्या-
सफल, समृद्ध जीवनासाठी आजपासून प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्यायला सुरुवात करा. सकाळी डोळे उघडताच प्रकाशासाठी सूर्याला धन्यवाद द्या… नवा दिवस दाखवल्या बद्दल ईश्वराचे आभार माना… भोजन करण्यापूर्वी शेतकर्याला, निसर्गाला आणि ज्यानं अन्न बनवलं त्यालाही धन्यवाद द्या… ज्या धरणीमातेचा आधार घेत तुम्ही चालता, तिलाही धन्यवाद द्या…
अल्बर्ट आइनस्टाइन या प्रतिभावान, रचनात्मक संशोधकाला आज संपूर्ण जग सलाम करतं. पण त्यांना जेव्हा त्यांच्या यशाचं मर्म विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले होते, ‘मी प्रत्येक गोष्टीसाठी हृदयापासून धन्यवाद देतो!’ आइनस्टाइन यांना जेव्हा कोणी सहकार्य करायचं, तेव्हा त्यांच्या मनात त्या मनुष्याप्रति दिवसभरात कमीत कमी शंभरहून अधिकवेळा धन्यवादाचे भाव निर्माण व्हायचे.
यशस्वी करिअर, प्रामाणिक मित्र, आयुष्य सर्वार्थानं सुंदर बनवणारा जीवनसाथी, सुखी कुटुंब, प्रेम, शांती, आनंद, समृद्धी, वेळ, स्वास्थ्य (सेेव हशरश्रींह), पैसा, सुदृढ नाती, तनामनात ओसंडून वाहणारी ऊर्जा, यशशिखरावर पोहोचवणारे गुण, जीवनाचं सौंदर्य खुलवणारं ज्ञान आणि आध्यात्मिक समज… अशा सर्व गोष्टी निसर्गात मुबलक प्रमाणात आहेत, आणि त्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत.
पण केवळ त्याच लोकांच्या जीवनात अशा सर्वोच्च गोष्टींचा ओघ सुरू होतो, जे नेहमी कृतज्ञ असतात. तुम्ही कृतज्ञतेची शक्ती आजच ओळखा, मग पाहा तुमचं भविष्य किती सुंदर आणि शक्तिशाली बनेल! असं भविष्य ज्यात केवळ धनच नव्हे, तर ध्यानाची दौलतही असेल… केवळ माहिती नव्हे, तर ज्ञानाचं भांडारही असेल… केवळ यशच नव्हे, तर सजगताही असेल… असं जीवन ज्यात तुम्ही मोहपाशातून मुक्त आणि विश्वाच्या कल्याणार्थ कटिबद्ध असाल.
चला तर मग, कृतज्ञतेच्या ज्ञानधारेत न्हाऊन निघूया… आपल्याकडे असणारा खजिना ओळखूया.
हा खजिना तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असणार्या उत्तमोत्तम गोष्टी मोजता आणि त्यांची डायरीत नोंदही ठेवता. लक्षात घ्या, आयुष्यात प्राप्त होणार्या प्रत्येक छोट्या गोष्टीप्रति कृतज्ञ व्हा. मग ती गोष्ट आपोआप वृद्धिंगत होईल.
आता खाली देण्यात आलेल्या मुद्द्यांवर मनन करा- खाली देण्यात आलेल्या क्षेत्रांशी संबंधित कोणकोणत्या मौल्यवान गोष्टी माझ्याजवळ आहेत :
1) स्वास्थ्य, शरीर, शरीराचा प्रत्येक अवयव
2) तुमच्याजवळ असणारी धनदौलत
3) तुमच्या आयुष्यातील सर्व नातेसंबंध, मित्र, शुभचिंतक
4) निसर्गातील अनेकानेक बाबी – सूर्य, पृथ्वी, चंद्र, समुद्र, नद्या, झरे, प्राणवायू
5) तुमचं घर, घरातील सर्व वस्तू- फर्निचर, मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, तुम्हाला विश्रांती देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी बेडरुम, तुम्ही वापरत असलेली प्रत्येक गोष्ट.
6) तुमच्याकडे असणारं वाहन, सायकल, ज्याआधारे तुम्ही इच्छित ठिकाणी सहजतेने पोहोचू शकता.
7) तुमच्या वाचनात येणारी उत्तमोत्तम पुस्तकं, मासिकं, जी तुम्हाला ज्ञान प्रदान करतात.
8) सर्व सजीवसृष्टी- तुमचे नातेवाईक, आसपास असणारे पशू, पक्षी, बहुरंगी फुलं… थोडक्यात तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरणारी प्रत्येक गोष्ट
येथे उदाहरणादखल काही मोजकेच पैलू देण्यात आले आहेत. पण तुम्ही ही यादी वाढवू शकता. कारण या यादीत अशा असंख्य गोष्टी समाविष्ट होऊ शकतात, ज्यांविषयी आपण कृतार्थ असायला हवं. तेव्हा धन्यवाद देण्यात, आभार मानण्यात कधीही कंजुसी करू नका. जेणेकरून देणारा (नियती, ईश्वर, सेल्फ, स्रोत) तुम्हाला प्रत्येक गोष्ट भरपूर आणि सहजतेने देईल.
जीवनरूपी प्रवास तेव्हाच सुंदर बनतो, जेव्हा तुमच्या हृदयात ‘कृतज्ञते’ची भावना आणि ओठी ‘धन्यवाद’ हे शब्द असतील.
या प्रवासात साथसंगत करणार्या आणि जीवनप्रवास यशस्वी बनवणार्या तुमच्या सर्व नातेवाइकांना म्हणा, ‘माझ्या जीवनात आल्याबद्दल आपल्याला धन्यवाद… Thank you for being in my life!’ तुम्ही जेव्हा प्रवासासाठी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाल, तेव्हा तेथील प्रत्येक गोष्टीला आवर्जून धन्यवाद द्या… सूर्याची तप्तता, बर्फाची शीतलता, झुळझुळ वाहणारे झरे, हिरवी शाल पांघरलेले डोंगर, निळं मोकळं आकाश, किलबिलाट करणारे पक्षी, संपूर्ण पृथ्वी आणि ब्रह्मांडाला उद्देशून म्हणा, ‘माझ्या जीवनात आल्याबद्दल आपल्याला धन्यवाद… Thank you for being in my life!’
आपला जीवनरूपी प्रवास सहज, सुंदर आणि सुखद व्हावा, याच शुभेच्छांसह… हॅपी जर्नी, हॅपी थॉट्स!
One comment
Kedar
Dhnyawad 🙏🌹🌹🙏
Nisrag niyam samjun sangtle…