This post is also available in: English Hindi
मनुष्य न विसरता एक काम सतत करत असतो, ते म्हणजे सदैव विचार करत राहणं! पण आपण विचार करायला सुरुवात कधी केली, याचा कधी विचार केलाय का?
आपल्याला विचार कसे येतात?
कुठून येतात?
कधी-कधी येतात?
या विचारांमुळे आपल्यात कोणकोणत्या भावना निर्माण होतात?
मग त्यामुळे आणखी नवे विचार कसे तयार होतात?
आणि तसे विचार निर्मित झाल्याने अखेर आपली काय स्थिती होते?
या सर्व गोष्टींवर मनन केल्यानंतर एकच बाब लक्षात येते आणि ती म्हणजे विचार करणं हे आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण कार्य आहे. म्हणून ते अत्यंत काळजीपूर्वक, कौशल्यपूर्वक करणं आवश्यक आहे. नव्हे, ही एक कलाच आहे… विचार करण्याची कला! सुखी, यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी या कलेत पारंगत होणं, प्रावीण्य मिळवणं फारच गरजेचं आहे. म्हणूनच शाळेतही मुलांना ‘विचार कसा करावा’ हे अत्यावश्यक ट्रेनिंग मिळायलाच हवं.
जे लोक विचार करण्याची कला शिकतात, ते पृथ्वीवर इतरांपेक्षा कमी दुःख भोगतात. कारण, आपले विचार विकसित कसे करावेत, आपल्या कलकल करणार्या- बेलगाम विचारांना दिशा कशी द्यायची, हे त्यांना ठाऊक असतं. तसंच, आपल्याच विचारांवर विचार कसा करायचा आणि त्याचा आपल्या विकासासाठी उपयोग कसा करायचा, हेही ते योग्यप्रकारे जाणतात.
ही कला कुठल्याही क्लासमध्ये, कुठल्याही कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकवली जात नाही; शिवाय आई-वडीलही, आपला मुलगा कसा विचार करतोय, याकडे लक्ष देत नाहीत. म्हणूनच विचार करायला शिका, असं आपल्याला सांगितलं जातंय. कारण योग्य विचार करायलाही शिकावंच लागतं आणि शिकल्याशिवाय आपण नीट विचारही करू शकत नाही. म्हणून विचारांबाबत विचार करणं अत्यावश्यक आहे. किमान त्या विचारांवर तर नक्कीच विचार करायला हवा, ज्यांच्यामुळे आपण दुःखी होतो. मग हेच विचार आपल्यात भय, तणाव, निराशा, असुरक्षितता यांसारख्या नकारात्मक भावना निर्माण करतात. यासाठीच या विचारांवर विचार करून असे काही नवे विचार निर्माण करायचे आहेत, जे या विचारांची नकारात्मकता नाहीशी करतील. कसं ते एका उदाहरणाद्वारे पाहूया.
एका लहान मुलाचे वडील नुकतेच परदेशातून आले होते. तेथून त्यांनी आपल्या मुलासाठी एक पेन्सिल बॉक्स आणला होता. मुलगा शाळेत जाताना तो बॉक्स सोबत घेऊन गेला; पण तिथे गेल्यानंतर तो कुठे ठेवलाय, हेच त्याच्या लक्षात येत नव्हतं. आता तो पेन्सिल बॉक्स हरवल्याचं पाहून तो खूपच भयभीत झाला, तो जोरजोरात रडायला लागला. त्याच्यासमोर एक-एक दृश्य प्रकटू लागलं, ‘आता आपण वडिलांना कसं सांगणार… मग ते आपल्याला कसे रागावतील… इत्यादी.’ यानंतर तो आपल्या बाबांना भीतभीतच म्हणाला, ‘‘बाबा, शाळेत माझं पेन्सिल बॉक्स हरवलंय.’’ त्यावर वडील दिलासा देत त्याला म्हणाले, ‘‘काही हरकत नाही. शाळा सुटल्यानंतर ‘लॉस्ट अँड फाउंड’ डिपार्टमेंटमध्ये जाऊन शोध आणि तिथे जरी सापडलं नाही तरी घाबरू नकोस, मी तुला नवीन बॉक्स आणून देईन.’’ हे ऐकताच मुलगा अगदी निश्चिंत झाला आणि क्षणार्धात त्याच्या चेहर्यावर हास्य प्रकटलं. जणू काही त्याची भीती एकदमच गायब झाली.
अगदी अशाच प्रकारे आपल्या विचारांसोबतही करायचं आहे. नकारात्मक विचार येताक्षणीच काही सकारात्मक विचार करून नकारात्मक विचारांची हवा काढून टाकायची आहे, त्यांपासून मुक्त व्हायचं आहे.
याचाच अर्थ, जेव्हा काही विचार कराल, तेव्हा ‘विचार केल्यानंतर काय बनून हा विचार केला’ यावर विचार करा. कारण विचार करण्याच्या कलेअंतर्गत ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजून (भाऊ, वडील, पत्नी, आई) विचार करत आहात, त्याच्याशी आपण किती आसक्त आहात, या गोष्टींचा विचारांवर सखोल परिणाम होतो.
एकदा एक वयस्कर स्त्री जेवायला बसली. पण… त्या दिवशी तिला सगळंच अन्न बेचव लागलं. त्यातील कोणताच पदार्थ तिला आवडला नाही. मग जेवत असतानाच तिची मनात बडबड सुरू झाली, ‘ही नवी सून किती बेचव स्वयंपाक बनवते. काही खावंसंच वाटत नाही… हिच्या आईने हिला काही शिकवलंय की नाही, देव जाणे! कसा संसार करायची ही!’ तेवढ्यात तिची मुलगी स्वयंपाकघरातून बाहेर येते आणि आपल्या आईला विचारते, ‘‘आई, सांग ना, आजचा स्वयंपाक कसा झालाय? सगळं काही मीच बनवलंय.’’ हे ऐकताच त्या स्त्रीचे विचार त्वरित बदलतात. ती हसतच विचार करू लागते, ‘अरे व्वा, माझी मुलगी शिकलीच एकदाची स्वयंपाक बनवायला… काही हरकत नाही, थोडं मीठ-मिरची कमी आहे; पण शिकेल हळूहळू, होईल सुधारणा… करतेय ते का थोडं आहे,’ असा विचार करून ती आता प्रसन्नचित्ताने जेऊ लागली.
परंतु ती वयस्कर स्त्री जर एक भक्त असती, तर तिने कसा विचार केला असता, कोणत्या भावनेने तिने ते अन्न ग्रहण केलं असतं? निश्चितच ती म्हणाली असती, ‘‘हे परमेश्वरा, आज तू जो प्रसाद दिलास, तो मला स्वीकार आहे. त्याबद्दल तुझे खूप आभार, तुला खूप धन्यवाद!’’
बघितलं आपण; जेवण तेच, खाणाराही तोच… मात्र केवळ ओळख, नातं बदलल्याने भावना कशा बदलल्या? विचार कसे बदलत गेले…? तिने जेव्हा स्वतःला सासू म्हणून पाहिलं, तेव्हा तिचे विचार वेगळे होते आणि ज्यावेळी तिने एका मुलीची आई या भूमिकेतून विचार केला, तेव्हा तिचे विचार अगदी त्याउलट होते; पण ती जर एक भक्त असती, तर अगदी अनोखे असेच तिचे विचार असते…
तात्पर्य, त्याक्षणी आपण स्वतःला काय मानून जगतो, यावरच आपले बहुसंख्य विचार अवलंबून असतात. जसजशी आपली ओळख बदलत जाते, तसतसे विचारही बदलतात. कारण आपण एका क्षणास एक असतो, तर दुसर्या क्षणी दुसरेच बनतो. समोरच्या मनुष्याकडे पाहूनच आपण आपली भूमिका, रोल बदलतो. समोर बॉस आला तर आपण कर्मचारी बनतो… समोर आपल्या हाताखालील कर्मचारी आला, तर तत्क्षणी आपण बॉस बनतो. आई-वडिलांसमोर आज्ञाधारक मूल, तर मुलांसमोर मम्मी-पप्पा बनतो. खरंतर, वास्तवात आपण एकच असतो, म्हणून आपली मूळ ओळखदेखील एकच असायला हवी आणि आपले सगळे विचारही त्याच मूळ गोष्टीशी संलग्न असायला हवेत; पण बहुधा असं घडत नाही.
आयुष्यात आपल्याला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात, हे खरं आहे. पण, आपले विचार मात्र नेहमी मूळ गोष्टीपासूनच निर्माण व्हायला हवेत, तरच ते योग्य आणि सकारात्मक असतील.
मग आता प्रश्न असा आहे, की आपली मूळ ओळख काय? खरंतर आपण शरीरही नाही, न शरीराद्वारे वठवली जाणारी कोणती भूमिका! या भूमिकेत दडलेलं पात्र एकच आहे, जे कॉमन आहे. प्रत्येक शरीरात एकच पात्र विराजमान आहे, ज्याला आपण युनिव्हर्सल चेतना, ईश्वर असं संबोधतो. म्हणून जेव्हा विचार कराल, तेव्हा त्या मूळ गोष्टीची जाणीव ठेवून, त्यात स्थापित होऊनच करा.
विचार करण्यापूर्वी सर्वप्रथम ती मूळ गोष्ट (स्रोत) लक्षात ठेवून स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा, ‘हू अॅम आय नाऊ… या क्षणी मी कोण आहे? माझी खरी ओळख काय आहे?’ या एका प्रश्नासरशी आपल्या मूळ ओळखीचं स्मरण होईल. मग त्यानंतर जे विचार येतील, ते स्रोताद्वारे उपजलेले ईश्वरीय विचारच असतील.
जसं, एखाद्या मनुष्याला डेंग्यू हा आजार झाल्याने तो हास्पिटलमध्ये अॅडमिट असतो. तेथे तो अँटिबायोटिक औषधं, सलाइन बघून भयभीत होतो. आता त्याला मृत्यूचेच विचार त्रस्त करू लागतात. पण, त्यावेळी जर त्याने विचारावर विचार केला, तर तो स्वतःला एक नाशवंत शरीरच समजत असल्याचं लक्षात येईल. मग जेव्हा तो आपल्या मूळ गोष्टीचं स्मरण करेल, तेव्हा त्याला आकलन होईल, की ‘मी कोण आहे?’ आणि क्षणार्धात त्याचं भय नष्ट होईल. त्यानंतर तो सकारात्मक ऊर्जेेने ओतप्रोत भरेल आणि आजारातून लवकर बरा होईल.
आपल्या मनात जेव्हा दुःखद किंवा नकारात्मक विचार येऊ लागतात, तेव्हा आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीशी जोडले गेलोय, हे समजून घ्यायला हवं. अशावेळी सर्वप्रथम आपल्यातील मूळ गोष्टीचं स्मरण व्हायला हवं. काही वेळ स्रोतावर स्थित राहून योग्य विचार करायला हवेत. ‘आपण पृथ्वीवर का आलोय? आपलं मूळ लक्ष्य काय आहे? अशा क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकण्याची आपल्याला खरोखरच गरज आहे का?’ याचं स्वतःला वारंवार स्मरण द्यायला हवं.
यासाठी, ‘मी ईश्वराची संपत्ती आहे, कोणतीही वाईट शक्ती मला स्पर्श करू शकत नाही’, ‘निसर्गात सर्वकाही भरपूर आहे, म्हणून माझ्यासाठीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कमतरतेची भावना बाळगण्याची किंवा घाबरण्याची मला जराही आवश्यकता नाही,’ असे ईश्वरीय सुविचार जागोजागी लिहून ठेवायला हवेत, जे वाचून लगेच मूळ गोष्टीचं स्मरण होईल आणि नकारात्मक बाबींतून तुम्ही मुक्त व्हाल.
अशा प्रकारे जेव्हा-जेव्हा नकारात्मक विचारांचा आपल्यावर हल्ला होईल, तेव्हा हे सुविचार अवश्य वाचा, त्यांचा सराव करा. जेणेकरून आपल्या विचारांची दिशा बदलेल आणि आपण मनाच्या बडबडीतून मुक्त व्हाल.
– सरश्री
Add comment