This post is also available in: Hindi
चिंतामुक्तीचं सरळ-सोपं सूत्र ‘जेव्हाचं तेव्हा पाहू.’
करण्यायोग्य कर्तव्यकर्म आता करा
मनुष्याच्या जीवनात कधी सुख तर कधी दुःख असा ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असतो. अशा स्थितीत त्याच्या मनात चिंतेचं सावट येतं. प्रत्येकाची चिंता वेगवेगळी असू शकते. अविवाहिताला लग्नाची… मुलांना अभ्यासाची… गृहिणीला कुटुंबाची… पतीला व्यवसाय किंवा नोकरी यांची… वयस्कर लोकांना आरोग्याची… युवकांना नोकरीची चिंता सतावत असते.
आता सर्वप्रथम आपण चिंतेचं मूळ कारण काय आहे, हे समजून घेऊ या. चिंता म्हणजे नेमकं काय? मनुष्य स्वतःला कधी योग्य प्रश्न विचारत नाही. त्यामुळे तो चिंतेच्या दरीत कोसळतो. तुम्ही कधी ‘चिंता’ या विषयावर चिंतन केलं आहे का? असा प्रश्न विचारला, तर बहुसंख्य लोकांचं ‘नाही’ हेच येईल. कारण चिंता करणं त्याच्यासाठी सोपं असतं. परंतु या विषयावर मनन-चिंतन करणं त्याला कठीण वाटतं. वास्तविक ज्या गोष्टीवर तुम्ही सखोल मनन करता, ती प्रकाशात येते आणि सर्जनशील पद्धतीने तुमच्यासमोर मुक्तीचं द्वार खुलं होतं.
तसं पाहिलं तर चिंतेचा अर्थ आहे- अज्ञानामुळे मनुष्याच्या मनात सुरू असणारे निरर्थक, दिशाहीन विचार, जे त्याला वर्तमानापासून दूर घेऊन जातात. परिणामी त्याचं मन घडून गेलेल्या भूतकाळात आणि पुढे येणार्या भविष्यकाळात रममाण होतं.
हेच दुसर्या शब्दात असं सांगता येईल, की तुमचं मन जेव्हा वर्तमानाच्या वस्तुस्थितीवर केंद्रित नसतं, तेव्हा तुम्हाला चिंता सतावू लागते. समजा, तुम्ही एक विद्यार्थी आहात, अभ्यास करत आहात, तुमच्यातील गुणांना झळाळी आणत आहात. परंतु हे करत असताना तुमचं मन भविष्याचा विचार करत असेेल- ‘मला नोकरी कधी मिळेल… मिळेल की नाही… माझ्या पालकांनी मला अतिशय कष्टाने शिकवलं आहे. त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकेन का?’ अशा स्थितीत तुम्ही वर्तमानात शंभर टक्के योगदान देऊ शकणार नाही. परिणामी तुम्ही ज्या नोकरीची चिंता करत आहात, ती मिळण्यासाठी आणखी उशीर होईल. यासाठी मनात जेव्हा चिंतेचे विचार येतील, तेव्हा स्वतःला चिंतामुक्तीचं सरळ परंतु परिणामकारक सूत्र सांगा, जेव्हाचं तेव्हा पाहू. परंतु आता केवळ के. वाय. के. करू. म्हणजेच जी घटना भविष्यात आहे, तिच्याबाबतीत ‘आता’ (वर्तमानात) नव्हे, तर त्या वेळी (भविष्यात) विचार करू आणि करण्यायोग्य कर्म (के.वाय.के.) आता करू. हे केल्याने तुम्ही वर्तमानातील कामात अतिशय उत्तम योगदान देऊ शकाल.
हे सूत्र केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठी उपयुक्त आहे. कारण आज चिंता ही मानवी जीवनातील एक मुख्य भाग बनली आहे. यासाठीच हे सूत्र लक्षात ठेवून वर्तमानात जगण्याचं महत्त्व समजून घ्यायला हवं. चिंता तर केवळ एक भ्रम आहे. चिंता म्हणजे जी वास्तवात नाहीच अशी गोष्ट आहे. यासाठी ज्या ज्या वेळी तुम्हाला चिंता सतावू लागेल, त्या त्या वेळी स्वतःला आठवण द्या, ‘जेव्हाचं तेव्हा पाहू. आता केवळ के.वाय.के. करू.’
सारांश रूपात तुमच्यासाठी दोन कार्ययोजना आहेत :
(1) ज्या ज्या वेळी मनात चिंता निर्माण होईल, त्या त्या वेळी स्वतःला या गोष्टीचं स्मरण द्या, ‘जेव्हाचं तेव्हा पाहू.’
(2) स्वतःला योग्य प्रश्न विचारा,‘आता करण्यायोग्य कर्म (के.वाय.के) काय आहे?’ त्यात आपलं 100% योगदान द्या.
या मार्गाने वाटचाल करत स्वतःमध्ये दृढता निर्माण करा आणि प्रत्येक क्षणी तणावमुक्त राहा.
~ सरश्री
Add comment