This post is also available in: Hindi
आरंभशूर लोक कार्याची सुरुवात तर अगदी उत्साहात करतात. परंतु काही दिवसांतच त्यांचा उत्साह कमी होत जातो. परिणामी कार्यात सातत्य राहत नाही. अशावेळी निरंतरता हा गुण कसा अंगीकारावा, हा प्रश्न निर्माण होतो.
उत्तरादाखल सर्वप्रथम हे सांगितलं जाईल, ‘निरंतरता ही यशाची गुरुकिल्ली आहे.’ कोणीही एखाद्या कार्याची सुरुवात करतो, तेव्हा त्याला लगेचच यश मिळत नाही. परिणामी तो ते कार्य अर्धवट सोडून देतो. मनुष्याचा मूड बदलताच त्याचे विचार बदलतात. पण त्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवायला हवं, ‘तुमचा मूड जर तुमच्या मुठीत असेल, तर तुमचं नशीबदेखील तुमच्या मुठीतच असतं.’ आता आपण हे सूत्र नीट समजून घेऊ या. मनुष्य जेव्हा त्याच्या मूडनुसार एखाद्या कामाची टाळाटाळ करतो, तेव्हा तो कामात सातत्य राखू शकत नाही. जसं, सकाळी झोपेतून उठताच एखाद्याच्या मनात विचार येतो, ‘आज व्यायाम करण्याचा मूडच नाही, आज जिमला जायलाच नको.’ असा विचार येणं साहजिक आहे, परंतु या विचाराप्रति अनासक्त होऊन ते काम करणं अत्यावश्यक असतं.
‘मी अमुक काम आता करू शकत नाही’, असं ज्या ज्या वेळी तुम्हाला वाटेल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, ‘मी किमान किती वेळ हे काम करू शकतो?’ मन म्हणेल, ‘फक्त दहा मिनिटं.’ मग मनाला आपल्या बाजूला वळवण्यासाठी किमान पाच मिनिटं तरी ते काम अवश्य करा.’
एके दिवशी महाबली नावाच्या पहिलवानाने एका बलाढ्य हत्तीला लोळवून सर्वांसमोर त्याचं शक्तिप्रदर्शन घडवलं. लोकांनी जेव्हा त्याला या यशाचं रहस्य विचारलं, तेव्हा तो म्हणाला, ‘‘व्यायामशाळेत जाणं टाळण्यासाठी मी कितीतरी बहाणे देत असे. जसं, आज सर्व शरीरात वेदना जाणवत आहेत… रात्री झोप व्यवस्थित झाली नाही… आज तब्येत ठीक नाही… इत्यादी. पण जेव्हा माझ्यापेक्षाही कमी ताकद असलेल्या पहिलवानाने मला चारी मुंड्या चित केलं, तेव्हा मात्र मला खूप वाईट वाटलं. त्यानंतर मी स्वतःला विचारलं, ‘तू दररोज व्यायामाची टाळाटाळ करतोस… परंतु आता मला हे सांग, की तू कमीत कमी किती वजन उचलू शकतोस आणि किती वेळ व्यायाम करू शकतोस?’ त्यावर उत्तर आलं, ‘केवळ पाच किलो आणि तेदेखील दहा मिनिटंच.’
तेव्हा मी स्वतःला म्हणालो, ‘ठीक आहे, आता मी दरररोज इतकं वजन उचलेन आणि तेही वारंवार उचलेन… शिवाय तेदेखील केवळ दहा मिनिटंच.’ अशा प्रकारे मी नियमितपणे वजन उचलू लागलो आणि प्रत्येक आठवड्यानंतर एक-एक किलो वजन वाढवू लागलो. अशा प्रकारे हळूहळू मनाला, मेंदूला आणि शरीराला वजन उचलण्याची सवय जडत गेली. त्याचा परिणाम असा झाला, की आज मी इतक्या बलाढ्य हत्तीला सहजपणे उचलून जोरात आपटलं. वास्तविक इतकं वजन उचलणं तुम्हाला कठीण वाटतंय. पण माझ्यासाठी मात्र ते अगदी किरकोळ आहे.’’
नियमितपणे उचललेलं छोटं पाऊल मनुष्याला यशाच्या शिखरावर विराजमान करतं, हेच या उदाहरणाद्वारे आपल्याला समजतं. यासाठी शिखरावर पोहोचण्याची घाई न करता आज मी कोणतं पाऊल उचलू शकतो, यावर विचार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी. मनाचे गुलाम न बनता, मूड आपल्या ताब्यात ठेवायला हवा. मन कित्येक बहाणे देऊन कामापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतं, काम टाळण्यासाठी असंख्य सबबी त्याच्याकडे असतात. परंतु या सर्व बहाण्यांच्या विरुद्ध एक छोटं पाऊल उचलायला हवं. कारण, याच पावलामुळे पुढे तुम्ही तुमच्या जीवनात मोठं परिवर्तन आणू शकाल.
यासाठीच निरंतरता, सातत्य हा गुण अंगीकारायचा असेल, तर तुमचं लक्ष्य सुस्पष्ट असू द्या. जसं, तुम्ही महिन्याला दोन किलो वजन कमी करण्याचा निर्धार केला असेल, तर ते उद्दिष्ट लिहून ठेवा. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये, कॉम्प्युटर स्क्रीनवर, घरातील भिंतीवर रिमाइंडर्स लावा आणि ‘माझं लक्ष्य आता पूर्ण झालं असून, मला आनंदी अवस्थेत राहून मधली प्रक्रिया पूर्ण करायची आहे,’ हा विचार वारंवार उच्चारत राहा.
निरंतरतेमुळेच सृष्टीचं चक्र सुरू आहे. सातत्य हाच निसर्गाचा आधार आहे. तुमच्या शरीरात कित्येक कार्यं नियमितपणे सुरू आहेत. त्यामुळेच खरंतर तुमचं शरीर जिवंत आहे. यासाठीच नियमितपणाचं महत्त्व जाणून छोटी छोटी पावलं टाकत यशस्वी जीवनाकडे वाटचाल सुरू करा. अगदी आजपासून, नव्हे आतापासून आणि तेही सातत्याने!
~ सरश्रींच्या मार्गदर्शनावर आधारित
‘हा विषय सविस्तर जाणण्यासाठी आपण पुढील गोष्टींचा लाभ घेऊ शकता- :
(1) वॉव पब्लिशिंग्जद्वारे प्रकाशित सरश्रीलिखित खालील पुस्तकं वाचा-
1) विकास नियम – click here to buy
2) संपूर्ण प्रशिक्षण – click here to buy
या विषयावरील अधिक माहितीसाठी संपर्क साधा – मो. +91 9922081483
Add comment