This post is also available in: Hindi
पोलंडमधील सुप्रसिद्ध धर्मगुरू हाफिज हईम यांची ही गोष्ट. एके दिवशी त्यांना भेटण्यासाठी एक अमेरिकन प्रवासी त्यांच्या घरी आला आणि हाफिज हईम यांची साधी राहणी पाहून अचंबित झाला; कारण महान धर्मगुरू असूनही हाफिज हईम एका छोट्याशा खोलीत राहत होते. शिवाय त्या खोलीत ग्रंथांशिवाय इतर कोणतीच वस्तू नव्हती. एक छोटा टेबल आणि बाकडं… बस्स! मग फर्निचर तर खूपच दूरची गोष्ट. धर्मगुरूंच्या साधेपणाने आश्चर्यचकित झालेला अमेरिकन प्रवासी म्हणाला, ‘धर्मगुरू, आपलं फर्निचर कुठे आहे?’ हाफिज हईम यांनी त्वरित प्रतिप्रश्न केला, ‘तुमचं फर्निचर कुठंय?’ प्रवासी म्हणाला, ‘माझं फर्निचर? मी तर एक प्रवासी आहे आणि काही ठराविक अवधीसाठी येथे वास्तव्य करणार आहे.’ हाफिज म्हणाले, ‘मीसुद्धा! मला या गोष्टीचं सतत स्मरण असतं, की मी या संसाराची यात्रा करण्यासाठी आलोय आणि मला येथे मर्यादित काळासाठीच राहायचंय.’
गोष्ट तशी छोटी. पण तिच्यातून आपण नेमका कोणता बोध घ्यायला हवा? मनुष्य ठराविक अवधीसाठी आणि एका विशेष ध्येयाच्या पूर्ततेसाठीच या पृथ्वीवर आला आहे, याचं त्याला स्मरण असणं खूपच महत्त्वपूर्ण आहे. पृथ्वी म्हणजे एक पाठशाळा असून, या पाठशाळेत मनुष्याला त्याच्या जीवनातील धडे स्वतः गिरवायचे आहेत; पण ध्येयाअभावी मनुष्य स्वतःचे धडे शिकण्यास टाळाटाळ करत असतो. मानवी जीवनाचं ध्येय आहे, ‘तो जे कार्य करण्याची क्षमता बाळगतो, ते त्याने करावं. तो जे बनू शकतो, ते बनावं. ज्या उद्दिष्टपूर्तीसाठी तो पृथ्वीवर आलाय, तो पूर्ण व्हावा.’ पण आज मनुष्य पैसा आणि सुखसुविधा प्राप्त करण्यालाच ध्येय मानण्याची चूक करतोय. धनदौलत कमवून प्रशस्त बंगला खरेदी करण्यात आणि त्याचीच सजावट करण्यात त्याचा बहुतांशी वेळ वाया जातोय. मग घर कितीही प्रशस्त असो किंवा सजावटीचं कितीही सामान असो, त्याला ते कमीच वाटू लागतं. केवळ वस्तू गोळा करण्यातच त्याला स्वारस्य वाटू लागतं. आपला मौल्यवान वेळ निरर्थक, अनावश्यक वस्तू जमा करण्यात वाया जातोय, याचं त्याला विस्मरण घडतं.
प्रत्येक मनुष्याच्या जीवनात उदरनिर्वाहाचं ध्येय असतं; पण या ध्येयामागे असणारं असली ध्येय म्हणजे ‘पृथ्वीलक्ष्य.’ अथार्र्तच, पृथ्वीवर जन्म घेण्यामागचा उद्देश. जेव्हा आपण आपलं मन अकंप, प्रेमळ, निर्मळ आणि अखंड आज्ञाधारक बनवतो, तेव्हाच आपलं ‘पृथ्वीलक्ष्य’ पूर्ण होतं. अनेक घटनांना योग्य समजेसह सामोरं जाताच मन अकंप बनू लागतं. थोडक्यात, जीवनात घडणार्या सर्व घटना आपल्याला अकंप बनवण्यासाठीच येत असतात. पण एखादी घटना मनाविरुद्ध घडताच मनुष्य कमालीचा नाराज होतो; कारण त्याच्या जीवनात शक्तिशाली ध्येयाचा अभाव असतो. मात्र सर्वोच्च ध्येय बाळगणारे लोक नेहमीच इतरांच्या तेजविकासासाठी निमित्त बनत सृजनात्मक कार्यांत व्यस्त असतात. ध्येयपूर्तीसाठी असणारी तृष्णा अशा लोकांना कार्यप्रवृत्त राहण्याची आणि प्रशिक्षित होण्याची प्रेरणा देत असते. विध्वंसक कामं तर कोणीही करू शकतो; विघातक कामांसाठी कोणत्याही प्रशिक्षणाची आवश्यकता नसते; पण सृजनात्मक नवकार्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज असते आणि हीच विश्वाची आद्य आवश्यकता आहे.
म्हणून आजच स्वतःचं ध्येय निश्चित करा आणि शरीर, मन, बुद्धीला प्रशिक्षित करण्याचा आरंभ करा. कारण प्रत्येक मनुष्याच्या अंतर्यामी अगणित ईश्वरीय गुण असून, ते आविष्कृत होऊ इच्छितात.
ज्या दिवशी आपण ध्येय निश्चित कराल, तो दिवस आपल्या आयुष्यातील सुवर्णदिन असेल. कारण या दिवशी आपण जीवनाला एक दिशा दिलेली असेल. योग्य दिशा लाभताच आणि ध्येयपूर्तीची प्रेरणा जागृत होताच चारित्र्यवान मनुष्याची क्षमता इतकी वृद्धिंगत होते, की पूर्वी अशक्य वाटणार्या कार्यांमध्ये तो पारंगत होतो. जीवनाचा अर्थ गवसताच निरर्थक वाटणारं जीवन पूर्णत्वप्राप्तीचं कारण बनतं.
एका महिलेचा पती मरण पावला होता. शिवाय तिला एक अपंग मुलगाही होता. दुःखातिरेकाने ती महिला मुलासोबत आत्महत्या करण्याचा विचार करू लागते. हाच विचार करत एके दिवशी ती मुलासोबत एका बागेत बसलेली असते. बागेत बराच वेळ खेळून आनंदित झालेला तिचा अपंग मुलगा म्हणतो, ‘‘आई, मला जगातील सर्व बागांमध्ये खेळायचंय.’’ मुलाचे हे शब्द ऐकताच आईचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावतात. काही क्षणांपूर्वी आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या मातेसाठी पूर्वीची समस्या आता जीवनाला अर्थ देणारी बाब ठरते. आता ती केवळ स्वतःच्या मुलासाठी जगू इच्छिते. मुलाच्या आनंदपूर्तीसाठी ती कठिणातल्या कठीण समस्यांनाही तोंड देऊ लागते. त्याच्यासाठी नोकरी करून पैसे कमावते आणि जीवनातील आव्हानांना, समस्यांना सहजतेने पेलू लागते. आपल्या बाळाला दुनियेची सफर करण्यासाठी घेऊन जाते. थोडक्यात, तिला जगण्याचा अर्थ गवसतो.
जीवनाला अर्थ प्राप्त होताच कठीण गोष्टही सहज वाटू लागते; अन्यथा राईएवढ्या समस्यादेखील पर्वतासमान भासू लागतात. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, ‘‘माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का?’’ नसेल, तर लवकरात लवकर स्वतःला एक जीवनार्थ म्हणजेच ध्येय द्या आणि ते पूर्णत्वास पोहोचवा.
ध्येय निश्चित करताना आपल्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो, ‘मानवी जीवनाचं ध्येय काय आहे?’ मानवी जीवनाचं ध्येय आहे खुलणं, फुलणं, बहरणं. अर्थात, आपल्या सर्व शक्यतांना प्रत्यक्षात साकार करणं. हे साध्य होताच मनुष्याचं ‘संपूर्ण लक्ष्य’ पूर्ण होतं. जीवनात लक्ष्यप्राप्तीसाठी एका गोष्टीचं अवलोकन करायला हवं. आपल्या सभोवताली अशा कोणकोणत्या व्यवस्था आहेत, ज्यांचा लाभ घेत आपण ध्येयपूर्ती करू शकतो, याचा विचार करायला हवा; पण हे करताना इतरांशी तुलना करू नये, स्वतःला जाणून ध्येय निर्धारित करावं. चमेलीचं फूल ‘मी जुही किंवा गुलाबासारखं का नाही?’ असा विचार कधी करतं का? नाही ना! मग मनुष्यानेही स्वभावाला अनुसरूनच स्वतःचं ध्येय निर्धारित करावं.
दररोज सकाळी काही अवधीसाठी आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि मगच दिवसाचा आरंभ करा. मन म्हणेल, ‘आधी हे काम पूर्ण करू, अमुक काम आटोपतं घेऊ, तमुक करू. ध्येयावर मनन तर नंतरही करता येईल.’ पण मनाच्या या खेळात न अडकता दिवसाचा कार्यारंभ करण्यापूर्वीच स्वतःला ध्येयाचं स्मरण करून द्या; जेणेकरून आपल्या प्रत्येक छोट्या कार्यालाही योग्य दिशा मिळेल.
मनुष्य जितकं उच्च लक्ष्य निर्धारित करतो, तितकी अधिक शक्ती निसर्ग त्याला प्रदान करतो, हा निसर्गनियम जाणणारे कधीच छोटं लक्ष्य बनवत नाहीत. आपल्याला जर निसर्गाच्या शक्तीची स्वतःच्या अंतर्यामी अनुभूती घ्यायची असेल, तर सर्वप्रथम सर्वोच्च, शक्तिशाली ध्येय निश्चित करा. ध्येयनिश्चिती करताना स्वतःला एक प्रश्न विचारा, ‘मला जिंकण्याचा आनंद प्रेरणा देतोय, की पराभूत होण्याची भीती?’ तुम्हाला जर जिंकण्याचा आनंद प्रेरित करत असेल, तर तुम्ही प्रत्येक भीती, असुविधा आणि आव्हानाचा सहजतेने सामना करू शकाल; पण पराभूत होण्याची भीती प्रबळ होत असेल, तर स्वतःच्या शक्तिशाली ध्येयाचं स्मरण करा. ध्येयाचं स्मरण आपल्या अंतरंगात भयाशी सामना करण्याची ऊर्जा आणि उमेद जागवेल. ध्येयपूर्तीची ऊर्जा तुम्हाला साहसी बनवून तुमच्याकडून कार्य करवून घेईल आणि तुमचं जीवनही सार्थक बनवेल. आपल्या सर्वांच्या जीवनात असं शक्तिशाली ध्येय (Mission Earth) निश्चित व्हावं आणि सर्वांना जीवनाचा अर्थ गवसावा, याच शुभेच्छांसह हॅपी थॉट्स!
Add comment