प्रश्न : सरश्री, कित्येक वेळा मन उदास होतं आणि मग त्यावेळी ‘या जगाला माझी काही आवश्यकताच नाही, मग जगून काय फायदा?’ असे निराशाजनक विचार मनात येतात. त्यामुळे कधी-कधी आत्महत्या करण्याचे विचारही मनात डोकावून जातात. तेव्हा, या समस्येतून मी मुक्त कसं व्हावं?
सरश्री : मनुष्याच्या मनात नेहमी अगणित विचार सुरूच असतात. परंतु त्यांपैकी बहुसंख्य विचार त्याला भ्रमित करणारे, नकारात्मक आणि शंका-कुशंका निर्माण करणारे असतात. त्यामुळेच मनुष्य जेव्हा अशा विचारांच्या गर्दीत हरवून जातो, त्यातच गुरफटला जातो, तेव्हा तो कित्येकदा नकारात्मक विचारांच्या काळोखात संभ्रमित होतो. परिणामी त्याच्या मनात औदासीन्य पसरतं आणि तो दुःखद गीत गाऊ लागतो… ‘ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं।’ हेच कारण आहे असाहाय्यतेचं! मनुष्य जेव्हा स्वतःला तुच्छ, महत्त्वहीन समजू लागतो, तेव्हा निराशा त्याला जखडून टाकते. मग तो आत्महत्येच्या विचारांना बळी पडतो. वास्तविक ‘आत्महत्या’ हा शब्दच चुकीचा आहे. मनुष्य स्वतःची शरीरहत्या करू शकतो, परंतु आत्महत्या कदापि करू शकत नाही. कारण सेल्फची, चैतन्याची (मनुष्याच्या आत्मरूपाची) हत्या कधी होऊच शकत नाही. याचाच अर्थ, तुम्ही शरीरही नाहीत आणि मन, बुद्धीही नाही. तुमचं खरं स्वरूप शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हींच्या पलीकडे आहे. या परमचेतनेलाच सेल्फ, चैतन्य, ईश्वर, अल्लाह अशा कितीतरी नावांनी संबोधलं आहे. हे परमचैतन्य कालातीत, समयातीत असून, ही सृष्टी आणि मनुष्याचं शरीर याच परमशक्तीचं एक प्रकट रूप आहे.
मात्र, मनुष्याला जेव्हा या परमज्ञानाचं विस्मरण घडतं, तेव्हा तो स्वतःला शरीर किंवा मन समजू लागतो. परिणामी शरीर आणि मन यांचं दुःख तो स्वतःचंच समजून भयभीत होतो, हतबल होतो. त्याच्या अहंकाराला जेव्हा ठेच लागते, तेव्हा तो दुःखी होतो. त्याच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा तो हताश होतो. समस्यारूपी वादळाने धीर गमावून बसतो आणि नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकतो. परिणामी त्याच्या मनात आत्महत्येचे विचार घोंगावू लागतात.
आज समाजात सर्वत्र पाहिलं, तर आत्महत्येचं प्रमाण इतकं का वाढलं आहे, यावर विचार करायला हवा? याचं कारण म्हणजे मनुष्य वास्तवापासून, सत्यापासून दूर जात आहे. तो आपल्या हितचिंतकांपासून आणि स्वतःपासून, स्वतःच्या खर्या रूपापासून दूर जात आहे आणि नेमकं हेच कारण आहे, जीवन निरर्थक भासण्याचं, अपयशाचं! ही अर्थहीनता, वैफल्यता मनुष्याला तीव्रतेने जखडून ठेवते. मग त्याला आत्महत्येशिवाय इतर कोणताही पर्याय समोर दिसत नाही. सद्यःकालीन आधुनिक युगात ही समस्या अतिशय अक्राळविक्राळ रूप धारण करून समोर येत आहे. कारण मनुष्याला अपेक्षांच्या ओझ्याने मानसिकरूपात प्रचंड थकवा जाणवतोय. मोहाधीन होऊन अपेक्षापूर्तींसाठी आयुष्यात तो आंधळी कोशिंबीर खेळत आहे. त्यामुळे त्याचं जीवन उद्देशहीन बनत चाललंय. आत्महत्येचं वाढतं प्रमाण, हे तर केवळ एक लक्षण आहे. वास्तवात स्वतःच्या खर्या स्वरूपाचं विस्मरण घडणं, हाच मनुष्याला जडलेला खरा आजार आहे.
मनुष्य जेव्हा स्वतःला जाणू लागतो, वास्तविक तो जो आहे, ते समजून जगू लागतो, तेव्हा तो सत्यशोधार्थ मार्गक्रमण करतो आणि त्याला जीवनात एक दमदार लक्ष्य प्राप्त होतं. तुम्ही जीवनात जेव्हा एखादं मोठं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवता, तेव्हा तुमचं चालणं, उठणं, बसणं अशी प्रत्येक क्रिया ऊर्जेने भरपूर व्यापलेली असते. असं मन प्रसन्न, धैर्यवान आणि उत्साही असतं. त्यामुळे अशा मनात आत्महत्येचे विचार कधी येतच नाहीत आणि समजा कधी काळी जरी ते आले, तरी साधनेसाठी निमित्त बनतात.
जसं, एखाद्या साधकाच्या मनात आत्महत्येचा विचार आला, तर तो त्या विचारांकडे साक्षीभावनेने पाहील. जेणेकरून असं मन तयार होईल, जे एखाद्या खुल्या पाकिटाप्रमाणे दोन्ही बाजूंनी उघडं असेल. म्हणजेच मनात आत्महत्येचे विचार जरी आले, तरी तो त्या विचारांशी आसक्त होणार नाही आणि त्यांना विरोधही करणार नाही. वास्तविक अशा विचारांकडे पाण्यातील बुडबुड्यांप्रमाणे पाहायला हवं. परंतु अज्ञानवश मनुष्य अशा विचारांना बंद पाकिटात ठेवून वारंवार मनात त्याचं उच्चारणच करत राहतो. मग आपसूकच ते विचार त्याच्या अंतर्मनात खोलवर रुजले जातात. मग जे विचार मनुष्याच्या अंतर्मनात रुजले जातात, तेच पुढे जाऊन वास्तवात त्याच्यासमोर प्रकटतात. त्यासाठीच मनुष्याने आपल्या विचारांबाबत नेहमी सजग राहायला हवं. खरंतर विचार म्हणजे मनुष्याला मिळालेलं एक वरदानच आहे. परंतु या विचारांना जर योग्य दिशा दिली नाही, तर ते अभिशाप बनतात.
म्हणून मनुष्याने आपल्या विचारांप्रति सदैव सजग राहणंच श्रेयस्कर आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. ‘ध्यान’ आपले विचार, भावना आणि क्रिया यांप्रति सजग ठेवण्यासाठी साहाय्यकारी ठरू शकतं. यासाठी आपण, ‘जाने दो’* या ध्यानाचादेखील लाभ घेऊ शकता. विचारांच्या वावटळीतूून स्वतःला अलिप्त ठेवण्याची सवय लावा आणि स्वतःला प्रश्न विचारा, ‘जीवनात उद्भवलेली ही समस्या आपल्या आयुष्यापेक्षाही अधिक महत्त्वाची आहे का?’ लक्षात ठेवा, समस्या ही तुमच्या आत्मविकासाची किल्ली आहे. त्याचबरोबर समस्येत दडलेल्या संधी आणि उपाय ओळखण्याची पात्रता मनुष्याने स्वतःमध्ये निर्माण करायला हवी.
मनुष्य जेव्हा आपल्या विचारांना सुयोग्य दिशा देण्यास सक्षम बनतो, तेव्हा तो समस्येतून मुक्त तर होतोच, शिवाय अन्य समस्याग्रस्त लोकांना मदत करण्यासाठीदेखील तत्पर बनतो. जसं, एखाद्या मनुष्याच्या नातेवाइकाचा मृत्यू कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने होतो, तेव्हा तो कॅन्सरने पीडित असणार्या रुग्णांसाठी काही अवैयक्तिक कार्य सुरू करतो. एखादा अनाथ मनुष्य स्वतःच्या दुःखाला निमित्त बनवून अनाथ बालकांसाठी अनाथाश्रम निर्माण करतो, तर एखाद्या शहीद सैनिकाचे आई-वडील सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी आपलं जीवन समर्पित करतात.
जगात अशी कितीतरी उदाहरणं आहेत, जी तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी निमित्त बनतील. तुम्ही जर आत्महत्येच्या विचारांनी त्रस्त असाल, तर प्रथम स्वतः यातून बाहेर पडायला हवं आणि मगच इतर लोकांना त्यांच्या अशा विचारांतून बाहेर काढण्यासाठी निमित्त बनायला हवं. तुम्ही अशा लोकांसाठी हेल्पलाइन सुरू करू शकता, त्यांच्यासाठी समुपदेशन किंवा ध्यान-मनन शिबिरांचं आयोजनही करू शकता. कारण विचारांशी सलगी, आसक्ती, हेच आत्महत्येचं प्रमुख कारण आहे. जगातील प्रत्येक विद्यार्थी, व्यावसायिक, शेतकरी आणि सगळे नागरिक स्वतःच्या विचारांना दिशा देण्याचं कौशल्य प्राप्त करतील, तेव्हा आत्महत्या करण्याच्या विचाराला थाराच मिळणार नाही, तो आपोआपच नष्ट होईल. इतकं सगळं करूनही जर त्याच्या मनात असे विचार येत असतील, तर त्या विचारांप्रति सजग होऊन त्यांना ध्यानासाठी आणि अनासक्तीसाठी तो निमित्त बनवेल.
~ सरश्रींच्या मार्गदर्शनावर आधारित
‘हा विषय सविस्तर जाणण्यासाठी आपण पुढील गोष्टींचा लाभ घेऊ शकता- :
(1) वॉव पब्लिशिंग्जद्वारे प्रकाशित, सरश्री लिखित खालील पुस्तकं वाचा-
a) मृत्यू उपरांत जीवन
b) निराशा से मुक्ति (हिंदी)
(2) यू ट्यूब लिंकद्वारे ऐका- ‘उम्मीद और विश्वास का जादू’, ‘नकारात्मक विचारों से मुक्ति कैसे पाएँ’, ‘सही समझ द्वारा मन की बड़बड़ से मुक्ति कैसे पाएँ’, ‘सदा खुश रहने का राज़’ और ‘जाने दो’* या मेडिटेशनचाही लाभ घेऊ शकता. या विषयावरील अधिक माहितीसाठी संपर्क साधा – मो. 9922081483
Add comment