This post is also available in: English Hindi
लीड : 12 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. कारण 152 वर्षांपूर्वी कोलकाता शहरात याच दिवशी एका बालकाचा जन्म झाला. पुढे आपल्या विशेष कार्याने आणि मौलिक विचारांमुळे हेच बालक ‘स्वामी विवेकानंद’ या नावाने विश्वविख्यात झालं. स्वामी विवेकानंदांचे विचार आणि त्यांचं कार्य आजच्या युवापिढीसाठी खूपच प्रेरणादायी आहे. हे औचित्य साधून सरश्रींनी आजच्या युवापिढीला केलेलं प्रस्तुत मार्गदर्शन-
अर्नेस्ट हेमिंग्वे नावाचा मुलगा अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून शाळेत प्रसिद्ध होता. एकदा शाळेत कथालेखन स्पर्था आयोजित करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना कथालेखनासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. स्पर्धेतील सर्वोत्तम कथालेखकाला खास बक्षीस देऊन, त्याचं कौतुक केलं जाणार होतं. ‘हे बक्षीस अर्नेस्ट हेमिंग्वेच पटकावणार,’ याविषयी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची खात्री होती. कारण अर्नेस्ट अतिशय हुशार विद्यार्थी तर होताच शिवाय त्याच्याकडे उत्तम कथालेखनाचं उत्कृष्ट कौशल्यदेखील होतं.
खुद्द अर्नेस्टलादेखील ‘हे बक्षीस मलाच मिळणार,’ असा विश्वास होता. ‘एवढीशी कथा लिहिण्यासाठी 15 दिवसांची गरजच काय? मला तर त्यासाठी केवळ एक दिवसही पुरेसा आहे.’ या विचाराने तो निश्चिंत राहिला. पण त्याचा हाच फाजील आत्मविश्वास त्याला नडला. तो इतका बेफिकीर झाला होता, की त्यानं 13 दिवसात कथेचा एक शब्दही लिहिला नाही. मग केवळ दोन दिवस शिल्लक असताना त्यानं घाईगडबडीत, निष्काळजीपणानं कशीबशी कथा लिहून शाळेमध्ये दिली. अर्थातच, इतक्या घाईगडबडीत लिहिल्यानं ती कथा सुमार दर्जाची झाली होती.
काही दिवसांनी स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली, तेव्हाही हेमिंग्वेला ‘हे बक्षीस मलाच मिळणार… ’ अशी आशा वाटत होती. मात्र स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आणि हे पारितोषिक हेमिंग्वेऐवजी दुसर्याच विद्यार्थ्याला मिळालं. त्यामुळे हेमिंग्वे व्यथित होऊन घरी परतला आणि पलंगावर पडून हमसून-हमसून रडू लागला.
हेमिंग्वेच्या मोठ्या बहिणीचं त्याच्याकडे लक्ष गेलं. ती हळूवारपणाने त्याची समजूत काढू लागली, ‘‘हे परितोषिक तुला मिळणार नाही, हे मला आधीच ठाऊक होतं, कारण कोणतंही काम अगदी शेवटच्या क्षणी करायची तुला सवय आहे. पण तू जर आधीपासूनच कथेचा आराखडा तयार करून लिहिण्याचे कष्ट घेतले असतेस, तर तुला निश्चितच हे पारितोषिक मिळालं असतं. आता, या घटनेतून योग्य तो बोध घे, पुन्हा या चुकीची पुनरावृत्ती करू नकोस. तरच तू पुढे जीवनात यशस्वी होशील, हे लक्षात ठेव.’’
या उपदेशानं त्या मुलाचे डोळे खाडकन् उघडले. त्याने स्वतःच्या या वाईट सवयीवर जाणीवपूर्वक मात केली आणि आश्चर्य म्हणजे हाच मुलगा पुढे ‘अमेरिकेतील प्रख्यात कादंबरीकार’ म्हणून प्रसिद्ध झाला. एवढंच नव्हे तर त्याच्या एका लघु कादंबरीला नोबेलसारखं सर्वोच्च पारितोषिकही मिळालं.
आजच्या युवा पिढीला अर्नेस्ट हेमिंग्वेच्या उदाहरणावरून खूप काही शिकता येईल. कारण आजच्या युवा पिढीमध्येही सफलता प्राप्त करण्याची पुरेपूर क्षमता आहे. परंतु फाजील आत्मविश्वास, निष्काळजीपणा, वेळेच्या नियोजनाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे बहुतांश युवक निर्धारित ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. खरंतर आजच्या नवयुवकांच्या हातात ‘टेक्नॉलॉजी’ सारखं उपयुक्त साधन असल्याने ते जगाच्या कानाकोपर्यापर्यंत पोहोचू शकतात. पण केवळ गॅजेट्समध्येच तासन्तास मग्न राहणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे का? केवळ पैसा मिळवून श्रीमंत होणं म्हणजेच यश, असं म्हणता येईल का? पैशांपलीकडेही एखादी महान, उच्च गोष्ट आहे का? याचा त्यांनी शोध घ्यायला हवा.
जीवनात खरं यश प्राप्त करणं म्हणजे काय, हे जाणून घ्यायचं असेल, तर युवकांनी आत्मनिर्भर होऊन स्वतःचं जीवन परिपूर्ण बनवायला हवं. या परिपूर्ण जीवनाची 5 प्रमुख पावलं समजून घ्यायला हवीत. या महत्त्वपूर्ण पाच पावलांवर मार्गक्रमण करूनच आजची पिढी आत्मनिर्भर बनू शकते… जीवनात यशस्वी होऊ शकते! ही पाच पावलं कोणती हे आता जाणून घेऊया.
पहिलं पाऊल – विश्वसनीयता
तुम्ही जे बोलता, तेच प्रत्यक्षात करता… जी कृती करता, त्याविषयीच विचार करता आणि जे विचार करता, तेच तुमच्या क्रियेतून प्रकट होतं! याचाच अर्थ तुमचे भाव, विचार, वाणी आणि क्रिया एकच असते, तेव्हा निसर्गाच्या सर्व शक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी सक्रिय होतात. कारण या सर्व बाबी अमलात आणल्यानेच आपण विश्वसनीय बनतो.
याउलट अविश्वसनीय माणूस नेहमी ‘वेळ नसल्याचा’ बहाणा देऊन, कार्याची टाळाटाळ करतो. परंतु त्यामुळेच तो लोकांच्या नजरेत अधिकाधिक अविश्वसनीय होतोय, हे त्याच्या लक्षातच येत नाही. कामाची टाळाटाळ करण्यात किंवा नानाविध बहाणे देण्यात त्याला काहीच गैर वाटत नाही. पर्यायानं बहाणेबाजी आणि अविश्वासाचं दुष्टचक्र चालूच राहतं.
लक्षात ठेवा, संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ सारखा अद्भुत ग्रंथ युवावस्थेतच लिहिला. समाजानं त्यांना बहिष्कृत केलं होतं तरीही त्यांनी एखादी सबब सांगून स्वतःचं कार्य अर्धवट सोडलं का? वास्तविक या विश्वातील अनेक शास्त्रीय शोध हे तरुण शास्त्रज्ञांनीच लावले आहेत. त्यांना ज्या अडचणींना, कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं, ते पाहून कोणताही सर्वसामान्य मनुष्य ध्येयापासून परावृत्त झाला असता. पण हे युवक मात्र आपापल्या शोधकार्यावर ठाम राहिले. अशा अनेक किशोरवयीन मुलांनी आणि युवकांनी विश्वामध्ये मोठं योगदान दिलं आहे. यातील बहुतेक युवकांकडे प्रामुख्यानं होती, ‘विश्वसनीयता आणि वेळेचं नियोजन करण्याची कला’.
दुसरं पाऊल – वेळेचं नियोजन करण्याची कला
तुमचं ध्येय जितकं मोठं असेल, तितकं अधिक वेळेच्या नियोजनामध्ये (ढळाश ारपरसशाशपीं)तुम्ही प्रावीण्य मिळवायला हवं. कारण योग्य नियोजनानंतरच आपल्याला उपलब्ध वेळेचा सदुपयोग करता येतो. म्हणून आपल्या मौल्यवान वेळेची कदर करा. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही. किंबहुना, वेळेचा अपव्यय करणं म्हणजेच जीवन व्यर्थ घालवणं होय.
कोणतंही कार्य वेळेवर पूर्ण केल्याने आपली विश्वसनीयता सिद्ध होते. पण होतं काय, अनेक छोटी छोटी कामं आपण नेहमी विसरून जातो. म्हणून ठरवलेली कामं लिहून, वेळोवेळी ती वाचणं अतिशय गरजेचं असतं. असं केल्याने कुठलंही काम आपल्याकडून राहून जात नाही. म्हणून कामाची लिखित नोंद ठेवण्याची सवय प्रत्येकानं जोपासायला हवी. यामुळेच लोकांच्या दृष्टीने आपण विश्वसनीय बनून त्यांचा आपल्याला पूर्ण सहयोग मिळतो.
तिसरं पाऊल – योग्य निर्णय घेण्याची कला
दैनंदिन जीवनात आपल्याला अनेकदा लहान-सहान निर्णय घेण्याची संधी मिळत असते. यातूनच ‘योग्य निर्णय घेण्याची कला’ आत्मसात होते. युवकांनी कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी ‘माझा सद्यस्थितीतील निर्णय ध्येयानुवर्ती आहे का?’ असा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. जेणेकरून ते स्वतःच्या ध्येयाविषयी अधिक सजग होतील.
समजा, आपण विशिष्ट वेळेत अभ्यास करायचं ठरवलं. पण, प्रत्यक्षात तेव्हा मित्रांशी गप्पागोष्टी करत बसला तर, तुम्ही योग्य निर्णय घेतला नव्हता असाच याचा अर्थ होतो. मग अभ्यासाचा वेळ मित्रांशी गप्पा मारण्यात घालवल्यानं आपल्या परीक्षेतील यशावर याचा परिणाम नक्कीच जाणवणार!
अनेकजण स्वतःच्या निर्णयाचा बारकाईनं विचारही करत नाहीत किंवा निर्णयाच्या परिणामांविषयी ते सजगही असत नाहीत. त्यामुळे कित्येकदा क्षणिक लाभासाठी ते चुकीचे निर्णय घेतात. अशा निर्णयांनी तात्पुरता आनंद जरी मिळाला तरी कालांतरानं मात्र त्याचे दुष्परिणामही भोगावेच लागतात. काही नवयुवक इंद्रियसुखांच्या लालसेपोटी असे काही निर्णय घेतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील बराचसा काळ खर्ची पडून, त्यांची ऊर्जाही नष्ट होते. त्यामुळे या वयात आपल्याकडे जो वेळ उपलब्ध आहे, त्यामध्ये स्वतःचं शरीर, मन आणि बुद्धीला योग्य प्रशिक्षण द्यायला हवं. हीच वेळ आहे, योग्य निर्णय घेण्याची!
समजा, एखादा युवक व्यायाम करण्याऐवजी त्या वेळेत टीव्हीवर क्रिकेट मॅच किंवा इतर कार्यक्रम पाहू लागला… व्यायामाला उद्यावर टाळू लागला… व्यायाम टाळण्यासाठी कारणं शोधू लागला तर त्याचे व्यायाम करण्याचे आजचे कष्ट वाचतील. शिवाय त्याला काही तात्कालिक सुखंही मिळतील. परंतु भविष्यात त्याचे दुष्परिणाम नक्कीच भोगावे लागतील! कदाचित, व्यायाम न केल्यानं तो लठ्ठ होईल किंवा त्याला एखादी शारीरिक व्याधीही जडेल. तात्पर्य, आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन तो अंमलातही आणायला हवा. आपण व्यायाम करण्याचा निर्णय घेतला तर विविध रोगांपासून बचाव तर होईलच शिवाय सुदृढ आरोग्याचाही लाभ होईल, हे निश्चित!
या सर्व उदाहरणांमधून आपल्या लक्षात आलं असेलच, की तुमचे लहान-सहान निर्णय योग्य ठरले तर आपोआपच मोठे निर्णयही योग्य असल्याचं सिद्ध होईल.
आज संपूर्ण जग स्वामी विवेकानंदांना अभिवादन करतं. कारण जीवनाचे काही सिध्दान्त त्यांनी ठरवले होते. या सिध्दान्तांचं कटाक्षानं पालन करत त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. त्यामुळेच ते जगासाठी वंदनीय ठरले. त्यांच्या जीवनात असे कित्येक कठीण प्रसंग आले, ज्यावेळी त्यांनी योग्य निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचं जीवन ‘परिपूर्ण जीवनाचं’ द्योतक ठरलं. ‘मला संसारातल्या सुखसोयी हव्यात की ईश्वर… ?’ असा मोठा निर्णय विवेकानंदांना युवावस्थेतच घ्यावा लागला. परंतु योग्य निर्णय घेतल्यानेच ते सफलतेचं अत्युच्च शिखर गाठू शकले. म्हणूनच आजदेखील त्यांचा 12 जानेवारी हा जन्मदिन संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
चौथं पाऊल – वृत्तींतून मुक्ती
स्वामी रामकृष्ण परमहंसांना एके दिवशी त्यांच्या शिष्यानं विचारलं, ‘‘आपण दररोज वापरत असलेला तांब्या का घासता?’’ त्यावर परमहंस म्हणाले, ‘‘रोजच्या रोज घासूनही हा तांब्या पुन्हा अस्वच्छ होतो. आपल्या अंतर्मनाची अवस्थाही अशीच असते. दररोज त्यावर कुसंस्कारांची मलिनता चढून ते अस्वच्छ होतं. म्हणून आपण आपलं अंतर्मन दररोज सुसुंस्कारांनी आणि सद्विचारांनी स्वच्छ करायला हवं. तेव्हाच ते पुन्हा पूर्वीसारखंच शुद्ध, निर्मळ होऊन चमकत राहील.’’
या उदाहरणातून आपल्याला वृत्तींमधून, चुकीच्या सवयींतून मुक्त होण्याचं महत्त्व समजतं. कारण प्रत्येक युवकात काही ना काही चुकीच्या सवयी किंवा वृत्ती असतातच. जसं, एखादं व्यसन लागणं, वासनेत गुंतणं, फेसबुकसारख्या सोशल मिडीयावर वेळ वाया घालवणं, आर्थिक नियोजनाचा अभाव, इच्छांचा गुलाम होणं, सकाळी उशीरा उठणं, नियमित व्यायाम न करणं, महत्त्वाची कामंही निर्धारित वेळेनंतर पूर्ण करणं, स्वतःच्या अपयशाचं खापर इतरांवर फोडणं इत्यादी.
या वाईट सवयींवर युवकांनी दृढनिश्चयानं मात करायला हवी. कारण माणसानं भौतिक विश्वात कितीही मोठं यश मिळवलं तरी जोवर त्याचं अंतर्मन अशा वृत्तींमधून मुक्त होणार नाही, तोवर ते यश अपूर्णच राहील. पर्यायानं त्याला जीवनात पूर्णतेची जाणीव कधीच होऊ शकणार नाही. म्हणून आपल्या वाईट वृत्ती ओळखून त्यावर मात करण्याचा उपाय शोधा आणि आजपासूनच तो अमलात आणा.
‘प्रत्येक व्यसन हे मानसिक दुर्बलतेचं लक्षण आहे’ हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं.
पाचवं पाऊल – प्रामाणिकपणा
सर सी. वी. रमण यांनी सन 1949मध्ये ‘रमण रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या संस्थेमध्ये ‘विज्ञान साहाय्यक’ या पदासाठी अनेकजण इच्छुक होते. सर्वांचा इंटरव्ह्यू घेतला गेला. ज्यांची निवड झाली नव्हती, अशांना परत जाण्यास सांगण्यात आलं. त्यातील एकजण रमणसरांकडे येऊन म्हणाला, ‘‘सर, आपल्या ऑफिसकडून मला नजरचुकीने जास्तीचा प्रवास खर्च देण्यात आला. तो परत करण्यासाठी मी आलोय.’’ हे ऐकताच रमण त्या युवकाला म्हणाले, ‘‘तुझ्या प्रामाणिकपणानं मी अत्यंत प्रभावित झालोय. आता हे पद तुलाच मिळेल याची खात्री बाळग. तुझं भौतिकशास्त्र कच्चं असलं तरी त्यानं काहीच फरक पडत नाही. ते मीदेखील तुला शिकवू शकतो. पण तू एक चारित्र्यवान मनुष्य आहेस, हे अधिक महत्त्वाचं आहे आणि मला संस्थेसाठी चारित्र्यवान माणसंच हवी आहेत.’’ रमणसरांचा हा निर्णय योग्य असल्याचं पुढे त्या युवकानं सिद्ध केलं.
लक्षात ठेवा, युवावस्थेत सफलता प्राप्तीसाठी आवश्यक असणारं पाचवं पाऊल म्हणजे- ‘प्रामाणिकपणा’. प्रामाणिक राहिल्यानं आपल्या 70% पेक्षा अधिक समस्या सहजतेनं सुटू शकतात. त्यासाठी आजपासूनच स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केलात, तर पुढे जाऊन निश्चितपणे चारित्र्यवान बनण्यात यशस्वी व्हाल. पूर्वी कधीही नव्हती, इतकी अधिक गरज आज विश्वाला जाणवतेय ती ‘प्रामाणिक लोकांची’. ही गरज युवकच पूर्ण करू शकतील, यात शंकाच नाही.
स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जीवनात सदैव गुणांच्या विकासालाच प्राधान्य दिलं. त्यामुळेच 152 वर्षांनंतरही, अत्यंत आदरानं आणि सन्मानानं त्यांचं स्मरण केलं जातं. आपल्याही जीवनात अशीच संपूर्ण सफलता आणि परिपूर्णता यावी, याच शुभेच्छांसह हॅपी नॅशनल युथ डे… हॅपी थॉट्स!
Add comment