This post is also available in: English Polish
आज जिकडे बघावं तिकडे, सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार दिसून येतो. सगळीकडे भ्रष्टाचाराची चर्चा ऐकू येते. पण तुम्हाला माहित आहे का, की या सगळ्यातील मोठा भ्रष्टाचार कोणता? हा भ्रष्टाचार सकाळपासून रात्रीपर्यंत, अगदी दिवसभर सर्रास चाललेला असतो. इतकंच नव्हे तर या भ्रष्टाचारात जवळ जवळ सगळेच लोक गुंतलेले असतात. हा भ्रष्टाचार मानवजातीसाठी अत्यंत हानीकारक असतो. मग हा सर्वात मोठा आणि अविरत चाललेला भ्रष्टाचार आहे तरी काय? आणि तो चालतो तरी कुठे? हा भ्रष्टाचार चालतो आपल्या स्वत:च्या मनात. आपलं मन आपल्या अंतर्मनातल्या सेल्फला, ईश्वराला जागृत होण्याची आणि सातत्यानं अभिव्यक्त होत रहाण्याची संधीच मिळू देत नाही, हाच तो सर्वात मोठा भ्रष्टाचार! आपलं बाह्य मन आपल्या अंतर्मनाला वाटेल त्या विचारांत गुंतून ठेवतं. याचा परिणाम म्हणजे आपल्या सेल्फला, आपल्या सत्य जाणीवेला अभिव्यक्त होण्याची संधीच मिळत नाही. हे सत्य आणखी स्पष्टपणे जाणून घेऊया-
अध्यात्माच्या मार्गावरचे बरेच साधक, आपलं बाह्य मन ज्ञानसंपन्न करण्यावर लक्ष केंद्रित करतात. पण हे ज्ञान वरवरचं ठरतं. कारण ते अंतर्मनापर्यंत झिरपत नाही. ज्ञान मिळवणं हा आरंभ बिंदू असला तरी सत्य जाणून घेण्यासाठी आणि सत्यावर अढळ राहाण्यासाठी तेवढंच पुरेसं नसतं. केवळ ज्ञान मिळवल्यानं सत्याची अभिव्यक्ती होत नाही. शिवाय भ्रष्टाचाराला नेमकी कुठून सुरूवात होते हे ही कळत नाही. म्हणजे नक्की काय होतं, हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊया-
एका जंगलात खूप मोठा खजिना दडवून ठेवला होता. त्या जंगलातल्या आदिवासी लोकांनी अनेक पिढ्यांपासून तो खजिना साठवलेला होता. तो खजिना सतत वाढतच होता कारण सर्व आदिवासी लोक त्या खजिन्यात त्यांना जमेल तेव्हा आणि जमेल तेवढी भर घालत होते. आसपासच्या चोरांना त्या खजिन्याची माहिती होती आणि त्यांचा त्या खजिन्यावर डोळा होता. ते खजिना लुटण्याची संधीच शोधत होते. त्यामुळे खजिन्याचं रक्षण करणं आवश्यक होतं. मग आदिवासींनी त्यांच्यातल्याच एका माणसाला आणि त्याच्या मुलाला खजिन्याचे रक्षक म्हणून नेमलं. तो माणूस होता अंध आणि त्याचा मुलगा होता बधीर.
त्या माणसाला दिसत नसलं तरी त्याच्या पंचेंद्रियांतली बाकीची चार इंद्रियं चांगलं काम करत होती. आसपास झालेली हालचाल त्याला लगेच जाणवत असे. त्यामुळे आदिवासींनी त्याला बाकीची चार इंद्रियं वापरून चोरांना पळवायचं प्रशिक्षण दिलं होतं. चोर आले आहेत असं जाणवलं तर जोरात ओरडायचं, तोंडानं आवाज काढायचे किंवा स्वत:कडची बंदूक उडवून चोरांना पळवून लावायचं. समजा, आदिवासी खजिन्यात भर घालायला आले तर टाळ्या वाजवून त्यांना खजिन्याजवळ जायची परवानगी द्यायची. पण मुळात दिसतच नसल्यानं कधी काय करायचं आणि कधी काय नाही हेच त्याला कळत नसे. कधी कधी अगदी या उलटंही होत असे. जेव्हा आदिवासी लोक खजिन्यात भर घालायला येत असत तेव्हा तो अंध माणूस ओरडून आणि बंदूक उडवून त्यांना ही घाबरवत असे, पळवून लावत असे. जेव्हा खजिना लुटायला चोर येत असत तेव्हा मात्र तो टाळ्या वाजवून त्यांना खजिन्याजवळ जायची परवानगी देत असे. अंध माणसाचा मुलगा सर्व काही पाहू शकत होता, पण नेमकं काय घडत आहे याकडे त्याचं लक्षच नसे. अंध वडील आणि त्यांचा बधीर मुलगा असे रक्षक असल्यावर त्या खजिन्याचं काय होणार? खजिना वाढायचा थांबला. उलट दिवसेंनदिवस त्यात घटच होऊ लागली.
या उदाहरणातला खजिना हे जाणीवेचं प्रतीक आहे.खरंतर प्रत्येकालाच ती जाणीव प्राप्त करता येते. आपली जाणीव जागृत करून आपण ती वाढवू शकतो. पण आज ही जाणीवच नष्ट होत चालली आहे.कारण प्रत्येकाच्या मनात एक अंध माणूस आणि त्याचा बधीर मुलगा वास्तव्याला आले आहेत. त्यांच्यामुळे प्रत्येकाच्याच मनातला हा जाणीवेचा खजिना लुटला जात आहे. आज मानवतेला मोजावी लागणारी हीच सर्वात मोठी किंमत आहे. अंध माणूस हा सुप्त मनाचं, अंतर्मनाचं प्रतीक आहे. तर बधीर मुलगा हे आपल्या जागृत मनाचं, बाह्य मनाचं प्रतीक आहे.
आपलं बाह्य मन हे अंतर्मनाच्या खूप नंतर विकसित होतं. त्यामुळे अंतर्मन हे बाह्यमनापेक्षा ज्येष्ठ असतं. म्हणून इथे बाह्य मनासाठी मुलगा आणि अंतर्मनासाठी त्याचे वडील अशी रचना केलेली आहे. व्यक्ती जन्मते त्याच क्षणी तिचं अंतर्मन विकसित होऊ लागतं. म्हणूनच तर मनुष्यावर बालपणी जे संस्कार होतात, जे शिक्षण दिलं जातं, त्याचा परीणाम पुढे त्याच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो. माणूस त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर त्याच्या लहानपणच्या संस्कारांनुसारच प्रतिक्रिया देत असतो. कारण अंतर्मनाची रचना काही निश्चित प्रतिक्रियांसह केलेली असते. त्या रचनेनुसार ते कार्य करत असतं. अन्य गोष्टी जाणून घेतच नाही. म्हणूनच इथे त्याला अंध म्हटलेलं आहे. बाह्य मन हे अंतर्मनाच्या खूप नंतर विकसित होऊ लागतं. शिवाय त्याला अंतर्मनाच्या कार्यपद्धतीची माहीती नसते. अंतर्मन ठराविक प्रतिक्रियांवरच कार्य करतं हे त्याला माहीत नसतं. अंतर्मनाला नवी दृष्टी द्यायची असेल, त्याला जागृत करायचं असेल तर त्यासाठी बाह्यमनाची मदत घ्यावी लागते. बाह्य मनाचं ज्ञान वाढवावं लागतं आणि अंतर्मनाला नवी दृष्टी द्यावी लागते. त्याचं अनावश्यक गोष्टीत गुंतणं थांबवून त्याला योग्य दिशा द्यावी लागते. योग्य प्रकारे केलेल्या ध्यान धारणेमुळे हे साध्य होऊ शकतं. ध्यानामुळे अंतर्मन आणि बाह्यमन यांच्यात समन्वय साधता येतो. यासाठी अंतर्मनाला योग्य ध्यानाचा नियमीत सराव देत राहाणं आणि बाह्य मनाला सातत्यानं ज्ञान देत राहाणं आवश्यक असतं. ध्यान अयोग्य प्रकारे केल्यावर किंवा अयोग्य ज्ञान प्राप्त केल्यावर माणसाचा जो आचार-विचार बनतो तो असतो भ्रष्टाचार. तेव्हा आता स्वत:ला विचारून बघा की, तुमच्या अंतर्मनाला आणि बाह्य मनाला योग्य ते प्रशिक्षण मिळत आहे का? जर दोन्ही मनांना असं योग्य प्रशिक्षण मिळत नसेल तर तत्काळ त्याची सुरूवात करा. कारण दोन्ही मनांना योग्य प्रकारे प्रशिक्षित करून विश्वातला सर्वात मोठा भ्रष्टाचार टाळता येऊ शकतो आणि जाणीवेच्या खजिन्याचं संवर्धन होतं.
4 comments
pravin khare
Very Nice
Dhnywad Sirshree
Mahesh Sonawane
Very much awakening….
Dhanyawad
Please send more…
Sagar
Dhanywad to GetHappyThoughts website! Please keep posting such beautiful posts!
jalindar landge
Dhanywad sirshree Great shifting