This post is also available in: Hindi
कर्म म्हणजे काय? मनुष्याच्या कर्मांनुसार त्याला त्याचं फळ मिळतं का? ‘करावं तसं भरावं’ ही म्हण तुम्हाला माहीत असेलच. पण खरंच असं घडतं का? यामागे कोणतं रहस्य दडलंय?
अशा प्रकारे मनुष्याच्या मनात कर्मासंबंधी अगणित प्रश्न निर्माण होतात. कधी त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात, तर कधी मिळतच नाहीत किंवा ती समाधानकारक तरी नसतात.
कर्माच्या बाबतीत जर सहज सुलभ भाषेत ज्ञान मिळालं, तर प्रत्येक जण आपल्या कर्मांना योग्य दिशा देऊन, त्याद्वारे उत्तम फल प्राप्त करू शकतो. चला तर मग हा विषय गहनतेनं समजून घेऊ या.
मनुष्याच्या जीवनात त्याच्यावर ज्या अनेक कृपा होतात, त्यांपैकी सर्वांत मुख्य कृपा आहे, मनुष्यजन्म मिळणं. मनुष्यजीवन असा चमत्कार आहे, जिथे ईश्वरीय कृपांची, ईश्वरीय खेळाची, ईश्वराच्या लीलेची, इतकंच नव्हे, तर आपण स्वतःच ईश्वर असल्याची अनुभूती त्याला मिळू शकते. अनंत शक्यतांनी भरलेल्या या जीवनात ईश्वराच्या, सत्याच्या मार्गावर वाटचाल करण्याऐवजी मनुष्य भाग्य-नशीब-कर्मरेषा अशा गोष्टींमध्ये अडकतो. त्यामुळे तो अस्सल कर्म म्हणजे काय? त्याचं फळ कशा प्रकारे येतं? या महत्त्वपूर्ण बाबी समजूच शकत नाही. एकदा का तुम्ही कर्म आणि त्याद्वारे मिळणारं फळ यांच्याविषयीचं वास्तव जाणलं, की तुमचं कर्म सजगतेसह होईल. परिणामी त्याचं फळदेखील सर्वोत्तमच मिळेल.
कर्म आणि त्याचं फळ
प्रत्यक्षात काही कृती केली तरच ते कर्म अशी कित्येक लोकांची धारणा असते. कर्माविषयी क्रिया करण्याच्या दृष्टिकोनातूनच असा विचार केला जातो. परंतु वास्तव असं नाही. कर्म तर निरंतर होतच राहतं. कर्माविना कोणी राहूच शकत नाही. मग जरी तुम्ही प्रत्यक्षात कर्म करत असाल किंवा अप्रत्यक्षपणे करत नसाल तरी कर्म न करून तुम्ही कर्म न करण्याचंच कर्म करत असता. त्यामुळे त्याचं फळ तर मिळणारच असतं.
समजा, कोणी असा विचार केला, ‘मी जीवनभर कोणतंही कर्म केलं नाही. ना काही चांगलं केलं ना वाईट. त्यामुळे मला स्वर्गही मिळणार नाही आणि नरकही मिळणार नाही.’ परंतु असं घडत नाही. मनुष्याकडून कर्म करण्याचं अथवा न करण्याचं कर्म हे घडतच असतं. याला अशा प्रकारे समजून घेता येईल, की तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला किंवा घेतला नाही, तरीही त्याचं फळ मिळणारच असतं.
कर्म करताच त्याचं फळ मिळायला सुरुवात होते. जसं, आगीत हात घातला आणि तो भाजतो. खरंतर विषय तिथेच संपला. परंतु काही कर्मांचं फळ दिसायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे कर्माचं फळ मिळायला बराच कालवधी लागतो, अशी धारणा बनली आहे. त्यासंबंधी काही कथा अशाही बनवल्या गेल्या, की एका मनुष्याने चौदा जन्मांच्या आधी असं काही कर्म केलं होतं, ज्याचं फळ त्याला चौदा जन्मांनंतर मिळालं. अशा प्रकारे कर्म आणि त्याचं फळ यांच्याविषयी अशा बर्याच कहाण्या बनवल्या गेल्या आहेत. त्या कहाण्यांमध्ये मनुष्याच्या जीवनात घडणार्या वाईट घटनांचा संबंध त्याच्या पूर्वजन्मांचा परिणाम… भाग्याचा फेरा किंवा दुर्दैव अशा बाबींशी जोडला गेला. जसं, एखादा भरपूर अभ्यास करूनही परीक्षेत नापास झाला, तर त्याचं नशीब खराब होतं, असं कोणी म्हणतं. दुसर्या बाजूला एखाद्याने अजिबात अभ्यास केला नाही, तरीही तो पास झाला, तर त्याचं दैव बलवत्तर म्हणून तो पास झाला, असं समजलं जातं. परंतु अशी विधानं केवळ मानसिक समाधान मिळावं, शांती लाभावी यासाठीच केली जातात. मग वास्तव काय आहे? कर्म करण्याचं फळ मिळत नाही, तर मग कोणत्या गोष्टीचं फळ मिळतं? कर्म जर बंधनात अडकवत नाही, तर मग बंधनाचं कारण काय असतं? या प्रश्नांची उत्तरं मुळापासून जाणली, तर लोकांचा कर्माविषयीचा गुंता सुटेल.
कर्माचा हेतूच फळ आणतो
आजपर्यंत प्रत्येक कर्मामागे तुम्ही जो हेतू ठेवला, त्याचंच फळ तुम्हाला मिळालं आहे. परंतु हेतू नक्की काय आहे, हे जाणणं अतिशय गरजेचं आहे. माणसाचं मन जेव्हा कपट कारस्थानांनी भरलेलं असतं, तेव्हा तो अतिशय संभ्रमावस्थेत असतो. जागृतीमध्ये तो वेगळा हेतू बाळगतो. तर बेहोशीत त्याचा हेतू भलताच असतो. वाणीद्वारे तर तो बोलतो, ‘अमुक घडावं’ परंतु बेहोशीत विचार करतो, ‘असं अजिबात घडू नये.’ अशा रीतीने मनुष्याकडे कोणत्याही कामामागे किमान दोन हेतू असतात.
जसं, एक मनुष्य म्हणतो, ‘प्रमोशन मिळावं.’ परंतु नकळत तो विचार करतो, ‘प्रमोशन मिळाल्यानंतर जी जबाबदारी येईल, ती मी पेलू शकेन का? कदाचित ती मी पार पाडू शकणार नाही, असं वाटतं.’ वास्तविक तो मनुष्य प्रमोशनसाठी सतत प्रयत्नही करत असतो. परंतु त्याच्याऐवजी दुसर्यालाच प्रमोशन मिळतं. मग तो म्हणतो, ‘मला प्रमोशन मिळायला हवं होतं, पण का मिळत नाही कोण जाणे?’ कारण अजाणतेपणी त्याचं इंटेन्शनच असं आहे, की प्रमोशन मिळायला नको.
अशा प्रकारे दोन उद्दिष्टं, भिन्न भिन्न उद्दिष्टं ठेवणारांचं जीवन खंडित होतं, विभागलं गेलेलं असतं. त्याचं मन, बुद्धी आणि शरीर काही वेगळंच सांगत असतात आणि तो दुसरंच काहीतरी ऐकत असतो. परिणामी त्याचं उद्दिष्ट वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागलं जातं, त्यांच्यात जराही ताळमेळ नसतो. त्यामुळे त्याच्यात प्रामाणिकपणाचा अभाव निर्माण होतो. त्याचा स्वतःच्या उद्दिष्टांशी ताळमेळ नसल्याने बाह्य कर्मांमागील हेतू समजून येत नाही. बाह्य रूपात लोकांची क्रिया वेगळीच दिसते. परंतु वास्तवात त्यांचा भाव तसा नसतो.
अशा वेळी कोणती इच्छा पूर्ण होते? जे उद्दिष्ट अतिशय तीव्र असतं, तीच इच्छा पूर्ण होते. यासाठी हेतू शुद्ध, सहज, सरळ आणि एकच असण्याची आवश्यकता असते. एखादी इच्छा निर्माण झाल्यावर आपल्याला नेमकं हीच गोष्ट हवीय, की आत आणखी काही वेगळंच चाललंय हे जाणणं अतिशय गरजेचं असतं.
नेहमी एकच उद्दिष्ट असावं
तुमचं उद्दिष्ट नेमकं काय आहे, हे जाणण्यासाठी तुमची वाणी जे बोलतेय, त्याप्रमाणेच क्रिया घडत आहे का, हे तुम्ही सजग राहून पाहायला हवं. जी क्रिया होत आहे, तसाच विचार आहे का? जो विचार आहे, तोच भाव आहे का? आणि जे तुमचे भाव आहेत, तेच वाणीद्वारे प्रकट होत आहेत का? अशा प्रकारे भाव, विचार, वाणी आणि क्रिया या चारही पातळ्यांवर तुमचं एकच इंटेन्शन असेल, तर त्याच्या फळाद्वारे तुम्हाला आनंदच मिळेल. यासाठी वारंवार सजग राहून स्वतःच्या इंटेन्शनवर कार्य करत राहायला हवं. ज्यायोगे तुम्ही एकाच दिशेने कार्यरत राहाल, एकाच इंटेन्शनवर ठाम राहाल.
बंधनांचं कारण – वृत्ती
तुमचा मौल्यवान वेळ घरच्या लोकांसाठी देऊन त्यांच्या चेतनेचा स्तर वाढावा अशी तुमची इच्छा असते. तुमचा हा उद्देश अतिशय चांगला आहे आणि तो तुमच्या विचारांमध्येदेखील आहे. मग या उद्दिष्टपूर्तीसाठी तुम्ही कुटुंबीयांशी चर्चा सुरू करता. पण त्यावेळी असं काही तरी घडतं, ज्याने तुमच्या रागाचा पारा चढतो. साहजिकच तुमच्या चेतनेचा स्तर खालावतो. मग तुम्ही बेहोशीमध्ये असं काही बोलता, की तुमच्या प्रामाणिक उद्दिष्टावर पाणी पडतं. पाहिलंत आपण! भाव आणि विचार या दोन्ही पातळ्यांवर उद्दिष्ट एक असूनही वाणी आणि क्रिया भिन्न असल्याने त्याचा परिणाम कसा दुःखदच येतो!
अशा प्रकारे बेहोशीत वारंवार एकच कर्म केल्याने तशी वृत्ती तयार होते. जसं, रागात एखाद्याला वेडंवाकडं बोलणं, काम टाळणं, जबाबदारी टाळणं, इतरांमध्ये सतत दोष पाहणं इत्यादी गोष्टी करत राहिल्याने तशीवागण्याची सवयच जडत जाते. पुढे जाऊन ही सवयच (वृत्ती) बंधनाचं कारण बनते. यासाठीच वृत्ती (टेन्डसीज) कशा तोडाव्यात याचा अभ्यास करणं अत्यावश्यक ठरतं. कारण वृत्तींमधून बाहेर आल्यानंतरच तुमचं इंटेन्शन एक होईल आणि त्यानंतर जे फळ मिळेल, ते निःसंशय मधुरच असेल यात शंका नाही.
सर्व पातळ्यांवर एकच इंटेन्शन ठेवल्याने तुमच्या अपेक्षेनुसार कर्मांचा परिणाम लाभू शकतो, हे आता तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल. त्याचबरोबर तीच ती चूक पुनःपुन्हा करण्याची वृत्ती तुमच्यासाठी कर्मबंधन तयार करते. या दोन मूळ गोष्टी समजल्यानंतर आणखी एक मुख्य बाब तुम्ही लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे कर्मसिद्धान्त अथवा कर्मनियम.
कर्मनियम/कर्मसिद्धान्त
आपण एखादं कर्म केलं अथवा आपल्याकडून करवून घेतलं गेलं, त्याचं फळ आज आपण भोगत आहोत, असं नाही. हे आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल. अशा उत्तरांनी केवळ दिलासा मिळतो. प्रत्यक्षात पृथ्वी निर्माण झाल्यानंतर जे नियम बनवले गेले, ते कर्माचे नियम आहेत. परंतु हे नियम प्रेमापोटी, अगदी हसत-खेळत बनवले गेले. कारण प्रेमामुळेच या विश्वाचं चलनवलन सुरू आहे. यासाठीच आज आपल्याला गरज आहे, ती चुकीच्या वृत्ती तोडून चांगल्या सवयी अंगीकारण्याची! जसं, शाळा-कॉलेजमध्ये परीक्षेला कोणी वाईट कर्म असं म्हणत नाही. परंतु समस्या आली, की तिला वाईट म्हणतात. असं का? तसं पाहिलं तर तीदेखील एक प्रकारे परीक्षाच आहे, तुमची पारख करण्याचं साधन आहे. या परीक्षेत तुम्ही समजेचं (अंडरस्टँडिंगचं) कार्य करत राहाल, तर निर्मळ बनत जाऊन पुढे मार्गक्रमण करत राहाल. त्यानंतर कर्म आणि त्याच्या भाग्यातून मुक्त होऊन तुम्ही पूर्ण समजेसह तुमचं कार्य करत राहाल.
~ सरश्रींच्या मार्गदर्शनावर आधारित
हा विषय सविस्तर जाणण्यासाठी आपण पुढील गोष्टींचा लाभ घेऊ शकता :
(1) वॉव पब्लिशिंग्जद्वारे प्रकाशित सरश्री लिखित खालील पुस्तकं वाचा – कर्मात्मा आणि कर्मसिद्धान्त’ आणि ‘कर्मयोग नाइन्टी.’
या विषयावरील अधिक माहितीसाठी संपर्क साधा – मो. 9922081483
Add comment