This post is also available in: Hindi
‘भीती’ केवळ हा शब्द ऐेकताच आपली छाती धडधडू लागते, हृदयाची स्पंदनं वाढतात, हात-पाय थरथरू लागतात, शरीराला दरदरून घाम फुटतो आणि निर्णय घेण्याची क्षमतादेखील संपुष्टात येते. ‘भीतीची भीती’ ही साधारणतः सर्वांनाच असते. कारण आजपर्यंत आपण भीतीला भीतच आलो आहोत. परंतु आता आपण भीतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. ज्यायोगे आजपासून तुम्ही म्हणू शकाल,‘भीती, तू तुझं काम कर… आणि मी माझं…’ त्याचप्रमाणे भीती वाटल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, हेही आता आपण जाणून घेऊ या.
* भीती काय आहे
भीती केवळ एक ‘विचार’ आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जसं, ‘असं घडलं तर… कधी असं घडू नये… मी मरणार तर नाही ना… मी इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो नाही तर… पेपर लिहिताना मला उत्तर आठवलं नाही तर…’ बस्स, अशा एका भीतिदायक विचाराने मनुष्य मनात एक चित्र तयार करतो, ज्यात तो एक विचार दृश्यरूप घेताना पाहतो आणि त्यानुसार त्याच्या जीवनात तशाच घटना आकर्षित करतो. जसं, एका मनुष्याने वर्तमान पत्रात हृदयद्रावक अपघाताची बातमी वाचली आणि त्याच्या मनात भीती निर्माण झाली, कुठे माझ्या बाबतीतही असं घडू नये! एखादा मनुष्य आपल्या नातेवाइकाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जातो. तिथे जाऊन तोे नातेवाइकाच्या आजाराची लक्षणं जाणून घेतो आणि विचार करू लागतो, ‘अरे! ही लक्षणं तर माझ्यातही आहेत. म्हणजे मलासुद्धा हा आजार आहे का? असा विचार येताच तो मनोमन अतिशय घाबरतो. परंतु अशा विचारांप्रति सजगता वाढवणे आणि भीतीच्या विचारांचा योग्य प्रकारे उपयोग करणे हाच भयावर मात करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
* भीती भाड्याने आणा
आपल्याला जेव्हा भय वाटेल, तेव्हा ते भाड्याने आणलं आहे, असा विचार केला तर भीती कुठल्या कुठे पळून जाईल. कारण हे भयच आपल्याला वारंवार सांगत असतं, ‘तुला यश मिळणारच नाही… तुला असंच जगावं लागेल… हे तर तुला जमणारच नाही…’ असं ऐकताच तुम्ही अतिशय घाबरून जाता. परंतु त्यावेळी जो मनुष्य तुम्हाला अशा भयप्रद विचारांनी घाबरवत असतो, ते विचार तुम्ही भाड्यावर आणले आहेत, असं समजा. आपण एखादी वस्तू जेव्हा भाड्याने आणतो, तेव्हा आपण तिचे मालक आणि ती आपली नोकर बनते. भीतीबाबतही अगदी असाच विचार करायचा आहे. जणू आपण भीतीचे मालक आहोत आणि तिला भाड्याने आणलंच आहे, तर तिचा योग्य उपयोग कसा करायचा, हे आपणच नको का ठरवायला?
अशा प्रकारे आपल्या विचारांमध्ये जसजशी सकारात्मकता वाढू लागेल, तसतसं आपण भयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकाल, की भीतीला योग्य प्रकारे समजून घ्याल. आता जर इतरांच्या विचारांद्वारे आपण भय भाड्याने आणलं आहे, तर ते का आणलं आहे? त्यामागे काय उद्देश आहे? यांवर जेव्हा तुमचं मनन होईल, तेव्हा आपण भयाकडे स्पष्ट, स्वच्छ दृष्टीने पाहू शकाल.
* आपल्यातील साहस दर्शवण्यासाठी भयाची आवश्यकता
मनुष्यात जेव्हा भय निर्माण होतं, तेव्हा त्याच्यात किती साहस आहे ही गोष्ट आपोआपच समजते. म्हणून भय निर्माण होताच सर्वप्रथम त्याचा स्वीकार करायला हवा. त्याच्याशी संघर्ष करत बसता कामा नये. ‘भय का आलं… त्याने यायला नको होतं…’ अशा प्रकारे त्याच्याशी वादविवाद करत राहिलात, तर ते आणखी वाढत जाईल आणि तुमची पाचावर धारण बसेल. त्यासाठी प्रथम भयाचा स्वीकार करा आणि हे भय आपल्याद्वारे कोणतं काम करण्यासाठी आलं आहे, हे जाणून घ्या.
सर्वसाधारणपणे लोकांना स्टेजवर जाण्याची अतिशय भीती वाटते. स्टेजवर जाताच त्यांचे हात-पाय थरथर कापू लागतात, पोटात भीतीचा गोळा उठतो, घसा कोरडा पडतो, त्यावेळी ही परिस्थिती, ही भयाची लक्षणं त्यांचं साहस वाढवण्यासाठी, त्यांना निर्भय बनवण्यासाठी आली आहेत असं समजायला हवं. कारण नियतीची इच्छा असते, की काही भीतिदायक गोष्टींना न घाबरता मनुष्याने स्वतःमधील धैर्य वाढवून त्यांचा सामना करावा.
* भीतीचे लाभ पाहायला शिका
एखादा मनुष्य जेव्हा घाबरतो, तेव्हा खरंतर ती त्याची त्यावेळची आवश्यकता असते. जसं, परीक्षेची भीती वाटते, म्हणूनच अभ्यास होतो. समजा कुणाला स्वतःच्या स्वास्थ्याप्रति भय वाटत असेल, ‘मला हा आजार होऊ नये… मला आनुवंशिक आजार जडू नये…’ तेव्हा हे वारंवार येणारे विचारच मनुष्याला आपल्या स्वास्थ्याप्रति सजग करतात. मग स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून मनुष्य प्राणायाम, विचारायाम आणि मौनायाम यांचं पालन करू लागतो. स्वास्थ्यासाठी सात्त्विक, हितकारक असा योग्य आहार घेऊ लागतो. प्रसंगी स्वास्थ्याविषयी मनात काही शंका असतील, तर डॉक्टरांचं मार्गदर्शनही घेतो. असं करत असताना आपोआपच त्याचं स्वास्थ्य सुधारत जातं, त्याच्या विचारांमध्ये परिवर्तन येऊ लागतं आणि आश्चर्य म्हणजे हळूहळू आजाराविषयी असलेलं त्याचं भयदेखील नष्ट होतं.
एखाद्याला नेहमी मृत्यूचं भय सतावत असतं. मी मरणार तर नाही ना? जर माझा मृत्यू झाला तर काय होईल? तेव्हा हे भयच मनुष्याकडून शोध करवून घेतं आणि मनन केल्यानंतर त्याच्यासमोर वास्तव, सत्य प्रकटतं. मृत्यूचं भय बाळगणार्या मनुष्याने मृत्यूवर मनन करायला हवं, ‘मी कोण आहे?’ ही समज अनुभवाद्वारे प्राप्त करायला हवी. त्यानंतर त्याच्या लक्षात येईल, की खरंतर मृत्यू नाहीच. मृत्यू तर केवळ धोका आहे. कारण मनुष्याचं जीवनच पृथ्वीपर्यंतच मर्यादित नसतं. परंतु पृथ्वीवर मनुष्याचं शरीर हीच त्याची ओळख असते. त्यामुळे शरीराशी तो आसक्त असतो. ‘हे शरीर, ही व्यक्ती माझ्यासोबत असली तरच मी जगू शकतो, अन्यथा नाही.’ ही गोष्ट मनुष्याच्या मनात कुठे न कुठे घर करून बसलेली असते. कारण त्याच्या सभोवताली सगळे मृत्यूला घाबरलेलेच लोक असतात. वास्तवात मृत्यूला इतर घटनांप्रमाणेच बघण्याची आवश्यकता असते. मृत्यूविषयी योग्य समज असेल, तर त्याविषयी असणारं सगळं भय नष्ट होईल आणि मग आपणच म्हणाल, ‘आता मला कधीही मृत्यू आला तरी चालेल. कारण मी त्यासाठी तयार आहे.’ अशा प्रकारे भय आपल्यातील कमतरतांवर मात करायला शिकवतं. म्हणून त्याचा स्वीकार करा, त्याचा लाभ घ्या. जेणेकरून भयाचं
बळ हळूहळू विलीन होऊ लागेल. त्याचबरोबर आपल्या आवश्यकतेनुसारच हे भय आलं आहे, ही समज बाळगा. जेव्हा आवश्यकता नष्ट होईल, तेव्हा भयदेखील आपोआपच संपुष्टात येईल.
* भयमुक्त होण्यासाठी कल्पनाचित्राचा उपयोग करा :
या कल्पनाचित्रात तुम्ही असं बघा, ज्या गोष्टीची तुम्हाला भीती होती, तिच्यावर मात करून तुम्ही यशस्वीपणे त्यातून मुक्त झाला आहात. जसं, काही लोकांशी बोलताना तुम्हाला भीती वाटत असते, पण तरीही आता तुम्ही त्यांच्याशी निर्भयपणे बोलत आहात असं कल्पनाचित्र मनोमन बघा. त्यासाठी आता आपण योग्य टेक्निक जाणून घेऊ या.
सर्वप्रथम आपल्याला रिलॅक्स होऊन बसायचं आहे. डोळे बंद करून पुढील प्रमाणे कल्पनाचित्र बघायचं आहे. ‘पूर्वी ज्या लोकांशी बोलताना मला भय वाटत असे, त्यांच्याशी आता मी निर्भयतेने बोलत आहे. इतकंच नव्हे, तर माझ्या भावनाही मी त्यांच्यासमोर योग्यरीत्या व्यक्त करत आहे.’ अशा प्रकारे आपल्याकडून नकळत जे नकारात्मक विचार उच्चारले गेले आहेत, त्यामुळे असं भय निर्माण होतं आणि ते आणखी वाढतच जातं. मात्र आता नवीन विचारांसह प्रॅक्टिस करून भय नष्ट करायचं आहे. आपला विश्वास वाढवायचा आहे. हे दृश्य वारंवार मनोकल्पनेत पाहून आपण त्या दृश्याबाहेर असल्याचं बघायचं आहे. याचाच अर्थ, ते दृश्य, द्रष्टा भावनेने अनासक्त होऊन बघायचं आहे. (हायलाइट करा)
मात्र हे कल्पनाचित्र आपल्याला सतत काही दिवस बघावं लागेल. याचाच अर्थ, सर्वप्रथम आपल्याला सकारात्मक दृश्य बघण्याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्यानंतर त्या गोष्टी आपोआप घडताना बघायच्या आहेत. अशा प्रकारे एक एक समस्या घेऊन कल्पना चित्राच्या आधारे त्यांचं निरसन होताना बघा.
* आपण भक्कम (स्ट्राँग) बॅक अप आहात :
भयाविषयी जाणून घेत असताना इथे आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट समजून घ्यायला हवी, की आपण स्वतःच भक्कम (स्ट्राँग) बॅक अप आहात. तेव्हा भयाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. मात्र सजगता बाळगणं आवश्यक आहे.
बॅक अपचा अर्थ आहे, आपण पृथ्वीवर काय निर्माण करू इच्छिता? पृथ्वीवर आपलं जीवन कशा प्रकारे अभिव्यक्त व्हावं? याचं आपल्यासमोरील सुस्पष्ट चित्र म्हणजेच आपला बॅक अप! त्यानंतर आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतील, त्या आपल्या बॅक अपनुसारच असतील. शिवाय आपली निवडही बॅक अप जे दर्शवत आहे, त्या दिशेनेच होईल.
मात्र लोक निवडीबाबत नेहमी संभ्रमावस्थेत असतात. हे करू की ते करू… योग्य निर्णय ते घेऊच शकत नाहीत. परंतु जेव्हा आपलं बॅक अप स्पष्ट असेल, तेव्हा आपली निवडदेखील त्याच दिशेने होऊ लागेल. कारण माझं बॅक अप क्लिअर आहे, असा आपल्यात आता विश्वास निर्माण होईल. म्हणून जी काही निवड कराल, ती त्याच दिशेने आपल्याला घेऊन जाईल. मात्र यामध्ये कितीही दिखाऊ सत्य दिसलं तरी आपण भयभीत होणार नाही. कारण आता आपल्याला ठाऊक झालंय, समोरचं दृश्य असं दिसतंय. परंतु त्याचा जो परिणाम येईल तो सर्वोत्तमच असेल आणि त्यायोगे आपली प्रगतीच होणार आहे.
भयाविषयी या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर, त्याचे सर्व पैलू बघितल्यानंतर आता आपण निर्भयतेने सांगू शकाल, ‘हे भया, आता तू तुझं काम कर… आणि मी माझं…’
~ सरश्रींच्या मार्गदर्शनावर आधारित
हा विषय सविस्तर जाणण्यासाठी आपण पुढील गोष्टींचा लाभ घेऊ शकता :
या विषयावरील अधिक माहितीसाठी संपर्क साधा –
मो. 9922081483
One comment
Riya
भांडणा ची भिती वाटते
तर ती भिती कशी कमी करवी