This post is also available in: English Hindi
एकदा भानू आणि प्रकाश हे दोन मित्र राजस्थानातील वाळवंटातून चालले होते. उन्हाच्या प्रखर तडाख्यापासून बचाव व्हावा म्हणून त्यांनी डोक्यावर पगडी घातली होती. पण अचानक तिथे धुळीचं प्रचंड वादळ आलं आणि दोघांचीही पगडी दूरवर उडाली. भानू आपल्या पगडीच्या मागे जोरात धावू लागला, तेव्हा प्रकाश त्याला थांबवत म्हणाला, ‘‘अरे, हे काय करतो आहेस? इकडे बघ, किती जोरदार वादळ आहे. आता इथे थांबणं म्हणजे मोठा धोका पत्करण्यासारखंच आहे. चल, निघूया लवकर इथून… एखाद्या सुरक्षित जागी जाऊ आणि तिथे थांबू…’’
मात्र भानू आपल्या मित्राचे शब्द ऐकायला तयारच नव्हता, तो जणू बहिराच झाला होता. तो म्हणाला, ‘‘मित्रा, ती माझी खूप महागडी, रेशमी पगडी आहे. कालच तर मी ती बाजारातून विकत आणली होती. ती पगडी घेऊन मी लगेच येतो बघ, तू जराही काळजी करू नकोस…’’ आणि तो त्वरित त्या पगडीच्या मागे धावत सुटला.
वादळाची तीव्रता बघून प्रकाश लगेच तेथून पळाला. कारण राजस्थानात जेव्हा वादळ येतं, तेव्हा क्षणार्धात जागोजागी रेतीचे ढीग, डोंगरच्या डोंगर तयार होतात. त्याक्षणी तेथेही तसंच घडलं आणि भानू पगडीच्या नादात वाळवंटातील रेतीखाली दबून गेला. प्रकाश मात्र तेथून पळाला म्हणून वाचू शकला. त्याला जेव्हा भानूच्या मृत्यूबाबत समजलं, तेव्हा अतिशय दुःखाने तो म्हणाला, ‘‘अरे देवा, हे काय झालं! प्रसंगीच भानूने जर भान राखलं असतं, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती. पण आता काय उपयोग? सिर सलामत तो पगडी हजार…’’
‘सिर सलामत तो पगडी हजार,’ ही तर एक म्हण आहे, जिचा अर्थ होतो, जेव्हा दोन गोष्टींमधून एकाच गोष्टीची निवड करायची असते, तेव्हा त्यापैकी जी अधिक मूल्यवान असेल, तिचीच निवड करायला हवी. थोड्याशा लाभाकरिता मोठी संपदा गमावता कामा नये. वास्तविक भानूचं मौल्यवान जीवन जर वाचलं असतं, तर त्याने आणखी कितीतरी पगड्या विकत घेतल्या असत्या आणि डोक्यावर घातल्या असत्या. पण आता…? डोकंच शिल्लक राहिलं नाही, तर पगडीचा तरी काय उपयोग?
मात्र, ही गोष्ट मनुष्याच्या लगेच लक्षात येत नाही. या उदाहरणात आपल्याला वाटेल, की भानूने खूप मोठी चूक केली. तो जर पगडीच्या मागे धावला नसता, तर कदाचित जिवंत राहिला असता. त्याची चूक तर आपल्या लगेच लक्षात आली; पण आपल्या चुकांचं काय? स्वतःच्या चुका आपल्या लक्षात येतात का?
तसं पाहिलं तर पगडीला स्वाभिमानाचं प्रतीक समजलं जातं; परंतु या उदाहरणात पगडीला आपल्या अहंकाराचं प्रतीक आणि डोक्याला सेल्फचं (स्रोतचं) म्हणजे आपल्या अंतरंगातील आवाजाचं प्रतीक दर्शवलं आहे.
आपला अहंकार जपण्यासाठी आपण कुठे-कुठे भानू बनतो? आपल्या अंतर्यामीच्या आवाजाकडे आपण कधी दुर्लक्ष करतो? कधी तो आवाज दाबून टाकतो? याचं आकलन होणं अत्यावश्यक आहे.
समजा, आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो आणि त्याचवेळी कोणीतरी आपल्याला कट मारून पुढे निघून जातो. तेव्हा काही लोक काय करतात? त्या मनुष्याच्या मागे मागे जातात आणि त्याला काही धडा शिकवण्याच्या नादात अपशब्द बोलतात. त्याच्या गाडीचं नुकसान करतात, त्याच्याशी भांडण करतात… भले मग यासाठी त्यांचा वेळ, पैसा वाया गेला तरी बेहत्तर; पण ते बहाद्दर मागे हटत नाहीत. हे तर असंच झालं ना, डोक्याची (अहंकाराची) किंमत वाचवण्यासाठी पगडीच्या मागे धावत सुटायचं… पण शेवटी तीदेखील राहत नाही.
पूर्वीच्या काळात युद्धाच्यावेळी किंवा यात्रेदरम्यान लोक डोक्यावर पगडी घालत असत, जेणेकरून कुणी डोक्यावर वार केला अथवा काठी मारली तरी इजा होऊ नये, डोक्याला मार लागू नये. खरंतर पगडी घालण्याचा हाच एकमेव उद्देश होता. मात्र, लोकांना याचं विस्मरण घडतं आणि ते उलट अर्थ काढून पगडी (अहंकार) वाचवण्यासाठी स्वतःचं डोकंच पणाला लावतात आणि मग ‘सर कटा सकते है लेकिन सर झुका सकते नहीं…’, ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशा घोषणा देत राहतात.
स्वाभिमान आणि अहंकारात सूक्ष्म फरक आहे. परंतु हा फरक न जाणता लोक अहंकारालाच स्वाभिमान समजून त्यालाच पुष्ट करत राहतात, अहंकारालाच खतपाणी घालतात. ‘समोरच्याने मला असं काही सुनावलं, जे माझ्या फार जिव्हारी लागलं, आता मी बघा कसं त्याला ऐकवतो…’ अशी भावना बाळगणं म्हणजे अहंकाराचं पोषण करण्यासारखंच आहे, हा स्वाभिमान नव्हे.
ईश्वराने मनुष्यात अहंकार यासाठी टाकला, की या जगरूपी लीलेत त्याने टिकावं, समरसून भाग घ्यावा, आपल्या शरीराचं रक्षण करावं, जगण्यासाठी काम करावं. जसं, आपल्या मुलाकडून काम करून घ्यायचं असेल, तर आई-वडील त्याचा अहंकार कुरवाळतात. ‘अरे, तू तर किती हुशार आहेस… तुझ्यासारखं काम तर कोणीच करू शकत नाही…’ असं म्हटल्यानंतर तो मुलगा कुठलंही काम करायला तयार होतो. पण मोठं झाल्यानंतरही जर माणूस आपल्या अहंकाराचं समर्थन असंच करत असेल, तर कुणाचंही बोलणं त्याच्या जिव्हारी लागेल, बोचेल. कारण बाहेर काम करत असताना सर्वांकडून तो प्रशंसेची अपेक्षा कशी करू शकणार?
मोठं झाल्यानंतर मनुष्याला अहंकाराच्या पुष्टीकरिता नव्हे, तर आपल्या आंतरिक संतुष्टीसाठी काम करावं लागेल, आंतरिक आवाज ऐकावा लागेेल. मग सभोवतालच्या लोकांनी प्रशंसा केली अथवा नाही… काही फरक पडणार नाही. त्याचा आंतरिक आवाजच सांगेल, तो जे करतोय ते योग्य आहे की अयोग्य!
अशा प्रकारे जीवनात आपली अमूल्य गोष्ट वाचवायची असेल, तर त्यासाठी आवश्यकता असते, एखाद्या ध्येयाप्रत पोहोचण्याची, दृढ निश्चय करण्याची! आपल्यासाठी अत्यावश्यक गोष्ट कोणती आहे, आपलं डोकं वाचवणं की पगडी सांभाळणं, हे आपल्याला निश्चितपणे ठाऊक असायला हवं.
त्यासाठी गतकाळातील काही अनुभवांचंही आपण स्मरण करू शकता. जेव्हा आपण पगडी, अहंकार वाचवायला गेलो आणि स्वतःचंच नुकसान करून घेतलं, त्याचवेळी आपल्या मनात विचार आला असेल, जर आतला आवाज ऐकून मी काही वेळ थांबलो असतो, ती कृती केली नसती, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पण…
आता समजून घेण्यासारखी गोष्ट ही आहे, की आपला आंतरिक आवाज आपल्याशी कसा संवाद साधतो? तो तीन प्रकारे आपल्याशी बोलतो, 1) टेन्शन (तणाव) देऊन, 2) इंट्युशन देऊन आणि 3) इंटेशन देऊन.
आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचा तणाव येतो, तेव्हा सामान्यतः आपण भयभीत होतो. खरंतर त्या तणावामागे लपलेला सेल्फचा आवाज आपण त्यावेळी ऐकू शकत नाही. ईश्वराला जेव्हा आपल्याकडून एखादं विशेष कार्य करून घ्यायचं असेल, तेव्हा तो आपल्याला त्यासंबंधित टेन्शन देतो, त्यामुळे आपल्याला बळ मिळून आपण ते काम करण्यास उद्युक्त होतो. जसं, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी टेन्शन येतं आणि मग ते अभ्यास सुरू करतात, चांगल्या मार्कांनी पास होतात. मात्र, ज्या लोकांना या तणावामागचा उद्देश स्पष्ट नसतो, ते त्याकडे समस्या म्हणूनच बघतात. मग तो तणाव दूर होण्यासाठी ते व्यसनांच्या विळख्यात अडकतात, मनाचं मनोरंजन करतात. इतकंच नव्हे, तर त्याचा दोषही ते कधी ईश्वराला तर कधी नशिबाला देतात. मात्र, नेहमी इतरांनाच दोषी ठरवतात. पण वस्तुस्थिती ही आहे, की तणाव म्हणजे आपल्याला आतून मिळणारा जोरदार धक्का असतो. केवळ तो आपल्याकडून कोणतं कार्य करून घ्यायला आलाय, हे लक्षात यायला हवं.
ईश्वराची संवाद साधण्याची दुसरी पद्धत म्हणजे इंट्युशन देणे, म्हणजे अशा तीव्र भावना, ज्या अचानक आपल्यात उपजतात. यालाच आतला आवाज असंही संबोधतात. जणू अदृश्यपणे कोणी आपल्याला सूचना देत आहे, मार्ग दाखवत आहे. आपणदेखील हे इन्ट्युशन्स कधी ना कधी अनुभवलंच असेल. ईश्वर (सेल्फ) आपल्याला सांगत असतो, की कोणतं काम करायचं आहे आणि कोणतं नाही? परंतु मनुष्यावर जेव्हा अहंकार हावी होतो, तेव्हा तो ईश्वरीय आवाज त्याला मनाचा भ्रम वाटतो आणि मग तो दोन्हींमध्ये भेद करू शकत नाही, तो आवाज ओळखू शकत नाही. तो स्वतःचंच म्हणणं खरं ठरवतो; परंतु ईश्वरीय आवाज न ओळखल्याने त्याचं जे नुकसान होतं, ते अपरिमित असतं. तेव्हा मनुष्य म्हणतो, ‘‘हे काम करू नये असं आतून मला प्रकर्षाने जाणवत होतं; पण तरीही मी ते का केलं हे मलाच समजलं नाही.’’
सेल्फची संवाद साधण्याची तिसरी पद्धत आहे, इंटेन्शन देणं. कधी-कधी आपण अचानक आंतरिक प्रेरणेने एखादा निश्चय, संकल्प करतो आणि मग तो जाणीवपूर्वक निभावतो. वास्तवात हा संकल्पही ईश्वरच आपल्याकडून करवून घेतो, ज्यायोगे आयुष्यात आपण असं काही अद्भुत कार्य करतो, जे यापूर्वी कधीही केलेलं नसतं.
अशा प्रकारे टेन्शन, इंट्युशन आणि इंटेन्शन देऊन सेल्फ आपल्या शरीराला विशेष दिशा, मार्ग दाखवतो. जे लोक सेल्फशी ताळमेळ साधतात, ते आयुष्यात सर्व काही सहजपणे, सरळपणे प्राप्त करतात. असे लोक आपल्याला सांगतील, ‘ईश्वरीय कृपेने माझी सगळी कामं होताहेत, पण कसं ते ठाऊक नाही.’
जो ही पद्धत योग्यप्रकारे जाणून घेतो, तो नेहमी प्रसन्नचित्त आणि समाधानी राहतो. तो पगडीच्या मागे धावून आपलं अमूल्य जीवन गमावत नाही. कारण त्याला ठाऊक असतं, ‘सिर सलामत तो पगडी हजार!’
Add comment