This post is also available in: Hindi
जीवनात निर्णय घेेणं खरंच महत्त्वाचं आहे का? ‘होय!’ आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकलो नाही, तर आपल्याला इतरांचं मत ग्राह्य मानावं लागतं. त्यांचं ऐकावं लागतं. इतकंच नव्हे, तर आपल्या जीवनाबद्दल लोकांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आपल्याला गुपचूप करावी लागते. तुम्ही जर छोटे छोटे निर्णय घेऊ शकला नाही तर, ‘मी नेहमी लहानसहान बाबींमध्ये लोकांचंच का ऐकत राहिलो? मी स्वतःच माझे निर्णय का घेतले नाहीत?’ अशी पश्चात्ताप करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते!’
समजा, तुम्ही शॉपिंगसाठी गेला आहात आणि तुम्हाला एक ड्रेस विकत घ्यायचा आहे. तिथे तुमच्यासमोर असंख्य प्रकारचे ड्रेसेस आहेत. परंतु तुम्हाला त्यांतील एकाचीच निवड करायची आहे. अशा प्रकारे दैनंदिन जीवनात प्रत्येकाला छोटे छोटे निर्णय घ्यावे लागतात. जसं, गृहिणींना आज कोणती भाजी बनवायची याबाबत निर्णय घ्यावा लागतो. एखाद्या ठिकाणी जायचं असेल, तर कोणत्या रस्त्याने जायचं याची निवड करावी लागते. आज कोणता ड्रेस परिधान करायचा याचा निर्णय प्रत्येकाला दररोज घ्यावा लागतो. आपण जर अशी बारीकसारीक निवड स्वतःच करू लागलो, तर हळूहळू आपल्यात योग्य निवड करण्याची, योग्य निर्णय घेण्याची कला विकसित होते.
ज्या मनुष्याला जीवनात प्रगती करण्याची इच्छा आहे, यशाचे नवनवे मार्ग पादाक्रांत करायचे आहेत, त्याला स्वतःची निर्णय क्षमता वाढवणं अपरिहार्य आहे. अर्थात, प्रत्येकानंच जीवनात योग्य निर्णय घेण्याची कला शिकायला हवी. कारण आपल्या निर्णयावरच आपला वर्तमान आणि भविष्य या दोन्ही बाबी अवलंबून असतात. मात्र अगदी शंभर टक्के यशाची हमी देणारा निर्णय आपण चुटकीसरशी घेऊ शकत नाही, हेही तितकंच खरं! काही गोष्टी आपण निरंतरतेने करू लागतो, तेव्हा आपली योग्य निर्णय घेण्याची पात्रता आपोआप वृद्धिंगत होऊ लागते.
आपण कोणत्या आवश्यक पावलांच्या साहाय्याने योग्य निर्णय घेण्याच्या कलेत नैपुण्य प्राप्त करू शकतो, ते आता पाहू या.
- सर्व पर्यायांच्या सकारात्मक आणि नकारात्मक पैलूवर मनन:
काही निर्णय घेताना मनुष्यासमोर किमान दोन वा त्यांपेक्षा अधिक पर्याय उपलब्ध असतात. अशा स्थितीत कोणता पर्याय निवडावा, हे समजत नाही. अशा वेळी संभ्रमावस्थेतून बाहेर पडण्यासाठी सर्व पर्यायांमधील सकारात्मक आणि नकारात्मक पैलू अभ्यासायला हवेत. त्यानंतर कोणता पर्याय निवडणं लाभदायी ठरेल यावर विचार करा. तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर तिथेदेखील तुमच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. जसं, एखाद्या मनुष्याला संगीत क्षेत्रात ख्याती मिळवायची आहे. तो सुरेख गातो आणि एखादं वाद्यदेखील छान वाजवतो. अशा वेळी गायक बनायचं की वादक किंवा या दोन्हीचा उत्तम मेळ साधायचा याविषयी त्याला निर्णय घ्यावा लागेल. यासाठी उपलब्ध पर्यायांमधील सर्व पैलूंचं बारकाईनं निरीक्षण करायला हवं. - आपली क्षमता ओळखा:
योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला स्वतःमधील क्षमता जाणावी लागेल. यासाठी तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही, या बाबींचं कसोशीनं परीक्षण करावं लागेल. अर्थात तुमचं सामर्थ्य (स्ट्रेन्थ) आणि असमर्थता (विकनेस) यांवर मनन करा. तुम्हाला तुमच्या मर्यांदांबद्दल योग्य जाण नसेल, तर लक्ष्यप्राप्तीमध्ये अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकेल.हा मुद्दा व्यवस्थित समजावा यासाठी आपण गायनात करिअर करू इच्छिणाऱ्या मनुष्याचं उदाहरण पाहू या. त्यानं करिअरसाठी गायन क्षेत्र निवडलं. परंतु त्याच्या गळ्यातून प्रत्येक प्रकारचा सूर निघत नसे. परिणामी गायन क्षेत्रात वाटचाल करताना त्याच्या मार्गात कितीतरी अडथळे निर्माण झाले. म्हणून निर्णय घेण्यापूर्वी आपली क्षमता आणि पात्रता तपासणं गरजेचं ठरतं. - जबाबदारी घ्यायला शिका:
योग्य निर्णय घेण्याची कला अवगत करण्यासाठी जबाबदारी घेणं हेदेखील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतं. जबाबदारी घेण्याने मनुष्य स्वतःच्या कर्तव्याप्रति सजग राहतो. परिणामी कामात टाळाटाळ करणं अथवा कामाबद्दल निष्काळजीपणा दाखवणं यांसारख्या नकारात्मक वृत्तींना थाराच मिळत नाही. - घडलेल्या चुकांमधून शिका:
कित्येक सुप्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या हातून घडलेल्या चुकांचा उपयोग स्वतःचा विकास साधण्यासाठी केला. त्यांनी घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली आणि झालेल्या चुकांमधून योग्य तो बोध प्राप्त केला. थॉमस एडिसन यांनी विजेचा शोध लावला, हे सर्वांना माहीत आहे. परंतु या शोधार्थ ते कित्येक वर्षं अथक परिश्रम करत राहिले, वेगवेगळेे प्रयोग करत राहिले. या शोधादरम्यान हजारो वेळा एडिसन यांना अपयश आलं. त्यानंतर त्यांना त्यात यश प्राप्त झालं. या कालावधीत ते अटळ निश्चयाने आणि पूर्ण निष्ठेने स्वतःच्या चुकांमधून शिकत राहिले आणि पुढे विजेचा शोध लागला.आपणदेखील योग्य निर्णय घेण्याची कला अवगत करण्यासाठी एडिसनप्रमाणेच स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची, बोध घेण्याची सवय अंगीकारायला हवी. जसं, तुम्ही नोकरीसाठी मुलाखत द्यायला जाल, तेव्हा पूर्वी मुलाखतीदरम्यान ज्या चुका केल्या होत्या, त्या पुन्हा होऊ देऊ नका. जीवनात तुमच्याकडून घडलेल्या चुकांमधून तुम्ही काही शिकलात, तर प्रत्येक चूक तुमचा गुरू बनू शकते, हे नेहमी लक्षात असू द्या. - ‘होकार’ आणि ‘नकार’ या दोहोंवर ठाम राहा:
योग्य निर्णय घेण्यासाठी या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. काही निर्णय लोकांच्या दृष्टिकोनानुसार योग्य असतील, तर तुमच्या दृष्टिकोनातून ते अयोग्य असतील. याउलट काही निर्णय लोकांना चुकीचे वाटतील. परंतु तुमच्या दृष्टीने तेच योग्य असतील. अशा वेळी तुम्ही जो काही निर्णय घेतला असेल, त्यावर ठाम राहायला शिका. उदाहरणार्थ, एका प्रथितयश कंपनीतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याच्या राजीनाम्याचा निर्णय ऐकून त्याच्या जवळचे सर्व लोक नाराज होतात. ते त्याला त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देतात. अशा वेळी त्या माणसाने नोकरी करायला नकार आणि सामाजिक कार्याला होकार देण्याविषयी ठाम राहायला हवं. त्यानंतरच तो आपला हेतू, उद्देश साध्य करू शकेल. - छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा:
स्वयंपाक करायला शिकताना पहिल्या दिवशीच जर कुणी विचार केला, की ‘आज मला संपूर्ण स्वयंपाक करता यायलाच हवा’ तर ते योग्य ठरेल का? नाही ना. स्वयंपाक शिकण्यापूर्वी सर्वप्रथम त्या व्यक्तीला निरनिराळे मसाल्यांचे पदार्थ, दाळी, भाज्या इत्यादी वस्तूंची माहिती घ्यावी लागेल. त्याचबरोबर त्यांचा उपयोग कसा केला जातो, याविषयी सविस्तर जाणून घ्यावं लागेल. त्यानंतर आधी साधा आणि सोपा पदार्थ बनवायला शिकावं लागेल. जसजसं ती व्यक्ती साधे, सोपे पदार्थ बनवायला शिकू लागेल, तसतसं तिच्यात अवघड पाककृती बनवण्याची क्षमता निर्माण होईल. मग वेगवेगळ्या प्रांतातील विविध खाद्यपदार्थ तयार करणं वा प्रसिद्ध पदार्थ तिच्यासाठी सुकर होईल. तात्पर्य, योग्य निर्णय घेेण्यासाठी छोटे छोटे निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं साहाय्यक ठरतं. - विविध घटनेत घेतलेले निर्णय लिहून ठेवा :
एखाद्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितच काही कालावधी लागतो. घेतलेला निर्णय राबवताना तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशा घटनादेखील त्यावेळी घडू शकतात. तेव्हा आलेल्या अडचणी, निर्माण झालेला संभ्रम वा निराशा तुम्ही कशी दूर केली, अशा महत्त्वपूर्ण घटना डायरीत लिहून ठेवा. पुढे कधी तुम्हाला अशाच प्रकारच्या अडचणी आल्या, तर डायरीच्या साहाय्याने तुम्ही त्या समस्यांवर अल्पावधीत मात करून पुढील मार्गक्रमण करू शकाल.
वरील छोटी छोटी पावलं उचलण्याने तुमचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल. त्यानंतर एक वेळ अशी येईल, की मोठमोठे निर्णयदेखील तुम्ही अगदी सहजपणे, सजगतेने आणि पूर्ण विश्वासाने घेऊ शकाल. योग्य निर्णय घेण्याची कला आत्मसात केल्याने तुम्हाला तुमच्या निर्णयांवर पश्चात्ताप करण्याची वेळ कधीही येणार नाही. कारण निर्णय घेताना तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे, त्यासाठी कोणती तयारी करणं आवश्यक आहे, या सर्व बाबींचा अंदाज आधीच येईल, जेणेकरून तुमचं कार्य सहजपणे पार पडेल.
ही सात पावलं तुम्हाला योग्य आणि यशदायी निर्णय घेण्यासाठी निश्चितच साहाय्यभूत ठरतील. योग्य निर्णय घेतल्याने तुमची सर्जनशीलता वाढेल आणि तुमच्यात दडलेल्या अन्य गुणांचादेखील विकास होईल. त्याआधारे तुमचं व्यक्तिमत्त्व विकसित होऊन यशस्वी लोकांच्या यादीत तुमचं नाव समाविष्ट होईल.
~ सरश्रींच्या मार्गदर्शनावर आधारित
Add comment