This post is also available in: English Hindi
आपण नवीन शतकाच्या 18व्या वर्षात प्रवेश केला आहे. म्हणून 18 या अंकाचं वर्तमानात, सद्यःस्थितीत विशेष महत्त्व आहे. कारण निरनिराळ्या धर्मांमध्ये आणि परंपरांमध्येदेखील 18 या अंकाला विशेष स्थान दिलं गेलं आहे. ज्यू लोक कोणतंही दान देताना ते 18च्या पटीत देतात. चीनमध्येदेखील 18 हा अंक शुभ मानला जातो आणि त्याची यश आणि समृद्धी यांच्याशी सांगड घातली जाते.
भगवद्तगीतेत एकूण 18 अध्याय आहेत. महाभारत म्हणजे 18 सेनांमध्ये 18 दिवस चाललेल्या युद्धाची ही कथा आहे. ती 18 अध्यायांद्वारे वर्तवली गेली आहे. गीतादेखील याचाच एक भाग आहे. वास्तविक पाहता, गीता ही अध्यात्म आणि अनुभूती यांच्या मार्गाचं प्रवेशद्वार आहे. परंतु गीतेत दैनंदिन जीवनासाठी उपयोगी ठरतील, असे अनेक महत्त्वपूर्ण पाठ दिले गेले आहेत. विशेषतः यात समस्यांचं निराकरण आणि निर्णय घेण्यासाठीचं योग्य मार्गदर्शन आहे.
खरंतर गीता काय आहे? अर्जुनाने स्वतःची आणि त्याच्या भावाची समस्या सोडवण्यासाठी ‘युद्ध करावं की करू नये’ यासंबंधी निर्णय घेणं, याच बाबींचा गीतेत उल्लेख आहे. चला तर, आपणदेखील आपल्या जीवनात आलेल्या समस्या सोडवण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी गीतेत सांगितलेले पाच महत्त्वपूर्ण पाठ समजून घेऊन 2018मध्ये पदार्पण करून हे वर्ष यशस्वी बनवू या.
1. ‘खेळण्यासाठी जिंका, जिंकण्यासाठी खेळू नका.’: जिंकण्यासाठी खेळणं आपण सर्वांनी ऐकलं आहे. कारण हारण्यासाठी खेळल्या जाणार्या जीवनापेक्षा असं जीवन नक्कीच चांगलं आहे. गीतेत कर्माचं रहस्य विशद केलं आहे. हे रहस्य सखोलपणे समजून घेतलं, तर खेळणं हेच जिंकणं आहे, ही समज प्राप्त होते. आजवर आपण ‘कर्म करा, फळाची चिंता करू नका’ अशा अर्थाचा गीतेतील श्लोक ऐकत आलो. परंतु याचा योग्य अर्थ आहे, ‘जीवनाचा खेळ अशा प्रकारे खेळा, की खेळाचा (लीलेचा) आनंद घेता यावा. त्याच्या परिणामांची आणि कर्माच्या फळाची चिंता न करता, केवळ या खेळाचा आनंद उपभोगा.’
हा मुद्दा आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ या. आई आपल्या मुलाला म्हणते, ‘बेटा, बाहेर जाऊन खेळून ये. मगच तुला चॉकलेट मिळेल.’ परंतु ‘खेळणं’ हेच जर मुलासाठी फळ असेल तर त्याला इतर फळाची आवश्यकताच काय? याचाच अर्थ, समस्या सोडवण्यासाठी निर्णय घेणं म्हणजे जिंकण्याच्या रेषेपासून धावायला सुरुवात करण्यासारखंच आहे. आपला आरंभच जिंकण्याने होतो. त्यामुळे पुढे आपल्याला एखादी स्पर्धा किंवा जिंकण्याची कुठली चिंताच राहत नाही. खेळात धावणं हाच स्वतःमध्ये परिपूर्ण आनंद आहे, यशस्वी फळ आहे.
अशाच प्रकारे तुम्ही जेव्हा एखाद्या समस्येचं निरसन करता वा निर्णय घेता, तेव्हा अन्य फळाची अपेक्षा बाळगण्याची आवश्यकताच नाही, ही समज ठेवायला हवी. वास्तवात समस्येचं निराकरण करण्याची आणि निर्णय घेण्याची कला शिकून आपल्याला स्वतःमधील गुण अभिव्यक्त करण्याची संधी मिळालेली असते. हेच तर खर्या अर्थानं योग्य फळ आहे.
जसा, एक लेखक लेखन-प्रक्रियेतूनच आनंद प्राप्त करतो. प्रकाशन अथवा प्रसारण, त्याच्यासाठी केवळ बोनस असतो. कारण त्या लेखकासाठी लेखनाचं कर्मच फळ असतं.
2018मध्ये सर्जनशील पद्धतींचा अवलंब करून समस्या सोडवणं आणि निर्णय घेणं यालाच फळ समजा.
2. बाह्य परिस्थितींशी नव्हे, तर आंतरिक शत्रूंशी युद्ध करा: ‘आपल्याच आप्तजनांशी युद्ध कसं करावं?’ या संभ्रमात अर्जुन होता. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्याला गीतेद्वारे आवाहन केलं. अशा बिकट, विमनस्क परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांकडे ज्ञानाची याचना केली. वास्तविक इथे आपल्या वृत्ती, विकार, अहंकार यांना आप्तस्वकीय असं संबोधलं आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘धर्मयुद्धापेक्षा इतर कुठलंही युद्ध श्रेष्ठ नाही.’ याचाच अर्थ, एक आध्यात्मिक योद्धा आपल्या वृत्तींविरुद्ध युद्ध पुकारतो. या वृत्ती त्याला त्याच्या खर्या स्वभावापासून दूर नेतात. ज्या इच्छा, कामना मनुष्याला पुनःपुन्हा मोहपाशात जखडून टाकतात, त्यांच्या विरुद्ध हा योद्धा युद्ध पुकारतो. आपली इंद्रियं सदैव आपलं लक्ष वेधून घेत असतात. मात्र, एक आध्यात्मिक योद्धा इंद्रियसुखात गुंतून न जाता पूर्णपणे अनासक्त होऊन पृथ्वीलक्ष्य प्राप्त करतो.
अशा प्रकारे समस्येचं निरसन करणं आणि निर्णय घेणं यालाच बाह्य परिस्थिती म्हणजे स्पर्धा, वातावरणातील बदल यांच्याशी लढणं असं मानलं गेलं आहे. परंतु 2018मध्ये गीतेतील 18 अध्यायांचा खरा अर्थ समजून आपले आंतरिक शत्रू नष्ट करा. मग आपल्या बाह्य समस्या आपोआप सुटत जातील.
3. कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी तन्मयतेनं, सखोलतेने ऐका: गीतेतील पहिल्या अध्यायात अर्जुन शोक, विषाद व्यक्त करतो. याच अध्यायाला ‘अर्जुनविषाद योग’ म्हटलं गेलं आहे. हा अध्याय अर्जुनाच्या नैराश्यग्रस्त मनाला विचलित करणार्या विचारांवर दृष्टिक्षेप टाकतो. अर्जुनाचे हे सर्व विचार श्रीकृष्ण अगदी संयमपूर्वक ऐकतात. वास्तविक गीतेचा प्रारंभ हा दुसर्या अध्यायापासून होतो असं समजायला हवं. कारण या अध्यायापासून श्रीकृष्णांनी बोलायला प्रारंभ केला आहे.
इथे आपल्याला शिकण्यासारखी एक महत्त्वपूर्ण बाब आहे. ती म्हणजे, आपण जेव्हा एखाद्या समस्येचं निराकरण करतो, तेव्हा त्यात इतर लोकांचाही समावेश असेल, तर त्यांचं म्हणणं आधी अत्यंत सावकाश, शांतपणे आणि तन्मयतेनं ऐकावं. विशेषतः आपण जेव्हा इतरांच्या समस्येचं निरसन करत असाल अथवा इतरांसाठी काही निर्णय घेत असाल, तर अशा वेळी त्या लोकांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना सल्ला देणं उचित ठरतं.
इथे आणखी एक बोध घ्यायला हवा. तो म्हणजे आपली समस्या सोडवताना अर्जुनाच्या गुणांचं अवलोकन करायला हवं. अर्जुन प्रामाणिकपणाने आणि तळमळीने ईश्वराप्रति समर्पित होत असे. आपणदेखील याचा अवलंब करायला हवा. आपण आपल्या भावनांप्रति सजग राहून ईश्वराला पूर्णपणे समर्पित झालो, तर निराशाजनक स्थितीदेखील योगाचं रूप धारण करते, याचं आकलन होईल.
कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचण्यापूर्वी अथवा सल्ला देण्यापूर्वी समस्या व्यवस्थित समजून घेऊन भावना दुर्लक्षित न करता त्यांना सखोलपणे ऐकण्याची सवय स्वतःला लावून घ्या. त्याचबरोबर सर्वकाही ईश्वराला समर्पित करा.
4. दृष्टी साफ ठेवा, दृष्टिहीन बनून जगू नका: भावनांनी विवश होऊन विवेकशून्य बनून काम करू नका, असा महत्त्वपूर्ण उपदेश गीतेतील अनेक पाठांत केला आहे. समस्येकडे स्वच्छ, स्पष्ट नजरेने पाहा. त्यात कुठलंही किल्मिष बाळगू नका. कारण गीता हे एक ईश्वरीय गीत आहे. संजयने त्याला प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टीच्या माध्यमातून युद्धभूमीवरील घटनांकडे अनासक्त होऊन पाहत, कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता त्या घटनांचं इत्थंभूत वर्णन दृष्टिहीन धृतराष्ट्राला केलंय.
मात्र, शुद्ध,स्पष्ट आणि विवेकपूर्ण दृष्टीने पाहण्यासाठी आपण विचारांच्याही पलीकडे असणारा आपला खरा स्वभाव जाणायला हवा. आपण एखादी बाब जेव्हा स्पष्टपणे पाहत नाही, तेव्हा आपले विचारच आपलं संचालन, नेतृत्व करतात. हे विचार प्रक्षोभक प्रतिक्रियेच्या रूपात उत्पन्न होतात. म्हणून सर्वप्रथम मन सर्वोत्कृष्ट प्रकारे कसं काम करतं, हे जाणायला हवं. याद्वारेच मनाची कार्यपद्धती समजून आपण अतिशय सजग राहून प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो. आपली जागरूकता वाढवण्यासाठी एक शक्तिशाली मार्ग आहे. तो म्हणजे ज्या ज्या वेळी मन विचलित होऊ लागेल, त्या त्या वेळी स्वतःला काही प्रश्न विचारा. ‘मी या समस्येचं निराकरण करू शकत नाही’ असा विचार तुमच्या मनात येताच, मनाला प्रश्न विचारा, ‘मी या समस्येचं निराकरण कशा प्रकारे करू शकतो, ज्याद्वारे ती विकासाची शिडी बनू शकेल?’
स्पष्ट, स्वच्छ दृष्टिकोनातून समस्येकडे पाहण्याने आपण समस्येतील कठीण परिस्थितीवरदेखील मात करू शकतो. परिस्थितीकडे समस्येच्या रूपात पाहणं हीच खरी समस्या आहे. आपण जेव्हा समस्येकडे धारणांच्या चश्म्यातून पाहतो, तेव्हा आपल्यात अवरोध निर्माण होतो. प्रतिरोध केल्याने समस्या तशीच टिकून राहते. चेतनेच्या अथवा जागृतीच्या ज्या स्तरावर समस्या निर्माण झाली, त्याच स्तरावर तिचं निरसन करता येत नाही. म्हणून साक्षी बनण्यासाठी सर्वप्रथम आपण आपली जागरूकता वाढवायला हवी. जागृतीच्या उच्च अवस्थेत समस्येकडे विवेकाने पाहिल्यानंतरच समस्या ही समस्या नसून उपहार आहे, हे लक्षात येतं.
विवेकयुक्त नजरेने समस्येकडे पाहताना, आपण म्हणजेच आपले धारणायुक्त विचारदेखील त्या समस्येचाच एक भाग आहेत, हे लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. घटनांदरम्यान येणार्या विचारांनी आपण स्वतःला सीमित, संकुचित करतो. मात्र, असे विचार समस्या बनू नयेत. यासाठी विचारांना समस्येच्या समांतर राखण्याची कला अवगत करायला हवी.
2018मध्ये समस्येचं निरसन करताना दृष्टी स्वच्छ, स्पष्ट ठेवा. जुन्या चुकीच्या धारणा आणि बाधा प्रकाशात आणण्यासाठी वेळोवेळी स्वतःला प्रश्न विचारा. खरंतर अचूक दृष्टिकोनाच्या साहाय्याने आपण चुकीच्या धारणा नष्ट करू शकतो. मग आपलं जीवन दृष्टिहीन न राहता जागृत (महा) जीवन बनेल यात शंकाच नाही.
5. केंद्रस्थानी राहून निर्णय घ्या, आवेगात घेऊ नका: आपली वडीलधारी मंडळी, शिक्षक, चुलत भाऊ, मित्र आणि आप्तस्वकीय यांना शत्रूपक्षात पाहून अर्जुन अतिशय दुःखी झाला. महाभारतात याचं वर्णन आलं आहे. परंतु अशा अतीव शोकावस्थेतदेखील, मला युद्धभूमीच्या केंद्रस्थानी घेऊन चला, असं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला. तेव्हा श्रीकृष्ण त्याला मैदानावर मध्यभागी घेऊन गेले आणि म्हणाले ‘बघ’. मग केंद्रस्थानी राहून त्याने श्रीकृष्णाकडून ज्ञानार्जन केलं. वास्तविक पाहता ज्ञान प्राप्त करण्यासाठी अर्जुनाला इतरत्र जाण्याची आवश्यकताच नव्हती. परंतु केंद्रस्थानी राहून, आपल्या हृदयात (तेजस्थानात) पोहोचल्याशिवाय ईश्वरीय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही.
आपण केंद्रस्थानी (सोर्सवर) असतानाच हे ज्ञान ग्रहण करू शकतो. कारण तणावग्रस्त अवस्थेत आपण केंद्रापासून दूर जातो. परंतु ताणतणाव असतानाही आपण केंद्रस्थानी राहायला शिकायला हवं. अर्जुन जेव्हा केंद्रस्थानी आला, तेव्हाच त्याला तणावातून मुक्ती मिळाली. आपणही निर्णय घेण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी केंद्रस्थानी यायला हवं. स्वतःला केंद्रस्थानी येण्याची सवय लावण्यासाठी आपण 4:8:18 या तंत्राचा उपयोग करू शकतो.
4:8:18 या तंत्राचा उद्देश हा, की आपण आपली आवश्यकता आणि समस्येनुसार 4, 8 अथवा 18 मिनिटं ध्यान करायला हवं. छोट्या समस्येसाठी 4 मिनिटं ध्यान करणं पुरेसं आहे. एखादी गंभीर समस्या अथवा महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचा असेल, तर 18 मिनिटं अनासक्त होऊन ध्यान करा. या दोन्हीच्या मधली स्थिती असेल, तर 8 मिनिटं अनासक्त होऊन ध्यान करा. या अवस्थेत आपण अनासक्त भाव आणि केंद्राच्या (सोर्सच्या) संपर्कात असतो. ध्यान झाल्यानंतर समस्येकडे स्वच्छ दृष्टिकोनातून पाहा आणि स्वतःलाही समस्येचा भाग मानून, अनासक्त होऊन निर्णय घ्या.
येथे 4, 8 आणि 18 हे अंक आपण समस्येपासून वेगळं होऊन विचार करण्याची सवय लागावी यासाठी दिले आहेत. उदाहरणार्थ, पत्नी जेव्हा म्हणते, ‘मला पाच मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे.’ तेव्हा पती मनात समजून घेतो, की ‘ही आता पाच मिनिटं म्हणते खरी, पण 50 मिनिटंदेखील माझा वेळ घेऊ शकते.’ पण तेच जर तुम्हाला आणखी कोणी म्हणालं असतं, ‘मला तुमच्याशी 4 मिनिटं बोलायचं आहे,’ तेव्हा तुम्ही विचार करता हा मनुष्य जर नेमकी वेळ सांगत आहे, तर तो खरोखरच 4 मिनिटांतच त्याचं बोलणं संपवेल. अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या मनाला सांगितलं, ‘पाच मिनिटं डोळे मिटून शांतपणे बैस.’ तर त्यावेळी तुमच्या मनात असंख्य विचार आणून तुमची अमूल्य वेळ ते नष्ट करू शकतं. परंतु जेव्हा तुम्ही मनाला सांगाल, ‘चार मिनिटं डोळे मिटून बैस’ तेव्हा त्याला शिस्त लागेल, ते प्रशिक्षित बनेल.
2018मध्ये आपण समस्येचं बाह्य रूप पाहून नव्हे, तर ती केंद्रस्थानी आणून सोडवा आणि निर्णय घेऊन खेळाचा आनंद लुटा.
~ सरश्री
One comment
ASHWINI Shinde
Greaat . . . . . Dhanyawad SS