This post is also available in: Hindi
शब्दांची ताकद सर्वांनाच माहीत आहे. शब्दांचं माहात्म्य सांगणारी अनेक उदाहरणं इतिहासात वाचायला मिळतात. वरदान, शाप आणि प्रतिज्ञेचं फळ अशा स्वरूपाच्या कहाण्या आपण नेहमीच वाचत, ऐकत तसेच पाहत आलो आहोत. या सर्वांमागे दडलेल्या शक्तीचं नाव, ‘शब्दशक्ती.’
आश्चर्याची बाब म्हणजे, प्रत्येक माणसाकडे ही शब्दशक्ती असूनही तिच्या उपयोगासंबंधी मात्र तो अनभिज्ञ आहे. तसं पाहिलं तर, आपल्या जिभेवर अखंड निवास करत असलेल्या या शक्तीला योग्य दिशा देण्याचं काम आपलंच असतं. जसं, घोड्यांच्या शर्यतीत घोडे धावतात पण पाहणार्याला मात्र वाटतं, ‘अमुक घोडा जिंकला…तमुक हारला’. प्रत्यक्षात घोडा नव्हे तर घोडेस्वार जिंकतो किंवा हारतो. त्याचप्रमाणे जिभेद्वारे उच्चारल्या जाणार्या योग्य व सकारात्मक शब्दांचा विजय होत असतो. त्यामुळे उच्चारल्या जाणार्या प्रत्येक शब्दाची सतर्कतेनं निवड होणं अत्यावश्यक आहे.
शब्दांचां स्रोत म्हणजे हृदयस्थान (तेजस्थान). येथूनच शब्दांचा उगम होत असल्याने शब्द मुळातच शक्तिशाली असतात. परंतु ते थेट जिभेेवर येत नाहीत तर बुद्धीद्वारे ओठांपर्यंत पोहोचतात आणि डोक्यामध्ये असतो तुलनात्मक मनाचा निवास. तुलनात्मक मन म्हणजे तुलना करणारं, दोनमध्ये विभाजित करणारं मन. हे मन तेजस्थानातून येणारे शब्द स्वतःच्या सोयीनुसार वाढवून किंवा कमी करून सांगतं. यामुळे डोक्याचा (बुद्धीचा) मार्ग, कुमार्ग बनतो. हा शब्दांमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ भाव निर्माण करतो. मग कुमार्गातून जिभेवर येणारे शब्द नकारात्मक बनतात.
आपल्या मनाची भूमी ही भीतीसाठी खूपच पोषक असल्याने तिच्यात भीतीची शेती अगदी सहजपणे होते. एखादा माणूस जर काही अभद्र बोलला, तर तुम्ही भीतीने गारठता, त्रस्त होता.
विचार करता, ‘खरंच त्याच्या बोलण्याप्रमाणे झालं तर…’ कित्येकदा या अयोग्य शब्दांचा परिणाम आयुष्याच्या अंतापर्यंत टिकून राहतो. जसं, एखाद्या माणसाला अॅलर्जीमुळे चेहर्यावर व्रण आला आणि तो पाहून जर त्याला कुणी म्हणालं, ‘अरे ही तर कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणं आहेत.’ हे ऐकल्यावर त्या माणसावर काय परिणाम होईल? तो बिचारा केवळ त्या बोलण्याचा सतत विचार करून, विनाकारण आपल्या आयुष्यात कॅन्सरला आमंत्रित करेल. प्रत्यक्षात जे नाहीच ते देखील तो साकार करेल. आपल्या शब्दांचा समोरच्या माणसावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, याची बोलणार्याला सुतराम कल्पनाही नसते.
एखाद्याचे कडवट, कटू शब्द नकारात्मक परिणाम घडवून आणतात, तर कुणाचे सकारात्मक शब्द आयुष्याला सहज, सुंदर आणि सामर्थ्यपूर्ण बनवण्यासाठी साहाय्यक ठरतात.
जिजामातेने बाल शिवाजीच्या संगोपनात कोणतीही कसर ठेवली नव्हती. त्याचबरोबर त्यांनी शिवाजीला प्रोत्साहन देताना शब्दांची निवडही अत्यंत चोखंदळपणे केली होती. त्यांनी बाल शिवाजीच्या मनात नकळतसुद्धा, ‘तू हे करू शकत नाहीस, तुझ्यामध्ये ही शक्ती नाही, तुझ्यासाठी हे अशक्य आहे,’ असं नकारात्मक शब्दांचं बीज कधीही पेरलं नाही. परिणामी महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे स्वराज्याची स्थापना करणारे राजे लाभले.
यावरून शब्दशक्तीची किमया आपल्या लक्षात आलीच असेल. म्हणूनच शब्द तोलून-मापून वापरणं खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्याप्रमाणे पैसे खर्च करताना आपण घासाघीस करतो, काटकसर करतो त्याचप्रमाणे शब्दांची निवड देखील अचूकपणे करणं आवश्यक आहे. अन्यथा, खरेदी करताना लोकांचा कल नेहमी, ‘नाही…नाही… जरा भाव कमी करा’ असं म्हणत पैसे वाचवण्याकडे असतो. जेणेकरून वाचवलेल्या पैशाचा उपयोग इतरत्र करता यावा. त्याचप्रमाणे शब्द देखील ‘मोजूनमापून’ वापरल्यास त्यांचा संग्रह होईल, त्यांची शक्ती वाढेल.
यासाठी शब्दांची शक्ती समजून घ्या. ‘माझा एकही शब्द वाया जाता कामा नये… माझ्या शब्दांमध्ये सद्भावना आणि विश्वास असावा. मी उच्चारलेला प्रत्येक शब्द ऐकणार्यासाठी सफलता प्राप्त करून देणारं बीज असावं,’ अशा दृढ भावनेसह आपण जेव्हा शब्दांचा उपयोग करायला शिकाल, तेव्हा इतरांच्या जीवनात आनंद आणि सकारात्मक विचार पेरण्यासाठी निमित्त बनाल. मग आपण देखील आनंदी जीवनाचे स्वामी व्हाल. कारण निसर्गाचा नियम तर सगळेच जाणतात, ‘आपण ज्या गोष्टीसाठी निमित्त बनतो, ती गोष्ट कित्येक पटींनी वाढून आपल्याकडे परत येते.’
ही गोष्ट झाली आपण स्वतःबद्दल उच्चारत असलेल्या शब्दांबद्दल. पण त्याचबरोबरच, इतरांकडून उच्चारलेले चुकीचे शब्द, टीका कशाप्रकारे घ्यायची याविषयी सजग होणं आवश्यक आहे. एखाद्याचा चुकीचा शब्द आपण जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत त्याचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नाही. जसं एखाद्याला दिलेलं दान तो जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे इतरांनी आपल्याविषयी केलेली टीकाटिप्पणी किंवा अपशब्द ऐकून, ‘लोक मला असं का समजतात?’ असा एकांतात विचार करत बसू नका. केवळ असा विचार केल्याने तुम्ही त्यांच्या शब्दांना अधिकाधिक शक्ती, सामर्थ्य प्रदान करत असता. जोपर्यंत आपण त्यांना शक्ती देत नाही, ते सामर्थ्यहीन असतात.
शब्दशक्तीचा कधीही दुरुपयोग होता कामा नये, असा ठाम निश्चय करा. कारण आपले शब्द आपल्याकडेच परततात. आपण एखाद्याशी खोटं बोललो, तर ते वाढून पुन्हा आपल्याकडेच येणार आहे याची कल्पना अज्ञानामुळे मनुष्याला येत नाही. कपटी लोकांचे शब्द जेव्हा त्यांच्याकडे परततात, तेव्हा त्यांचे काय हाल होतात, हे आपण कैकेयी-मंथरा, शकुनी-दुर्योधन यांसारख्या उदाहरणांतून योग्य प्रकारे जाणतोच.
ज्याप्रमाणे शब्दशक्तीचा चुकीचा वापर करायचा नाही, त्याचप्रमाणे दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या शब्दांचं अकाउंटही न विसरता लिहिण्याची सवय लावून घ्यायला हवी. दिवसभरात किती चांगल्या, सकारात्मक, प्रेरणादायी शब्दांचा वापर झाला किंवा किती कटू शब्दांचा उच्चार झाला, याचा हिशेब ठेवा. शब्द, पैसा समजून खर्च करा. पैसे दिल्यानंतर मोबदल्यात योग्य वस्तू मिळायलाच हवी या गोष्टीविषयी आपण जसे सतर्क असतो, तसे शब्द खर्च केल्यानंतर त्या बदल्यात समोरच्या माणसाची चेतना वाढली पाहिजे या गोष्टीबाबत देखील जागरूक राहायला हवं. हा विचारच तुम्हाला तुम्ही उच्चारत असलेल्या शब्दांबद्दल तत्काळ सजग बनवेल. तुम्हाला शब्दांच्या शक्तीची जाणीव होईल.
शब्दांचा उपयोग इतरांची निंदा करण्यासाठी कधीही करू नका. मनुष्य जेव्हा परनिंदा करतो, तेव्हा त्याचा समोरच्या माणसाला कमी लेखण्याचा उद्देश असतो. जसं, एक रेघ ओढलेली आहे आणि आपल्याला सांगितलं, की ही रेघ हात न लावता, न पुसता छोटी करा. तेव्हा तुम्ही काय कराल? तिच्यापुढे अशी एक मोठी रेघ ओढाल, ज्यामुळे पहिली रेघ या मोठ्या रेघेेसमोर आपोआपच छोटी वाटू लागेल. अशा प्रकारे लोक स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी, दुसर्यांची निंदा करून, एक मोठी रेघ (कर्मबंधन) तयार करतात. परंतु ज्यांचं मन खरोखरंच मोठं असतं, ते आणखी एक मोठी रेघ ओढण्याऐवजी क्षमा-प्रार्थनेद्वारे ती मिटवण्याचा प्रयत्न करतात.
या व्यतिरिक्त एखाद्याचे बोल ऐकून किंवा एखाद्या घटनेमध्ये तुमच्या मनात जे विचार चालतात, त्यांच्याविषयी देखील आपल्याला सजग राहणं आवश्यक आहे. त्यासाठी मनातल्या मनात म्हणा, ‘माझ्या शब्दांचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी आणि चांगुलपणासाठीच व्हावा. त्याचबरोबर इतरांच्या चुकीच्या शब्दांचा परिणाम मी माझ्यावर अजिबात होऊ देणार नाही.’ हे ठामपणे ठरवल्यानंतर जेव्हा एखादा चुकीचा शब्द आपल्या कानावर पडेल, तेव्हा तुम्ही स्वत:लाच सांगा, ‘माझ्या आयुष्यात केवळ असे लोक यावेत, जे प्रसादासोबत अमृत देखील घेऊन येतील.’ त्यानंतर चुकीच्या शब्दांचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही.
‘शब्दशक्ती’विषयी सविस्तर माहिती करून घेताना आपल्याला आणखी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ती म्हणजे ‘बोलण्यात माधुर्य आणि आस्वादात उदासीन राहण्याची कला.’ याचा अर्थ, जेवताना आस्वादाविषयी आसक्ती न बाळगता, जे मिळेल ते चांगलं असा भाव ठेवायचा आहे. परंतु शब्द उच्चारताना मात्र त्यामध्ये उत्साह आणि माधुर्य असणं गरजेचं आहे. ‘शब्दांसाठी जिभेवर साखर पेरावी आणि हीच जीभ जेव्हा स्वादाच्या आहारी जाईल, तेव्हा ती उदासीन बनावी.’
ही तर झाली व्यावहारिक गोष्ट. परंतु स्वसंवाद करताना देखील आपल्याला योग्य शब्दांचाच उपयोग करायचा आहे. ज्यायोगे आपलं आंतरिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होईल.
आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो, तेव्हा रोगनिदान करण्यासाठी डॉक्टर म्हणतात, ‘जीभ बाहेर काढा’. त्याचप्रमाणे आपण गुरूंकडे जातो, तेव्हा ते म्हणतात, ‘जिभेवर जे शब्द आहेत, ते बाहेर काढा. तुम्ही दिवसभरात कोणत्या शब्दांचा उच्चार करता ते सांगा.’ अर्थात, शरीराचा डॉक्टर जीभ पाहतो तर मनाचा डॉक्टर(गुरू) जिभेवरील शब्द.
अशा वेळेस कोणी आपल्या गुरूंना एखादी गोष्ट लपवून, कमी करून किंवा वाढवून सांगितली, तर अशी कृती त्याच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधा ठरते. याउलट जेव्हा शिष्य, गुरूला प्रामाणिकपणे आणि कपटमुक्ततेने आपल्या दु:खाचं कारण सांगतो, तेव्हा गुरू त्याला समजावतात, ‘तुझ्या अमुक-अमुक शब्दानेच तुझा घात केला आहे आणि तू निष्कारण इतरांंवर दोषारोप करतोयस. लोेक तुझ्याविषयी चुकीचा विचार करतात किंवा चुकीचं बोलतात, असा विचार करण्यापूर्वी तू स्वत:बद्दल काय बोलत आहेस, हे आधी पाहा.’ अशी समज मिळाल्यानंतर मनुष्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो.
समज ही असावी, की शब्द आकाराकडून निराकाराकडे, सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारं माध्यम आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळी लोक तेजस्थानावर स्थापित होण्यासाठी ‘रामनामाचा’ जप करत असत. आजच्या काळात ‘प्रेम, आनंद, मौन, रचनात्मकता, साहस’ यांसारख्या शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला ईश्वरीय गुणांशी परिचित केलं जात आहे. ‘प्रेम, आनंद, मौन’ यांसारखे शब्द तुमची जीभ जेव्हा वारंवार उच्चारते, तेव्हा तिला त्यांची सवय होऊन हळूहळू हे शब्द तुमच्या जीवनातही उतरू लागतात.
‘प्रेम, आनंद, मौन’ या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला ईश्वर, अल्लाह, प्रभू (सेल्फ) ची आठवण यावी, सेल्फच्या गुणांच्या अभिव्यक्तीची आठवण व्हावी. या शब्दांसह आपण स्वानुभवावर जायला शिकावं. आकाराकडून निराकाराकडे, शब्दाकडून नि:शब्दाकडे, अंधकाराकडून प्रकाशाकडे आपण मार्गक्रमण करावं, ही शुभेच्छा!
चला तर मग, दीपावली सणामध्ये ही शब्दशक्ती कशा प्रकारे कार्य करते, हे जाणून घेऊ या…
दीपावली म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारं पर्व! हा सण आयुष्यातील सर्व अडीअडचणींना दूर करून, अखंडपणे पुढे चालत राहण्याचा मार्ग दाखवतो. या सणाच्या निमित्ताने लोक एकमेकांना ‘शुभ दीपावली’ अशा शुभेच्छा देतात. या शब्दांमागे, ‘सगळ्यांच्या जीवनात सुखसमृद्धी यावी, ज्ञानाच्या प्रकाशाने जीवन उजळून जावं’ ही सद्भावना असते. आनंद आणि प्रसन्नता यांच्यासह जेव्हा शुभेच्छा दिली जाते, तेव्हा ती नक्कीच फलित होते. कित्येकदा वर्षानुवर्षं बिघडलेले नातेसंबंध, केवळ या शुभेच्छांमुळे सुधारतात, तर बराच काळ रेंगाळलेली कामं देखील पूर्ण होतात. हीच आहे ‘शब्दशक्ती’! उत्सव, सणसमारंभ हे या शब्दशक्तीच्या प्रकटीकरणाचं एक मोठं माध्यम आहेत.
शब्दशक्तीची किमया जाणून सर्वांनी स्वत:च्या आणि इतरांच्याही आयुष्यात सुंदर रंग भरावेत, याच दीपावलीच्या शुभेच्छा!
One comment
Sanjay
Dhanyawad