This post is also available in: English Hindi
सरश्रींद्वारे दिलेल्या नववर्षाच्या संदेशाचा काही अंश
आपणा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा,
गोआत आपलं मनःपूर्वक स्वागत…
2020 या नूतन वर्षाचा हा संदेश अतिशय सरळ आहे… आपल्याला गोआ येथे जायचं आहे. मात्र, आपल्याला गोआ येथेच जायला का सांगितलं जातंय, याचं आश्चर्यही तुम्हाला वाटू शकतं. पण, आपण जेथे कुठे आहात – आपलं घर, ऑफिस, शाळा, कॉलेज किंवा बाजारात… आपण स्वतःला गोआमध्येच समजा. हे संपूर्ण जग, जिथे आपण राहतो, ते खरंतर गोआच आहे.
गोआचा अर्थ आहे – ग्लोरी ऑफ अॅक्शन
आपल्यासाठी 2020 या वर्षाचं लक्ष्य आहे – गोआ! याचाच अर्थ, आपल्याला ग्लोरी ऑफ अॅक्शनमध्ये राहायचं आहे. मात्र, आपली कर्मं प्रशंसनीय ‘कधी ठरतात?’ जेव्हा आपली कर्मं आपल्या अंतरंगातून, स्रोेतातून आणि शुद्ध चेतनेद्वारे उपजतात, तेव्हाच ती कौतुकास्पद ठरतात.
2019 या वर्षात आपण GOD हे लक्ष्य घेतलं होतं – ग्लोरी ऑफ ध्यान! यालाच GOA – ‘ग्लोरी ऑफ अवेअरनेस’ असंही संबोधलं जाऊ शकतं. त्यावेळी आपण आपलं ध्यान अंतर्यामी केंद्रित केलं होतं, जेणेकरून मौन साधनेत परिपक्वता यावी (2019 मधील नववर्षाचा संदेश वाचा). मागील वर्षी आपण विभिन्न प्रकारच्या ध्यानसाधना केल्या, ज्यायोगे स्वानुभव प्राप्त करून आपल्याला सदैव सजग, जागरूक अवस्थेत राहता यावं.
मात्र, या वर्षी आपण ईश्वराच्या (सेल्फच्या) उपस्थितीत कार्य करणार आहोत. वास्तविक स्वरूपाद्वारे प्रेरित राहण्यासाठी आपण सतत ग्रहणशील राहणार आहोत. आपलं कार्य स्रोताद्वारे प्रेरित असेल आणि आपल्या क्रिया मौनातून निघतील… असं मौन, ज्याची आपण ध्यानावस्थेत अनुभूती घेतो. आपण जेव्हा ध्यानात बसतो, तेव्हा स्वतःला स्वानुभवात राहण्यासाठी तयार करत असतो. मात्र, आपण जेव्हा सातत्याने, निरंतरपणे ध्यान करतो, तेव्हाच ते पूर्ण ध्यान ठरतं. म्हणून आपली कर्मं ही त्याच जागृत अवस्थेतून व्हावीत, त्यांना ईश्वरीय स्पर्श असावा.
आपण जेव्हा आपल्या खर्या, वास्तविक स्वरूपावर परततो, तेव्हा त्या भव्य अवस्थेची अनुभूती आपल्याला येते. त्यानंतरच सर्वोच्च सर्जनशीलता, आनंद, प्रेम, मौन, करुणा, साहस आणि संयम यांसारखे दिव्य गुण आपल्या कार्याद्वारे प्रकट होतात. मग त्यावेळी आपण आनंदप्राप्तीसाठी कार्य करत नाही, तर आनंदी आहोत म्हणून कार्यपूर्ती होते, किंबहुना पूर्णतेत राहूनच कार्यं पूर्ण होतात, पूर्णता प्राप्त करण्यासाठी नव्हे.
आपण जीवनरूपी स्पर्धेत भाग घेतो, तेव्हा फिनिशिंग लाइनपासूनच सुरुवात करतो. कारण तेव्हा आपण जिंकण्यासाठी नव्हे तर खेळण्याचा आनंद प्राप्त व्हावा म्हणून खेळत असतो. मात्र हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा आपण जिंकण्याच्या इच्छेचा आनंदाने त्याग करू शकतो. कारण आपलं कर्मच ज्यावेळी आपल्यासाठी फळ असतं, त्यावेळी फळप्राप्तीची अन्य कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही. त्यामुळे नेमकी हीच बाब आपल्याकडून सर्वोत्कृष्ट कर्म करून घेते आणि सर्वोच्च गुणवत्ता बहाल करते.
अशा प्रकारे केलेली कर्मं आपल्याला स्वानुभवाच्या गहनतेत नेतात. त्याचप्रमाणे आपण सेल्फच्या भव्यतेत (ग्लोरी) जितक्या अधिक दृढतेसह टिकून राहतो, तितकी आपली कर्मं देदीप्यमान होतात, उजळून निखरतात.
ग्लोरी ऑफ अॅक्शन दुहेरी सराव केल्याने प्राप्त होते. पहिला सराव म्हणजे मौन… आणि दुसरा म्हणजे आपली कर्मं समर्पित करणे! जसं – तुम्ही 2019 मध्ये ध्यानाचा सराव केला. आता तोच अभ्यास तुम्ही सातत्याने ध्यान आणि तपर्पणाच्या सवयीसह सुरू ठेवणार आहात. त्याचबरोबर आपल्या ध्यानाने अर्जित झालेलं पुण्य, जीवकल्याणासाठी तुम्ही समर्पित करणार आहात. तुमचा हा मौनाचा अभ्यास दैनंदिन कार्यात ईश्वरीय गुण प्रकट करण्यास साहाय्यक ठरेल. आजवर आपण 20 मिनिटांच्या ध्यानाद्वारे एक पुण्य अर्जित करण्याची सवय विकसित केली. पण, या वर्षी या ध्यानाचा अवधी वाढवून ते दिवसातून दोन वेळा करू शकता, म्हणजे सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी…
कर्मर्पणाच्या या सरावात आपण शारीरिक, मानसिक कार्य आणि आपले विचार ईश्वराला समर्पित करणार आहोत. येथेे आपला कर्ताभाव समर्पित होणं खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे आपलं प्रत्येक कर्म पूजेत परिवर्तित होईल. मग आपल्याकडून जे काही घडेल, ते सर्व त्या परमेश्वराचीच (सेल्फ, ईश्वर, गॉड, अल्लाह, क्राईस्ट, वाहेगुरू… आपल्याला जे हवं ते नाव आपण त्याला देऊ शकता.) अभिव्यक्ती असेल.
त्याचप्रमाणे तुमच्या सर्व क्रिया ईश्वराला समर्पित करा, असंही सांगितलं गेलंय. या जगात जे काही घडतंय, तुमच्या आयुष्यात ज्या काही घटना घडताहेत, त्या सर्व स्वीकारून सजगतेसह समर्पित करा, की ही सगळी ईश्वरीय लीला आहे. शिवाय, ही समज मिळणे हीदेखील एक कृपाच आहे. आपण जेव्हा ईश्वरीय इच्छेचा आदर करतो, ‘तुझी इच्छा तीच माझी इच्छा,’ तुझीच इच्छा पूर्ण होवो, ‘लेट दाय विल बी डन, नॉट माइन’ असं म्हणतो, यावर आपला विश्वास दृढ होतो, तेव्हा अहंकार विलीन होतो आणि ईश्वर प्रकटायला सुरुवात होते.
आपल्याला जेव्हा सगळी कार्यं समर्पित करायला सांगितली गेली, तेव्हा ऐकायला विचित्र, कसंतरीच वाटलं असेल. परंतु, नियमित सरावाने आपण आपली सर्व कर्मं ईश्वराला समर्पित करू शकता. अशा प्रकारे एक व्यवस्था निर्माण होण्यास मदत मिळते. म्हणूनच आपण कर्मर्पणाचा सराव दिवसातून तीन वेळा करून क्रिया समर्पित करू शकता.
दररोज सकाळी उठल्यानंतर सवयीनुसार यांत्रिकपणे आपण दैनंदिन कार्यं करतो. जसं – दात घासणं, स्नान करणं इत्यादी. मात्र यापुढे आता दिवसाची सुरुवात आपण सजगतेसह करणार आहोत. यावेळी आपण ईश्वरीय अनुभवात राहून, आपल्या सर्व क्रिया समर्पित करून, ‘ईश्वर उठला, आता ईश्वर हे कार्य करणार आहे, ईश्वराने हे कार्य केलं किंवा ईश्वर हे कार्य करेल,’ असं मनात म्हणणार आहोत… हे कर्मर्पण किमान 20 मिनिटं तरी व्हायलाच हवं. मग दिवसभरात पुन्हा एकदा 20 मिनिटं हे कर्मर्पण करा. आपण करीत असलेल्या क्रिया सजगतेसह समर्पित करा. उदाहरणार्थ – संगणकावर काम करणं, लिहिणं, एखाद्याशी आपल्या कार्याविषयी चर्चा करणं… इत्यादी.
स्वतःला सांगा, ‘ईश्वर आता सजगतेसह या शरीराद्वारे जागृत कर्म करेल.’ असं मनात म्हणून आपण करत असलेल्या क्रियांवर लक्ष केंद्रित करा. जर असं करताना आपलं मन विचलित झालं, मध्येच कर्मर्पणाची क्रिया खंडित झाली, तर 20 मिनिटांचं हे सेशन पुन्हा सुरू करायचं आहे, जेणेकरून तुमच्या सरावात अधिक दृढता येईल.
ज्याप्रमाणे पोहणारा मनुष्य पुलाच्या भिंतीला स्पर्श करून पुन्हा फिनिशिंग लाइनजवळ येतो, त्याचप्रमाणे तुम्हीदेखील कुठल्याही कार्याचा आरंभ ईश्वरीय अनुभूती घेऊनच करायला हवा. मग कमीत कमी त्याच उपस्थितीत 20 मिनिटं तरी राहून त्यानंतर अन्य कार्य करायला हवं.
अशाप्रकारे आपण दिवसभरात किमान 3 कर्मर्पणाच्या सेशन्सचा सराव तर नक्कीच करू शकतो. जितका जास्त सराव तुम्ही कराल, तितकं हे कार्य तुमच्याकडून सहजपणे होईल.
ध्यानात आणखी दृढता आणण्यासाठी याशिवायही इतर अनेक पद्धती आपण उपयोगात आणू शकतो. ध्यानावस्थेत असताना एखादा विचार सारखा त्रस्त करत असेल, तर त्यावेळी नाकाने जोरात श्वास सोडा, जणू काही आपल्या वरच्या ओठावर एक माशी बसली आहे आणि तिला उडवायचं आहे. आपलं मन एकाग्र करण्यासाठी अशा प्रकारची शारीरिक क्रिया फारच उपयुक्त ठरते, प्रभावी ठरते.
आपलं मन कर्मर्पण करण्याऐवजी, एखाद्या कार्याचं श्रेय घेऊ इच्छित असेल, तेव्हा ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरते. शिवाय, आपल्या कर्मर्पणाच्या सरावात दृढता, गहनता आणण्यास ती साहाय्यक ठरेल.
तसंच, ज्या लोकांचं वागणं आपल्याला आवडत नाही, त्यांना आपला आरसा बनवा, त्यांचा व्यवहार बघून स्वतःचं आत्मनिरीक्षण करा. आपल्यातही असे नकारात्मक पॅटर्न, अवगुण तर नाहीत ना, यावर चिंतन करा आणि जर असतील तर ते त्वरित दूर करा.
आपण ध्यानात बसाल तेव्हा आपल्या अंतर्यामी चेतनेचं सागर-मंथन पाहा. जणू पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे दुधाच्या महासागराप्रमाणे हे भासेल, ज्यात दैवी आणि राक्षसी दोन्ही शक्तींचा सहभाग असेल, जेणेकरून जीवनातील वाईट गोष्टींचा नाश झाला होता.
ध्यानादरम्यान प्रत्येक गोष्टीकडे आपण अनासक्त भावनेने, साक्षी भावनेने बघा. तोपर्यंत सजगतेने तटस्थ अवस्थेत राहा, जोपर्यंत त्या चेतनेची उपस्थिती जाणवून तिची अनुभूती येत नाही. कारण ही अवस्थाच जीवनाचं संपूर्ण सार आहे, अमृत आहे.
आम्ही थोड्याच अवधीत एक वेगळं आर्टिकल आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहोत. त्यात चेतनेच्या महासागरावर, मंथनावर चर्चा करणार आहोत, त्यासाठी आमचा ब्लॉग फॉलो करा.
2020 या वर्षात पूर्ण प्रामाणिकपणासह, निष्ठेसह ‘ग्लोरी ऑफ ध्यान’ (तपर्पण मेडिटेशन) आणि ग्लोरी ऑफ अॅक्शन (कर्मर्पण) करा. याला आपण आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवा, याच्याशी एकरूपता साधा. हे कार्य आपल्याला आयुष्याच्या प्रवासात, स्वतःमध्ये स्थापित करण्याच्या दिशेने प्रेरित करेल आणि आपल्या मानवी जीवनाचं लक्ष्य, ध्येय पूर्ण होईल.
One comment
सुभाष भंगाळे
कोटी कोटी धन्यवाद सरश्री