This post is also available in: English Hindi
या जगात असं कोण असेल, जो सुखी, संतुष्ट आणि गौरवशाली जीवन जगण्याची इच्छा बाळगत नसेल? याचं उत्तर आहे, आपण आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने सुखी, संतुष्ट, गौरवशाली जीवन जगावं, असं तर प्रत्येकालाच वाटत असतं. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, की असा जादू करणारा कोणता मंत्र आहे, जो तुमची ही इच्छा पूर्ण करू शकतो? तर, तो मंत्र आहे आत्मनिर्भरता! होय, आत्मनिर्भरता हा एक असा गुण आहे, जो तुमच्या जीवनाला पूर्णता प्रदान करून तुम्हाला सुखी, संतुष्ट आणि गौरवशाली बनवतो.
तुमची आत्मनिर्भर बनण्याची, स्वावलंबी बनण्याची परिभाषा कोणती आहे? तुमच्या मते स्वावलंबी बनणं म्हणजे नेमकं काय? सर्वसामान्यपणे स्त्री वा पुरुष जर स्वतःस आणि स्वतःच्या कुटुंबीयांस प्राथमिक सुख-सुविधा देऊ शकत असतील, त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित होईल इतकं कमावू शकत असतील, तर ते आत्मनिर्भर आहेत असं मानलं जातं. परंतु आत्मनिर्भरतेचा हा अतिशय सीमित अर्थ झाला. आत्मनिर्भरतेचं स्वरूप याहून खूपच व्यापक आहे, याचा विस्तार फार मोठा आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या नात्यांमध्ये आत्मनिर्भर बनाल, तुमचा आनंद जेव्हा कोणत्याही बाह्य कारणांवर अवलंबून असणार नाही, तेव्हाच खर्या अर्थाने तुम्ही आत्मनिर्भर बनाल.
यासाठी प्रथम नात्यांतील आत्मनिर्भरता म्हणजे काय, हे समजून घेऊया. त्यासाठी एका पति-पत्नीचं उदाहरण पाहू. या दोघांचं नुकतंच लग्न झालं होतं. पत्नी घर तर व्यवस्थित सांभाळत होती; परंतु तिला बाहेरील कामकाज, व्यावहारिकता या गोष्टींची मात्र तितकीशी जाण नव्हती, त्यामुळे अशा गोष्टींसाठी ती नेहमी तिच्या पतीवरच अवलंबून राहत असे. पतीचं पत्नीवर खूप प्रेम होतं आणि तो तिची खूप काळजीही घेत असे. जी कामं करणं तिला जमत नसे, अशा सर्व कामांमध्ये तो तिला सदैव मदत करत असे. खरंतर अशा सर्वच कामांचा भार त्याने आपल्या खांद्यावर घेतला होता, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परिणामी पत्नी कधीही नवीन काही शिकू शकली नाही आणि ती सदैव पतीवर अधिकाधिक अवलंबून राहू लागली. काही दिवस असेच सुरळीतपणे पार पडले. पण नंतर हळूहळू पती पत्नीवर नियंत्रण ठेवू लागला. तो तिला त्याच्या मनाप्रमाणे वागवू लागला, ‘तू हेच कर आणि ते करू नकोस… कारण तुला ते जमणार नाही.’ पत्नीने धीर एकवटून जरी काही करण्याची इच्छा व्यक्त केली, तरी पती तिला म्हणत असे, ‘‘राहू दे, तुला हे जमणं शक्यच नाही.’’ त्यामुळे हळूहळू पत्नीचा आत्मविश्वास कमी होऊ लागला.
कालांतराने कामाच्या वाढत्या व्यापामुळे पतीची चिडचिड सुरू झाली. ‘‘सर्वकाही मलाच पाहावं लागतं, मलाच सारं करावं लागतं… तू काहीच कामाची नाहीस, इतरांच्या बायका बघ, त्या घरही सांभाळतात आणि बाहेरची कामंही करतात.’’ अशा रीतीने बरोबरीचं स्थान असलेल्या नात्यांमध्ये पती सुपिरिअर होत गेला आणि पत्नी इन्फिरिअर! परिणामी पत्नीची घुसमट होऊ लागली. दोघांमध्ये वादविवाद सुरू होऊन, नात्यात वितुष्ट येऊ लागलं.
पति-पत्नीची ही कहाणी जर आपण आणखी पुढे वाढवली, तर नात्यांमधील आत्मनिर्भरतेची आणखी एक भूमिका प्रकाशात येईल. काही दिवसांनी त्यांना मूल झालं. पतीशी बिघडलेल्या संबंधांची उणीव भरून काढण्यासाठी आता पत्नी मुलात जीव रमवू लागली. ती त्याची खूप काळजी घेऊ लागली, त्याचे भरपूर लाड करू लागली. तो आठ-नऊ वर्षांचा झाला, तरीदेखील ती त्याला स्वतःच्या हातानेच खाऊ घालत असे. स्वतःच त्याला सॉक्स-शूज घालत असे, त्याचे कपडे बदलत असे, त्याचं शाळेचं प्रोजेक्ट वर्क करून देत असे. लहानसहान गोष्टींसाठीही मुलगा ‘आई… आई’ करू लागला, की त्याची हाक ऐकून ती हातातलं काम सोडून लगेच त्याच्याकडे धाव घेत असे. अशा प्रकारे तिने आपल्या मुलाला पूर्णपणे परावलंबी बनवलं आणि मग पुन्हा त्याच कहाणीची पुनरावृत्ती झाली.
हळूहळू मुलगा मोठा होऊ लागला होता, तरीही छोटे-मोठे निर्णय घेण्यासाठी, तसंच प्रत्येक कामासाठी तो आईवरच अवलंबून राहत असे. आता आईदेखील त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवू लागली, ‘असं कर, तसं करू नकोस… आता यावेळी हा अभ्यास कर… आता ते वाच.’ परंतु हळूहळू त्याची कामं करताना ती चिडू लागली. आता ती त्याला म्हणत असे, ‘‘इतका मोठा झालास तरी एक छोटंसं कामही तू स्वतः करू शकत नाहीस… इतर मुलं पाहा, ती स्वतःची सगळी कामं स्वतःच करतात. तू मात्र एक क्षणभरही मला स्वस्थ बसू देत नाहीस.’’ बाहेर ती तिच्या मैत्रिणींना सांगत असेे, ‘‘माझ्याशिवाय त्याचं कोणतंही काम होत नाही, त्याचं साधं पानही हलत नाही. उद्या कदाचित मीच जर राहिले नाही, तर त्याचं काय होईल कोण जाणे?’’ पति-पत्नीच्या नात्यात जी पत्नी स्वतःला ‘इन्फिरिअर’ समजत होती, तीच आई मुलाच्याबाबतीत मात्र ‘सुपिरिअर’ आणि ‘वॉन्टेड’ बनली.
अशा प्रकारे लोक नात्यांमध्ये कळत-नकळत कधी प्रेमाच्या नावाखाली, तर कधी काळजीच्या नावाखाली इतरांना परावलंबी बनवतात. छोट्या छोट्या कामातही मुलाला त्रास होऊ नये म्हणून त्याला मदत करतात आणि त्याचं काम स्वतःच झटपट पूर्ण करून टाकतात. त्यामुळे मुलाचा विकास होऊच शकत नाही, मूल काही शिकूही शकत नाही. परावलंबी प्रवृत्ती बनल्याने त्याचं कंट्रोल, नियंत्रण सदैव इतरांच्या हातात राहतं. परिणामी त्याच्या आत्मसन्मानाला इजा पोहोचते, त्याचा आत्मगौरव (सेल्फ एस्टीम) राखला जात नाही.
वरील उदाहरणात वरकरणी पति-पत्नीच्या नात्यांमध्ये पत्नी आणि आई-मुलाच्या नात्यात मुलगा परावलंबी दिसतो. परंतु वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर स्वतःला आत्मनिर्भर समजणारा, इतरांचा कंट्रोल आपल्या हातात ठेवणारा माणूसच अधिक परावलंबी झालेला आढळतो. कारण तो सतत इतरांच्याच बाबतीत विचार करत असतो, त्यांची चिंता करण्यातच व्यग्र असतो. तो विनाकारण सर्व ओझं स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालतो, त्यामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही तो तणावग्रस्त राहू लागतो. असं केल्याने त्याच्या अहंकाराला पुष्टी मिळते.
काही लोक इतरांचं ओझं घेऊन चालतात आणि आपण खूप ‘महत्त्वपूर्ण’ आणि ‘वॉन्टेड’ आहोत असं ते स्वतःला समजू लागतात. ते लोकांना सांगतात, ‘‘माझ्याशिवाय तर तो एकही दिवस राहू शकत नाही.’’ असं म्हणून ते स्वतःचा अहंकार वाढवत राहतात.
या दृष्टिकोनातून पाहिलं, तर नात्यांमध्ये परस्पर सहयोग (इंटरडिपेंडन्सी) असायला हवा होता; परंतु इथे तर परावलंबन घडलं. लोक एकमेकांवर अवलंबून राहू लागले. सगळं लक्ष एकाच माणसावर केंद्रित झालं. अशा वेळी आपण पृथ्वीवर का आलो आहोत… आपल्याला मनुष्यजन्म का मिळाला… आपण कोणकोणते बोध घ्यायचे आहेत… या गोष्टी ते कधीही जाणू शकत नाहीत. मूळ लक्ष्य तर बाजूलाच राहिलं आणि केवळ एका मनुष्यामागेच जीवन व्यतीत झालं. याचं कारण म्हणजे समोरच्याला आत्मनिर्भर होण्यासाठी सहकार्यच केलं नाही, उलट त्याला परावलंबी बनवून त्याच्या विकासाचे सर्व मार्गच बंद केले.
एखादा मनुष्य असा असतो, जो इतरांना विचारल्याशिवाय कोणतंही काम करू शकत नाही. जसं, ‘हा शर्ट परिधान करू की नको… अशी हेअर स्टाइल ठेवू की नाही…’ असं जर तो इतरांना विचारत असेल, तर लाखो रुपये मिळवत असूनही त्याला परावलंबीच म्हणावं लागेल. एखाद्याला चार लोकांना सल्ला दिल्याशिवाय चैनच पडत नसेल, शांतीच लाभत नसेल, तर त्यालादेखील परावलंबीच म्हणावं लागेल. लोक जोपर्यंत त्याची प्रशंसा करत नाहीत, तोपर्यंत तो स्वतःला यशस्वी समजत नाही. वास्तविक असा मनुष्यही परावलंबीच आहे. तसंच, काही लोकांना सतत हातात मोबाइल हवा असतो. दारावरची बेल वाजली तर दरवाजा उघडायला जातानादेखील ते मोबाइल हातात घेऊनच जातात. ही टोकाची परनिर्भरता आहे.
तात्पर्य असं, की तुम्ही जर कोणत्याही गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून असाल, तर तुम्ही आत्मनिर्भर नाही. परस्परांना सहकार्य करणं, वस्तूंचा उपयोग करणं निराळं; परंतु इतरांशिवाय अपंग बनणं, हे मात्र परावलंबनच आहे.
नात्यांमध्ये दोन्ही पक्ष आनंदी, संतुष्ट आणि गौरवशाली राहावेत, यासाठी ते आत्मनिर्भर असणं आवश्यक असतं. आत्मनिर्भरता नात्यांमध्ये पूर्णता आणते, नातं सुदृढ बनवते. एकमेकांकडे लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या, त्यांना योग्य ती मदत करा; परंतु त्यांना अपंग कदापि बनवू नका. केवळ त्यांचा विकास होण्यासाठी जेव्हा त्यांना मदत कराल, तेव्हाच तुमचं आणि तुमच्या प्रियजनांचं जीवन गौरवशाली बनेल.
…सरश्री
4 comments
Reshma Katkar
आत्मनिर्भर या शब्दाचा खरा अर्थ आज समजला अनंत कोटी धन्यवाद! सरश्री !
Rajan
Anant koti koti Dhanyawad Sirshreeji Hàppy Thoughts 🙏🙏🙏
Roshani
Awesome article and explain very nicely…. It is need of hour today’s life… We must take help others and help others to live wonderful life for that we are here on this earth. Happy thoughts 🙏🙏 sishree ji 😃👆
Roshani
Happy thoughts 🙏😃
Awesome article… Complete meaning of independence today i understood… Thank you so much 😃sishree ji🙏🙏