This post is also available in: Hindi
इच्छा… कामना… आकांक्षा… यांना कोणतंही नाव द्या; सर्वांचा अर्थ एकच आहे. मनुष्याचं मन क्षणोक्षणी इच्छांनी भरलेलं असतं. एक इच्छा पूर्ण होते न होते, तोवर दुसरी इच्छा जागृत होते. मग तिसरी… चौथी… आणि हे चक्र अव्याहतपणे अगदी जीवनाच्या अंतापर्यंत सुरूच राहतं. इतकंच नव्हे, तर मृत्यू दारात उभा असतानाही मनुष्याच्या मनात एखादी तरी इच्छा असतेच. खूप कमी लोक शांती आणि पूर्णता प्राप्त करून मृत्यूचा स्वीकार करतात. अन्यथा, बहुसंख्य लोक तर ‘हे राहून गेलं… ते व्हायला हवं होतं…’, अशा प्रकारच्या अपूर्णतेतच शरीराचा त्याग करतात.
अशा त्याच्या कोणकोणत्या इच्छा असतात? वास्तविक असा प्रश्न विचारण्याऐवजी अशी कोणती इच्छा आहे, जी तो बाळगत नाही? असा प्रश्न विचारायला हवा. कारण पृथ्वीवर असणार्या सर्व वस्तूंपासून ते अगदी आकाशात दिसणार्या सर्व बाबींविषयी मनुष्य कामना करतो, करू शकतो. तुम्ही एखादी वस्तू पाहता, तेव्हा ‘ही पहिजे’ अशी इच्छा मनात जागृत होते. मग ती छोटी, मोठी अशी कुठल्याही प्रकारची असो. कुणाकडे अद्ययावत मोबाइल पाहिला, की लगेचच तुम्हाला स्वतःचा फोन जुना वाटू लागतो. लगेच समोरच्या माणसाकडे जसा फोन आहे, तसाच फोन तुमच्याकडेदेखील असावा अशी कामना मनात निर्माण होते. ‘विंडो शॉपिंग’ या गोंडस नावाखाली वेगवेगळ्या कपड्यांनी, दागदागिन्यांनी आपली कपाटं भरून टाकावीत असं तुम्हाला वाटतं.
इतरांकडील वस्तू पाहून मनुष्य अगणित इच्छांना जन्म देतो आणि त्यांच्या मागे धावत राहतो. इतकंच नव्हे, तर निसर्गानेदेखील त्याच्या इच्छेनुसार कार्य करावं अशी कामना तो बाळगतो. जसं, उष्णता जास्त नसावी… मी घरी पोहोचल्यानंतरच पाऊस पडावा… इत्यादी.
* इच्छा हेच दुःखाचं कारण
मनुष्याची एक इच्छा पूर्ण होताच त्याला आनंद होतो आणि त्वरित त्याचं मन दुसर्या इच्छेमागे धावतं. त्याचबरोबर ती इच्छा पूर्ण होताच, त्याच्यात ‘मी केलं’ हा अहंकारदेखील निर्माण होतो. त्यानंतर त्याच्या मनात इच्छांची इच्छा जागृत होते. म्हणजेच प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायलाच हवी, या अट्टहासाने मनुष्य काम करतो. इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अहंकार वाढतो. इच्छा पूर्ण होण्यात अडथळा निर्माण झाला किंवा उशीर झाला तर क्रोध अनावर होतो. इच्छा पूर्ण झाली नाही, तर तो नैराश्याने ग्रासून जातो. अशा प्रकारे परिस्थिती कशीही असली, तरी इच्छेमागोमाग दुःख येतंच.
याचा अर्थ, आपण इच्छा बाळगायचीच नाही का? कामनांशिवायच जगायचं का? तर, ‘नाही’ असंच या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण कोणतीही इच्छा न बाळगता जीवन जगताच येणार नाही. मानवी जीवनात आशा, इच्छा-आकांक्षा यांना खूप महत्त्व आहे. परंतु त्याचवेळी प्रत्येक इच्छेला योग्य दिशा देणंदेखील तितकंच गरजेचं आहे. यासाठीच जागृतीची आवश्यकता असते.
* इच्छा कशा निर्माण होतात
मनुष्य असमंजसपणे वेगवेगळ्या इच्छा निर्माण करत राहतो. फावल्या वेळेतदेखील तो इच्छांमध्ये मग्न असतो. इतरांचं पाहून तो अगणित इच्छांची शिकार बनतो. मग तो घरात असो वा बाहेर, त्याच्या मनात इच्छा जागृत होतच राहतात. निरनिराळ्या मनोकामनांवर विचार करून त्या पूर्ण करण्यात आपलं जीवन व्यतीत करणं, याची मनुष्याला बालपणापासूनच सवय जडलेली असते. मुलगा शाळेत जातो, नंतर महाविद्यालयात जातो. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो नोकरी अथवा व्यवसायात स्थिरस्थावर होतो. हे सगळं करत असताना तो कितीतरी इच्छांचा पाठलाग करत असतो. परंतु त्याने एखादं प्रभावशाली ध्येय बाळगून जीवन जगण्याबाबत विचार केला, स्वतःला एखादं उच्च लक्ष्य दिलं, तर त्याच्या मनात असमंजसपणा आणि अज्ञान यांमुळे ज्या इच्छा निर्माण होतात, त्यांना अटकाव बसू शकेल. यासाठी प्रत्येकाने स्वतःला एक लक्ष्य देणं गरजेचं आहे.
* इच्छा पूर्ण करण्यात अंतर्मनाची भूमिका
मनुष्याच्या जीवनात अंतर्मनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. अंतर्मन हे मनुष्याचा असा एक सोबती आहे, जे कोणताही विचार न करता त्याला पूर्ण सहकार्य करतं. त्यामुळेच तुम्ही मनात इच्छा जागृत करता आणि पूर्ण झाल्या नाही, की दुःखी होता. परंतु लगेचच एक वेगळी इच्छा निर्माण करता. अशा वेळी हे करण्याची आवश्यकता आहे की नाही, याचा विचार न करता अंतर्मन त्या इच्छेवर कार्य करू लागतं. नव्हे, त्याची सवयच जडवून घेतं. ज्या गोष्टींची पुनरावृत्ती मनुष्याकडून होते, त्या त्याला पुढे सोयीस्कर ठराव्यात, त्यासाठी त्याला वारंवार प्रयत्न करावा लागू नये, म्हणून अंतर्मन अशा गोष्टी निमूटपणे करत राहण्याची सवय स्वतःला लावून घेतं. परंतु व्यक्तीच्या इच्छांबाबत एकदा का तुम्ही सजग झालात, त्या पूर्ण केल्या नाहीत, अथवा त्या इच्छांच्या मागे धावणं बंद केलं, तर त्या विशिष्ट सवयीबद्दल अंतर्मनाला योग्य संकेत मिळेल. ‘आजतागायत तू इच्छांची उजळणी करण्याचं काम अगदी यंत्रवत करत होतास, मात्र आता ते करण्याची काही एक आवश्यकता नाही,’ ही बाब तुम्ही संपूर्ण सजगतेनं अंतर्मनाकडे पोहोचवताच, त्याला योग्य संकेत देताच, या सवयीतून मुक्त होण्याचं कार्य सुरू होईल.
* अनावश्यक इच्छांचा समजेसह त्याग करा
एकदा का तुम्ही तुमच्या इच्छांबाबत सजग झालात, की ‘मी जी कामना बाळगत आहे, ती खरंच माझी आवश्यकता आहे, की इच्छा?’ हे जाणताच मनात योग्य बीज रोवण्याचं कार्य सुरू होईल. मात्र, यासाठी पूर्ण सजगतेसह स्वतःला सांगावं लागेल, ‘‘आता मला खरंच जे हवंय, त्याच गोष्टींचं सजगतेने पुनरुच्चारण करायचं आहे. माझ्या जीवनात मला जे हवंय, तेच मला अंतर्मनाला शिकवायचं आहे.’ त्यानंतर ज्या गोष्टींची खरोखर तुम्हाला इच्छा आहे, त्या सर्व गोष्टी तुमचं अंतर्मन देईल. अशा रीतीने ज्या काही सवयी तुम्हाला जडल्या आहेत, त्यांची आता अजिबात आवश्यकता नाही. त्यातून मुक्त व्हा. सर्वप्रथम तुमचं नुकसान करणार्या सवयी नष्ट व्हायला हव्यात. त्याचबरोबर ज्या सवयी नुकसानदायी नाहीत, परंतु तुमच्या लक्ष्याशीही निगडित नाहीत, त्यातूनही मुक्त होण्याचा प्रयत्न करायला हवा.
* इच्छा ओळखायला शिका
मनुष्याच्या जीवनात तीन प्रकारच्या इच्छा असतात. व्यक्तिगत इच्छा, शुभेच्छा आणि तेजइच्छा. सामान्यतः मनुष्याचं जीवन व्यक्तिगत (अहंकाराच्या) इच्छा पूर्ण करण्यातच व्यतीत होतं. परंतु जेव्हा त्याच्यात जागृती येते, तेव्हा तो विशिष्ट लक्ष्य बाळगून मार्गक्रमण करण्याची तयारी करतो. अशा वेळी तो आपल्या इच्छांना समजून घेतो, इच्छांचं दर्शन करत पुढील वाटचाल करतो. ध्यान (सजगता) हे एक असं माध्यम आहे, जिथे मनुष्य आपल्या इच्छा स्पष्टपणे पाहू शकतो. ध्यानाच्या प्रकाशात प्रत्येक इच्छा प्रकट होऊ शकते. याद्वारेच मनुष्याला त्याच्या प्रत्येक अवयवाशी संलग्न असलेल्या आणि मनात दबून गेलेल्या इच्छाही माहीत होतात. ‘मी खरंच मुक्त होऊ इच्छित आहे, की बंधनातच खुश राहणं मला आवडतं,’ हे आंतरिक इंद्रियांद्वारे तुम्ही ध्यानातच समजू शकता. मननाद्वारे तुम्ही तुमच्या इच्छांची अवस्था जाणू शकता. इच्छांचा शोध घेऊन त्यांच्या सखोलतेत जाऊ शकता. तुमची प्रत्येक इच्छा तुमचं पुढील पाऊल प्रकाशित करते.
यासाठीच आता तुम्ही इच्छांबाबत सजग व्हायला हवं. तुमची इच्छा अव्यक्तिगत बनावी, ही शुभेच्छा बाळगा. आजपर्यंत जितके शास्त्रज्ञ, संशोधक, लेखक होऊन गेले, ते त्यांच्या कार्यानेच अमर झाले. वेगवेगळ्या क्षेत्रांत त्यांच्याकडून झालेलं संशोधन, त्यांचे सिद्धांत यांच्या आधारावरच आजदेखील त्यांचं पुढील कार्य अव्याहतपणे सुरू आहे. ज्या लोकांद्वारे हे कार्य झालं, होत आहे, ती त्यांची अव्यक्तिगत इच्छा होती. तुम्हीदेखील जेव्हा काही अनोखा विचार कराल, तेव्हा तुमचे विचार स्पष्ट असतील, त्या इच्छा पूर्ण होण्याचा मार्गदेखील तुम्हाला आपोआप गवसेल. परंतु तुमचा प्रत्येक विचार, इच्छा पूर्णपणे समजून घेण्यासाठी प्रथम दररोज नियमितपणे ध्यानावस्थेत बसा.
अशा प्रकारे तुम्ही व्यक्तिगत इच्छेतून मुक्त होऊन शुभेच्छेकडे मार्गक्रमण करू लागाल. ‘मी शरीर नाही, मी केवळ शरीराच्या माध्यमातून माझं अस्तित्व आणि माझ्या जिवंत असण्याची अनुभूती घेत आहे.’ हे सत्य तुम्ही ध्यानात अनुभवाने जाणाल. तुम्हाला ध्यानातून या सत्याची इतकी दृढता प्राप्त व्हावी, की तुमच्यात तेजइच्छा आपोआपच जागृत व्हावी. त्याच वेळी तेजइच्छेपुढे इतर सर्व इच्छा तुच्छ असल्याचं तुम्हाला जाणवेल. त्यानंतर शरीरासोबत जी इच्छा असेल, ती अव्यक्तिगत असेल.
व्यक्तिगत इच्छेपासून ईश्वराच्या इच्छेपर्यंतचा हा मार्ग निश्चितच सहज सुलभ नाही; परंतु कठीणही नाही. ध्यान, मनन आणि शोध यांद्वारे व्यक्तीच्या अंतहीन इच्छा जाणून मूळ इच्छा म्हणजे तेजइच्छेपर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग अंगीकारा, खर्या मुक्तीचा आनंद प्राप्त करा.
~ सरश्रींच्या मार्गदर्शनावर आधारित
‘हा विषय सविस्तर जाणण्यासाठी आपण पुढील गोष्टींचा लाभ घेऊ शकता :
वॉव पब्लिशिंग्जद्वारे प्रकाशित सरश्री लिखित खालील पुस्तकं वाचा – कशी मिळेल इच्छांपासून मुक्ती
या विषयावरील अधिक माहितीसाठी संपर्क साधा – मो. 9922081483
Add comment