This post is also available in: Hindi
व्यक्तिगत जीवन असो वा सामाजिक, ऑफिस असो वा घर, स्वतःशी असो वा इतरांशी… सर्व ठिकाणी एक कॉमन समस्या दिसून येते. ती म्हणजे ‘मिस कम्युनिकेशन’ अर्थात चुकीच्या पद्धतीने संवाद साधणं.
यासाठी सर्वप्रथम कम्युनिकेशन म्हणजे काय, हे समजून घेणं आवश्यक ठरतं. संवादाद्वारे, चर्चेद्वारे एखादा मनुष्य समोरच्या माणसाला जो संदेश देऊ इच्छितो, तो त्याला सुयोग्यपणे मिळाला आणि त्यातून अपेक्षित परिणाम साधला गेला, तर त्याला योग्य कम्युनिकेशन अर्थात उत्तम संभाषण म्हणता येईल. परंतु उत्तम संभाषणाची कला अगदी कमी लोक जाणतात. जीवनातील सर्व क्षेत्रांत आज योग्य पद्धतीने संवादाचा अभाव, हीच समस्या प्रामुख्याने दिसून येते. सामान्यतः असं घडतं, की चर्चेद्वारे लोकांना सांगायचं असतं एक आणि ऐकणारे मात्र ऐकतात भलतंच काही तरी, त्यामुळे गैरसमज वाढतात. यासाठी संवादातील पहिला आणि महत्त्वपूर्ण पैलू आहे- ‘पूर्ण आणि समोरचा सांगत असलेलं लक्षपूर्वक ऐकणं; समजलं नसेल तर पुन्हा विचारणं.’
कम्युनिकेशनविषयी सर्वांच्या मनात एकच कल्पना आहे, कम्युनिकेशन म्हणजे संवाद. वास्तविक कम्युनिकेशनची पहिली पायरी आहे, ‘listening’ अर्थात ‘ऐकणं’. मात्र, विचारांच्या गर्दीत हरवलेला मनुष्य योग्य पद्धतीने ऐकू शकत नाही. त्याचबरोबर एखाद्याशी संभाषण करत असताना मनुष्य त्याची एक प्रतिमा आपल्या मनात तयार करतो आणि त्यानुसारच तो त्याचं बोलणं ऐकतो. याचाच अर्थ, तो समोरील माणसाचं संभाषण पूर्णपणे ऐकत नाही, तर त्याच्या विचारांनुसार जितकं त्याला आवश्यक वाटतं, तितकंच तो ऐकतो. योग्य संवाद न होण्यामागचं हे पहिलं कारण आहे.
यातून मुक्त होण्यासाठी, अर्थात योग्य रीतीने श्रवणाची कला विकसित करण्यासाठी स्वतःच्या विचारांकडे साक्षीभावाने पाहायला सुरू करा. तुम्ही जेव्हा विचारांकडे थोडंसं अंतर ठेवून पाहू लागाल, तेव्हा वर्तमानात राहाल. त्यानंतरच तुम्ही समोरील माणसाचं म्हणणं ‘as it is’ (जसंच्या तसं) ऐकू शकाल. स्वतःचं कम्युनिकेशन सुधारण्यासाठी समोरच्याचं बोलणं वर्तमानात राहून पूर्णपणे, लक्षपूर्वक ऐका. त्यात तुमच्या विचारांची भेसळ करू नका. योग्य पद्धतीने आणि उत्तम संभाषणासाठी केवळ बोलण्याची नव्हे, तर मनापासून ऐकण्याची कलाही विकसित करायला हवी. अन्यथा बहुसंख्य लोक अर्धवट ऐकूनच सांगतात, ‘मला समजलंय सगळं’; परंतु खरंतर त्यांना काहीच समजलेलं नसतं. अशा वेळी समोरच्या माणसाला काय समजलंय, हे आपण विचारायला हवं. यालाच पूर्ण आणि योग्य संभाषण म्हटलं गेलंय.
दुसरी पायरी – संभाषण पूर्ण होण्याची दुसरी पायरी आहे, त्या संभाषणाची पुन्हा पडताळणी करणं. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला कोणी सांगितलं, ‘हे काम तुम्हाला नऊ वाजेपर्यंत पूर्ण करायचं आहे.’ अशा वेळी त्या माणसाला पुन्हा प्रश्न विचारून निश्चित करायला हवं, की ‘खरंच तुम्हाला 9 वाजता काम पूर्ण करून हवंय का?’ या प्रश्नासह त्या कामासंबंधी इतर सविस्तर माहितीदेखील विचारायला हवी. जसं, काम सकाळी 9 वाजता हवंय की रात्री? काम पूर्ण झाल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी त्याला कशी द्यायची आहे? केलेलं काम मेलद्वारे पाठवायचं, की पेनड्राइव्ह सारख्या इतर माध्यमांद्वारे? त्याची हार्ड कॉपी अर्थात प्रिंट हवी असेल, तर ती कुठे आणि कशी द्यायची? त्या फाइलला नाव काय द्यायचं, कोणती तारीख टाकायची? ती कॉपी घेण्यासाठी कोण आणि किती वाजता येणार आहे? अशा प्रश्नांद्वारे तुम्हाला त्या कामाची रूपरेषा स्पष्ट होईल. त्यामुळे तुम्ही योग्य पद्धतीने आणि वेळेत काम पूर्ण करू शकाल.
तुम्ही असे किती तरी लोक पाहिले असतील, ज्यांना संभाषण करताना ऐकण्यापेक्षा बोलण्यातच जास्त रुची असते. याला म्हणतात ‘एकतर्फी संभाषण’ ‘one way communication.’ असं संभाषण करणारांना आत्मकेंद्रित म्हटलं जातं, जे काही कालावधीनंतर टीकेचे, निंदेचे शिकार बनतात. यासाठी अशा सवयीतून मुक्त होण्याचं काम सत्वर सुरू करायला हवं.
उत्तम संभाषणाची कला अवगत करण्यासाठी स्वतःला खालील प्रश्न विचारा :
- मला इतरांचं ऐकण्यात जास्त रस असतो, की स्वतःच्या गोष्टी सांगण्यात?
- मी इतरांचं म्हणणं ऐकताना ‘अॅवज इट इज’ (जसं आहे तसं) ऐकू शकतो, की तोच भाग ऐकतो, जो ऐकायला मला आवडतं?
- ‘उत्तम कम्युनिकेशन’ ही एक कला आहे. ज्याप्रमाणे पोहायला शिकण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागतात, त्याचप्रमाणे कम्युनिकेशनचं स्किल विकसित करण्यासाठीही तुम्ही निरंतर सराव करायला हवा. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही पुढीलप्रमाणे मनन करू शकता :
- आज दिवसभर माझं कोणकोणत्या लोकांशी संभाषण झालं?
- त्यांच्याशी बोलताना माझ्याकडून कोणकोणत्या चुका झाल्या?
- मी कोणते चुकीचे शब्द वापरले?
- असे कोणते शब्द होते, ज्यांच्याऐवजी मी अन्य सकारात्मक शब्दांचा उपयोग करू शकलो असतो?
- संवाद साधताना माझी देहबोली कशी होती?
अशा प्रकारे निरंतर मनन करत राहिल्याने कम्युनिकेशन स्किल विकसित होईल. कधी काय बोलावं, काय बोलू नये, कुठे बोलावं आणि कुठे मौन धारण करावं, या बाबींचा सतत अभ्यास करत राहा. ही कला जर तुम्ही अवगत केली, तर स्वतःशी, ईश्वराशी संवाद साधणंदेखील तुमच्यासाठी सहजसाध्य होईल.
हॅपी थॉट्स!
~ सरश्री
Add comment