This post is also available in: English Hindi Polish
एप्रिल फूल बनाया, तो उनको गुस्सा आया।
अब मेरा क्या कसूर, ज़माने का कसूर।
जिसने दस्तूर बनाया।
दरवर्षी एक एप्रिलला रेडिओवर मोहम्मद रफींच्या आवाजातलं हे धमाल गाणं तुम्ही ऐकत असाल, हो ना? कारण दरवर्षी जगभरात एक एप्रिल हा मूर्खता दिवस म्हणून साजरा केला जातो. मग काय, एक एप्रिल उजाडला की एकमेकांना मूर्ख बनवायची जणू काही चढाओढच लागते.
अगं हे काय? आज एकाच कानात रिंग घातलीस? असं एखाद्या मुलीला विचारताच ती लगेच हातानं दोन्ही कान चाचपून बघते. आसपासचे हसायला लागतात.
बाप रे, तुझ्या तोंडाला कसला काळा रंग लागलाय हा? आणि असाच आलास ऑफिसला? असं एखाद्याला म्हंटलं, की तो घाबरून तोंड पुसायला लागतो आणि आसपास एप्रिल फूल असा गजर होतो.
अशा साध्या गमतीदार फसवणूकीपासून ते पार्टी नसतानाही लोकांना एखाद्या ठिकाणी पार्टी आहे असं सांगून बोलावणं, कार्यक्रम नसतानाही एखाद्या कार्यक्रमाला बोलावणं आणि फसवणं असे मोठे उद्योगही केले जातात. समोरचा सहज फसला की फसवणाऱ्याला आनंद होतो आणि फसलेली व्यक्ती दुसऱ्या कुणाला तरी फसवायला निघून जाते. तुम्हीही कधी तरी असे फूल बनला असालच ना? असं फूल होऊ नये म्हणून एक एप्रिल उजाडला की आपण सावध होतो. दिवसभर सावध राहातो. पण हीच सावधानता आपण कायम ठेवू शकलो तर?
खरंतर या जगात आपण सगळेच पदोपदी फूल बनत असतो, फसवले जात असतो आणि आपल्याला फसवणारी असते, महा ठगीनी माया! ही माया आपल्यापुढे सत्याचा आभास निर्माण करते आणि आपल्याला सत्यापासून दूर घेऊन जाते. शिवाय आपणदेखील सत्य समजून आभासाच्याच मागे धावत राहातो. मजा समजून सजा भोगत राहातो. संपूर्ण मानवजातीसाठीच हा एक खूप मोठा विनोद आहे. आणि तो समजून घ्यायचा असेल, स्वत:ला मूर्ख बनण्यापासून वाचवायचं असेल तर त्यासाठी एक एप्रिलहून चांगला दिवस तो कोणता? चला तर मग जाणून घेऊया आपल्यावर मायाजाल टाकणारी ही मायेची असत्य माया!
हे जग म्हणजे अन्य काही नसून कार्यान्वित, जागृत झालेला सेल्फ (शक्ती) आहे. या जागृत सेल्फच्या मागे आहे सुप्त सेल्फ (शिव). शरीर आणि मनाचा आविष्कार हा केवळ त्या सेल्फचा, जाणीवेचा अनुभव घेण्यासाठीच आहे. पण या आविष्काराचं सौंदर्य हे आहे, की मनाला त्याची स्वत:ची जाणीवसुद्धा आहे. खरंतर या मनाचा मूळ उद्देश असतो तो अंतर्गत सेल्फवर केंद्रित राहाण्याचा. पण त्याची स्वत:ची जाणीव जास्त प्रभावी झाली, की ते त्याचा मूळ उद्देशच विसरून जातं, बाह्य गोष्टींवर केंद्रित होतं आणि त्यातच गुंतून राहातं. माणसाचं मनच त्याला फसवत असतं. हाच सर्वात मोठा वैश्विक विनोद आहे. अशाप्रकारे त्या मनाला वाटत असतं, की आपण सत्य आहोत, हे दृश्य जग सत्य आहे. म्हणून ते सर्व बाह्य अनुभव घेण्याचा, त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न सतत करत राहातं. या मनाला शांत ठेवून, मायेपासून दूर ठेवून, मूळ सेल्फला त्याचा अनुभव घेण्यासाठी सिद्ध करणं हेच खरं अध्यात्म आहे.
मन जेव्हा त्याचा मूळ उद्देश विसरतं तेव्हाच हा विनोद निर्माण होतो. मन हे आरशासारखं असतं. समजा, एखाद्या आरशात एखाद्या कुणा व्यक्तीचं प्रतिबिंब पडलं आणि तो आरसा स्वत:लाच ती व्यक्ती समजू लागला तर? आरसा एप्रिल फूल ठरेल नाही का? हाच मूर्खपणा आपलं मन ही करत असतं, पदोपदी “फूल’ बनत असतं. कारण ते स्वत:चं वेगळं अस्तित्व मानून सेल्फपासून दूर जातं. मन हा केवळ भास आहे, आभास आहे. सेल्फचा आरसा आहे. सेल्फच्या अभिव्यक्तीसाठी, त्याला स्वत:चा अनुभव घेता यावा यासाठी मनाची निर्मिती केली गेली आहे. पण हा भासच स्वत:ला सत्य समजू लागतो, मन स्वत:चं वेगळं अस्तित्व मानू लागतं तेव्हा सगळी गडबड होते. हाच मानवजातीचा वैश्विक विनोद आहे.
एकदा एका व्यापाऱ्यानं त्याची सगळी संपत्ती हिऱ्यांमध्ये रूपांतरीत करून घेतली आणि त्या संपत्तीचं मूल्यांकन करण्यासाठी एका जवाहिऱ्याला बोलावलं. जवाहिऱ्यानं सारे हिरे तपासले तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की ते सगळे हीरे खोटे होते. ते ऐकताच व्यापारी व्यथित झाला. स्वत:चं कपाळ बडवून घेऊ लागला. त्याचा तो शोक पाहून जवाहिऱ्यानं त्याला एक सल्ला दिला. तो म्हणाला, हे बघा शेठजी, हे हीरे खोटे आहेत, हे तुम्हाला आणि मला माहित आहे. इतर कोणालाही नाही. तेव्हा तुम्ही हे हिरे त्यांच्या तृतियांश किमतीला विकून टाका. जगभरातले लोक येतील बघा खरेदीला. जवाहिऱ्याची ती कल्पना ऐकून व्यापाऱ्याला जरा धीर आला. सगळं नुकसान होण्यापेक्षा निदान काही संपत्ती तरी हाताला लागेल अशी आशा त्याला वाटू लागली. त्यानं लगेचच त्या खोट्या हिऱ्यांची विक्री घोषित केली. हिरे असे सवलीतत मिळत आहेत हे कळल्यावर खूप गर्दी जमली. कुणी एखादा हिरा खरेदी केला की व्यापारी खूश व्हायचा. खुशीत हवेत हात उडवायचा आणि म्हणायचा, बघा, आणखी एकाला मूर्ख बनवलं. असे कमी किमतीत हिरे विकूनही मी माझं नशीब घडवू शकतो. पण खरी गोष्ट अशी होती की दुसऱ्यांना मूर्ख समजणारा व्यापारी स्वत:च मूर्ख बनला होता. कारण ते हीरे खोटे नव्हतेच. जवाहिऱ्यानं त्याला खोटं सांगितलं होतं. आणि कमी किमतीत हिरे खरेदी करणारी सगळी माणसं त्या जवाहिऱ्याचीच माणसं होती.
तेव्हा या एक एप्रिलला दुसऱ्यांना फूल करण्याऐवजी हे आठवून पाहा, की मायेच्या बाजारात आपण कधी कधी आणि कसे फूल झालो आहोत. वैश्विक विनोदाचं निमित्त कसे ठरलो आहोत. पुढे दिलेल्या तीन गोष्टी समजून घेऊन एक एप्रिलला मूर्खांचा जागतिक दिन म्हणून साजरा करण्याऐवजी वर्षातला सर्वात आध्यात्मिक दिवस म्हणून साजरा करा-
- विचार साजरा करा- या खास दिवशी सत्य आणि सत्याचा आभास यातला फरक समजून घ्या. मायेनं तुम्हाला कसं मूर्ख बनवलं आहे याचा विचार करा.
- ध्यान साजरं करा- या खास दिवशी ध्यान साधना करा. विचार नियंत्रित करा आणि अ-मन/निर्मन अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करा. मन शांत होतं, मनाची बडबड थांबते तेव्हाच सेल्फच्या प्रकाशानं ते उज्वल होतं. शरीर-मन हे सेल्फच्या अनुभवाचं माध्यम बनून मनाचा मूळ उद्देश साध्य होतो. ज्या मनात सेल्फचा प्रकाश भरून राहिलेला असतो ते मन कधीच फूल होऊ शकत नाही.
- शोध साजरा करा- या विशेष दिवशी आपल्यातल्या मूर्खपणाचा शोध घ्या. तुमच्यात असे कोणते अवगुण आहेत जे तुमच्याकडून मूर्खपणा घडवतात? कोणत्या चुकीच्या धारणा तुमच्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा बनत आहेत?
तुमच्या मनात आलं असेल की यात साजरं करण्यासारखं काय आहे? पण असा विचार करा, “का साजरं नाही करायचं?’ एक एप्रिलला दुसऱ्यांना मूर्ख बनवण्यासाठी आपण अनेक कल्पना लढवत असतो. म्हणजे खरं तर हा एक सर्जक दिवस आहे. मग स्वत:चा शोधोत्सव साजरा करण्यासाठी याहून उत्तम दिवस तो कोणता असणार? या मायेच्या बाजारात आपण मूर्ख बनले जाऊ नये म्हणून स्वत:चा शोध घेणं, स्वत:मधील कमतरता दूर करणं आणि स्वत:ला सक्षम करणं हे एखादा उत्सव साजरा करण्यासारखंच नव्हे का? तेव्हा हा दिवस स्व-शोधासाठी साजरा करा आणि सदा सफल आनंदी राहा.
हिंदीत एप्रिलचा उच्चार अप्रेल असा केला जातो. अप्रेल- अप+रेल. या शब्दात वर जाणारा, उर्ध्वमार्ग प्रतीत होतो. जे विकासाचं, प्रगतीचं प्रतीक आहे. मायेच्या मायेत गुरफटुन अधोगतीला जाण्याऐवजी मनन करा, ध्यान साधना करा, स्वत:चा शोध घ्या आणि स्व-विकास साध्य करा. असं केलं तर या एक एप्रिलला तुम्ही त्या निर्मात्याचाच एक अंश होऊन त्याच्यासह निर्मितीचा आनंद घेऊ शकाल.
Add comment