This post is also available in: English Hindi Polish
खोजी- आत्मसाक्षात्कार हेच मनुष्यजन्माचं अंतिम ध्येय आहे, की त्या पलीकडेही आणखी काही आहे?
सरश्री- या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी हे जाणून घेणं महत्वाचं आहे, की तुम्हाला आत्मसाक्षात्काराचा अर्थ किती कळला आहे. ध्यान साधना करत असताना एखाद्या दिवशी साधकाला सखोल ध्यान अवस्थेचा अनुभव प्राप्त होतो. त्या काळात तो अ-मन, निर्विचार अवस्थेत असतो. तो आत्मसाक्षात्काराचा अनुभव असतो. एखादी व्यक्ती निसर्गाच्या सान्निध्यात असताना, विश्वाशी एकरूपता अनुभवते. त्या वेळी ती निसर्गाशी इतकी एकरूप झालेली असते, की तिला तिचं स्वतंत्र अस्तित्वच जाणवत नाही. तो देखिल आत्मसाक्षात्काराचा अनुभव असतो. आत्मसाक्षात्कार हा केवळ एक आरंभ असतो. अंतिम ध्येय असतं ते त्या अनुभवात स्थिर होणं, स्थापित होणं. यामध्ये सर्वांत मोठा अडथळा असतो तो तुलनात्मक मनाचा. हे मन माणसाला त्या अनुभवात स्थिरावूच देत नाही. ते सतत तुलना करून माणसाला सत्यापासून दूर नेत असतं. त्यामुळे जेव्हा सतत तुलना करणारे हे मन अदृश्य होतं तेव्हाच आत्मसाक्षात्काराचा अनुभव येऊ शकतो. पण त्या अनुभवानंतर काय होतं? पुन्हा तुलनात्मक मन जागृत होतं आणि आत्मसाक्षात्काराचं श्रेय स्वत:कडे घेतं. ते म्हणतं, “मी ध्यान साधना करून सखोल ध्यान अवस्थेचा अनुभव घेतला, आत्मसाक्षात्कार अनुभवला.’ पण या मनाला हे कळत नाही, की आत्मसाक्षात्काराचा अनुभव त्यानं घेतलेलाच नाही. उलट त्याच्या अनुपस्थितीतच आत्मसाक्षात्कार अनुभवला गेला आहे. शिवाय जेव्हा आत्मसाक्षात्कारानंतरही तुलनात्मक मन उपस्थित होत नाही तेव्हाच आत्मस्थैर्य अनुभवता येतं. आत्मस्थैर्य म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या अनुभवात स्थिर होणं. स्वत:च्या मूळ रूपात, सेल्फवर स्थिर होणं किंवा सातत्यानं सत्याबरोबर असणं. म्हणूनच असं म्हणतात, की योग्य जाणीवेशिवाय घेतलेला आत्मसाक्षात्काराचा अनुभव हा निरूपयोगी ठरतो. आत्मसाक्षात्कारापासून आत्मस्थैर्यापर्यंतच्या प्रवासात सद्गुरूंची भूमिका फार महत्त्वाची असते. कारण गुरूच आपल्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जातात आणि त्यापुढे आत्मस्थैर्याचं अंतिम ध्येय गाठण्याचा विश्वास देतात. आत्मस्थैर्य हा मानवी जीवनाचा मूळ उद्देश असतो. आणि ध्यानसाधनेनं तुलनात्मक मन नष्ट करणं ही त्याची पूर्वतयारी असते. थोडक्यात सांगायचं तर आत्मसाक्षात्कार हा आरंभ बिंदू असतो तर आत्मस्थैर्य हे अंतिम ध्येय असतं.
खोजी- आत्मस्थैर्यानंतर काय होतं? आत्मसाक्षात्कार आणि आत्मस्थैर्य यात थोडा संभ्रम होतो आहे.
सरश्री-आत्मस्थैर्य आलं की सेल्फची, ईश्वराची अभिव्यक्ती सुरू होते. मनोशरीर यंत्राच्या माध्यमातून ईश्वर अभिव्यक्त होऊ लागतो. त्याच्या पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होतो. हे समजून घेण्यासाठी आपण गौतम बुद्धांचं उदाहरण बघूया. वयाच्या पस्तीसाव्या वर्षी बुद्धांनी आत्मस्थैर्य प्राप्त केलं आणि ते त्यांच्या मानवी जीवनाच्या अंतापर्यंत सत्य संदेशाचा प्रचार करत राहिले. आत्मस्थैर्यानंतर त्यांनी त्यांच्या मनोशरीरयंत्राच्या माध्यमातून सत्य प्रचाराचं कार्य केलं.आत्मस्थैर्य आणि त्यानंतर होणारी ईश्वरीय अभिव्यक्ती हे मानवी जीवनाचं अंतिम ध्येय असतं.
जर आत्मस्थैर्य हा शब्द तुम्हाला संभ्रमात टाकत असेल तर तुम्ही याला आत्मस्थैर्याला अंतिम उद्देश मानू शकता आणि तिथपर्यंतच्या मार्गावर येणाऱ्या अनुभवांना आत्मसाक्षात्कार असं म्हणू शकता. पण आत्मसाक्षात्कार समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. जर आत्मसाक्षात्कारालाच आत्मस्थैर्य मानलं तर मग आत्मस्थैर्य हे अंतिम ध्येय ठरतं. जर हा केवळ एखाद्या वेळीच येणारा हा अनुभव असेल तर तो अंतिम ध्येयाकडे नेणारा आरंभ बिंदू ठरतो.
खोजी- आत्मसाक्षात्कारानंतर आपल्या जीवनात काय बदल होतात?
सरश्री- आत्मसाक्षात्कारानंतर आपल्याला जो फरक जाणवतो तो केवळ आपल्या जीवनातलाच बदल नसतो तर ते असतं संपूर्ण परीवर्तन. समजा, एखाद्या माणसाला अंगणातून टेरेसवर जायचं असेल तर त्यासाठी तो जिन्याचा वापर करतो. जेव्हा तो एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर चढतो तेव्हा त्याच्यासाठी तो एक बदल असतो. जेव्हा तो आणखी काही पायऱ्या चढतो तेव्हा तो टेरेस जवळ पोहोचलेला असतो. जिन्यावरून जात असताना तो असे बदल अनुभवत असतो. पण जेव्हा तो टेरेसवर पोहोचतो तेव्हा त्याने संपूर्ण परीवर्तनाची अनुभूति घेतलेली असते. माणसाच्या जीवनातही जेव्हा बदल होत असतात तेव्हा कधी कधी त्या बदलांकडे त्याचं दुर्लक्ष होऊ शकतं. कारण तेव्हाही माणूस मनाच्या पातळीवरच असतो. पण संपूर्ण परीवर्तनाच्या अवस्थेत मात्र असं होत नाही. कारण तो पर्यंत त्याच्या घडत गेलेल्या मनाची संपूर्ण रचनाच बदलून गेलेली असते आणि तो थेट टेरेसवर, चेतनेच्या उच्च पातळीवर पोहोचलेला असतो, सेल्फच्या सान्निध्यात असतो.
हे आणखी स्पष्टपणे समजून घेऊया. समजा तुम्ही एखाद्या खोलीत बसलेले आहात. पण नेमके एका खांबाच्या मागे बसलेले असल्याने समोर काय चाललंय ते तुम्हाला दिसू शकत नाही. अशा वेळी काय करायला हवं? तर तुम्ही तुमचा दृष्टीकोन बदलायला हवा. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथून उठून त्याच खोलीत पण जिथून समोरचं दृश्य स्पष्टपणे दिसू शकेल अशा जागी बसायला हवं. समजा तुम्ही खोलीतून बाहेर येऊन समोरचं दृश्य नीट दिसावं म्हणून हेलीकॉप्टरमधून फेरी मारलीत तर ते संपूर्ण परीवर्तन असेल. आत्मसाक्षात्कार हा केवळ बदल नाही तर तुम्हाला “अर्थ व्ह्यू’ ऐवजी “स्काय व्ह्यू’ देणारं असं संपूर्ण परीवर्तन असतं.
2 comments
Vidya Apte
Dhanyawaad Sirshree
माधवराव वाबळे
धन्यवाद सरश्री जी. आत्मसाक्षात्कार बद्दल पायाभूत माहिती मिळाली.