मूर्ति पूजा करावी की करू नये
खरी ईश्वरोपासना कशी करावी?
चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे – मूर्तिपूजेचं रहस्य
काही प्रश्न असे आहेत, जे आजवर प्रश्नच बनून राहिले आहेत. कित्येक लोकांनी यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय; परंतु पुनःपुन्हा त्यातून प्रश्नांचीच निर्मिती होते. यांपैकी मुख्य प्रश्न म्हणजे, ईश्वराचं अस्तित्व खरोखर आहे, की नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना सरश्री म्हणतात, ‘ईश्वरच आहे, तुम्ही आहात की नाही, हे आधी निश्चित करा, शोध घ्या.’
दुसरा प्रश्न म्हणजे, कर्म श्रेष्ठ की भाग्य? तिसरा प्रश्न आहे, मृत्यूनंतर जीवन असतं की नसतं? आणि चौथा प्रश्न आहे, मूर्तिपूजा करावी की करू नये? ईश्वर निर्गुण निराकार आहे की सगुण साकार?
प्रस्तुत पुस्तकात या चौथ्या प्रश्नाच्या उत्तरावरच अधिक भर देण्यात आलाय. वाचकांना नम्र विनंती आहे, की हे पुस्तक वाचत असताना मध्येच कोणत्याही निर्णयावर येऊ नका, कोणतंही ठाम मत बनवू नका. हे पुस्तक म्हणजे, सत्याची जिज्ञासा असणार्या साधकांकरिता एक अल्पसा प्रयत्न आहे. साधक म्हणजे अशा व्यक्ती ज्यांची सत्य जाणून घेण्याची धडपड सुरू आहे आणि ज्यांना सत्याने हेरलेलं आहे. सत्य (ईश्वर) जेव्हा आपल्याला शोधून आपली निवड करतं, तेव्हाच आपल्यामध्ये सत्यप्राप्तीची तृष्णा जागृत होते.
आपणदेखील एक साधकच असाल आणि आपल्या मनात या वेळी तरी हे पुस्तक वाचावं की वाचू नये असा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नसेल, हीच आशा आहे.
आम्हाला पूर्ण खात्री आहे, की या पुस्तकातून मिळालेली समज आत्मसात केल्याने आपल्या मनातील मूर्तिपूजेविषयी सर्व संभ्रम मिटून आपण साकार-निराकार, आस्तिक-नास्तिक या सार्या बिरुदांपलीकडे जाल, ईश्वराचं शुद्ध सत्यस्वरूप जाणाल.
Reviews
There are no reviews yet.