This post is also available in: Hindi
एका राज्याचा राजा बऱ्याच दिवसांपासून दुःखी होता. कित्येक इलाज करूनही त्याचं दुःख काही कमी झालं नाही. यावर उपाय म्हणून राज्यातील एका सज्जन गृहस्थाने राजाला ‘खुश माणसाचा सदरा’ परिधान करण्याचा सल्ला दिला. राजाचे शिपाई संपूर्णतः खुश असणाऱ्या माणसाच्या शोधात त्वरित रवाना झाले. त्यांनी खूप शोधाशोध केली. परंतु पूर्णतः खुश असणारा माणूस त्यांना आढळलाच नाही. प्रत्येकाला काही ना काही दुःख होतंच. ‘आता काय करावं?’ या विचारात शिपायी राज्याची सीमा ओलांडून बरेच दूर गेले. अचानक मुरलीचा मधुर आवाज शिपायांच्या कानी पडला. शिपायी त्या आवाजाच्या दिशेने गेले. तिथे त्यांना एक गवळी झाडाखाली अंगाभोवती चादर लपेटून, डोळे मिटून मुरली वाजवत बसलेला दिसला. त्याच्या आजूबाजूला गायी चरत होत्या. तेथील वातावरण त्या मुरलीच्या सुरांनी भारावून गेलं होतं.
हे दृश्य पाहून शिपायांना वाटलं, की न जाणो हा गवळीच तो खुश माणूस असावा. मग शिपायांनी त्या गवळ्याची विचारपूस केली. त्यातून शिपायांना समजलं, हा गवळी चिंता, व्याकूळता आणि दुःख यांपासून पूर्णपणे मुक्त आहे. आता कुठे शिपायांच्या जिवात जीव आला. शिपायांनी त्या गवळ्याला इथे येण्याचं प्रयोजन सविस्तर सांगितलं आणि त्याच्याकडे सदऱ्याची मागणी केली. शिवाय त्या सदऱ्याच्या बदल्यात त्याला बक्षीस म्हणून सुवर्णमुद्रा देण्याचं आश्वासनदेखील त्यांनी दिलं. त्यावर तो गवळी म्हणाला, ‘बक्षीसाच्या इच्च्छेने नव्हे, तर राजाची समस्या दूर करण्यासाठी मी नक्कीच तुमची मागणी पूर्ण केली असती. परंतु माझ्याकडे तर कुठल्याही प्रकारचा सदरा नाही. मी तर माझ्या गुरुजींमुळे खुश आहे.’ त्यानंतर राजाच्या दुःखावर औषध मिळवण्यासाठी त्याने शिपायांना त्याच्या गुरुजींकडे जाण्याचा सल्ला दिला.
शिपायांनी राजाला सविस्तर वृत्तान्त सांगितला. तो ऐकून राजा सत्वर गवळ्याच्या गुरुजींकडे गेला. गुरुजींनी राजाला दुःखाच्या सर्व पैलूंचं दर्शन घडवलं. त्याचबरोबर दुःखाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहण्याची कलादेखील राजाला शिकवली. परिणामी राजा पूर्णतः दुःखमुक्त झाला. चला तर आपणदेखील या लेखाच्या माध्यमातून त्या बाबी जाणून घेऊ आणि राजाप्रमाणेच आपल्याही जीवनात ओतप्रोत आनंदाची प्रचिती घेऊ या.
* दुःखाचं कारण जाणा : कोणतंही दुःख येतं, तेव्हा सर्वप्रथम त्याचं कारण जाणणं अतिशय गरजेचं असतं. जसं, ‘क्रिकेट मॅचमध्ये आपल्या देशाला पराभव पत्करावा लागला.’ आता यामुळे जर कोणी दुःखी झाला असेल, तर त्याने बारकाईने पाहायला हवं, की ‘खरंच माझ्या देशाच्या पराभवामुळे मी दुःखी झालो का? वा ‘आपणच जिंकू’ हे माझं अनुमान चुकलं त्यामुळे तर मी दुःखी नाही ना?’ अशा प्रकारे आपली प्रतिमा डागाळल्याने ‘मी, माझं, माझी’ याविषयी असणारी आसक्ती, अनुमान किंवा इच्छा भंग पावल्यामुळे दुःख येतं.
कित्येकदा तर लोकांना इतरांना मिळालेल्या आनंदाने दुःख होतं. म्हणजेच तो दुःखाचं दुःख करतो. यासाठीच दुःख येताच आपण जर त्यामागील कारण शोधलं, तर पुढील वाटचाल करण्याचा मार्ग सहजपणे गवसेल, जीवन सुकर होईल.
एखाद्याला दुःख झालं, तर तो ‘मी दुःखी का’ या विचाराने अधिक दुःखी होतो. याचाच अर्थ, तो दुःखाचं दुःख करतो. परंतु हा भ्रम दूर करून आणि धारणारूपी चश्मा उतरवून त्याने याकडे पाहिलं, तर दुःखाचं कारण जाणून तो पुढील वाटचाल करेल.
* दुःखाप्रति संवेदनशीलता वाढवा : दुःखाचं कारण जाणण्यासाठी आपल्याला दुःखाप्रति संवेदनशीलता वाढवावी लागेल. याचाच अर्थ, दुःखाला पूर्णपणे पाहावं लागेल, जाणावं लागेल. असं केलं नाही, तर दुःखात गुरफटून त्यातच अडकून राहण्याची शक्यता वाढेल. संवेदनशील बनून जर तुम्ही दुःखाकडे पाहाल तर दुःखाचं कारणही जाणू शकाल. त्याचबरोबर दुःखाचे इतर पैलू जाणण्यासाठीही सिद्ध व्हाल.
* आत्मनिरीक्षणाची आवश्यकता : दुःखाप्रति संवेदनशीलता वाढवण्यासाठी आपल्याला आत्मनिरीक्षण करावं लागेल. ‘माझ्याकडून असा कोणता शब्द वा प्रतिसाद दिला गेला आहे, असं कोणतं कर्म घडलंय किंवा माझी अशी कोणती सवय आहे, ज्यामुळे मी हे दुःख भोगत आहे?’ हा प्रश्नस्वतःला विचारायला हवा. या प्रश्नावर मनन करून जेव्हा तुम्ही निरीक्षण कराल, तेव्हा कोणत्या कारणामुळे तुम्हाला दुःख मिळालं, याचं वास्तव तुमच्यासमोर येईल. यानंतर तुम्ही स्वतःला (आपल्या इंद्रियांना) अनुशासित करू शकाल. साहजिकच त्यानंतर पुनःपुन्हा भोगावी लागणारी दुःखाची यातना नष्ट होईल आणि तुमचं जीवन आनंदाने बहरत जाईल.
स्वतःला अनुशासनबद्ध करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या बाबींची काळजी घ्यावी लागेल-
- दुःखाला सामोरं जा : सामान्यपणे लोकांची दुःखापासून पलायन करण्याची वृत्ती असते. कारण दुःखाशी दोन हात करण्याची पद्धत, दुःखासमोर अढळ राहण्याची युक्तीच त्यांना माहीतच नसते. दुःखाशी लढा द्यायला शिकल्यानंतर शारीरिक वा मानसिक आरोग्य, नातेसंबंध अथवा जीवनात काहीही उलथापालथ झाली, तरीदेखील लगेच तुम्ही ती समजू शकाल.
- आपली सवय शोधा : दुःखापासून पलायन करण्यासाठी मनुष्य स्वतःला एखादी सवय तरी लावतो किंवा तो एखाद्या व्यसनाच्या आहारी तरी जातो. जसं, एखादा सारखं काही ना काही खात राहतो, तर कुणी शॉपिंगला जातो. काही लोक टीव्ही अथवा इंटरनेटवर सिनेमा पाहत राहतात. दुःखी झाल्यानंतर त्यापासून पलायन करण्यासाठी तुम्ही कोणता मार्ग निवडता हे आता लक्षात यायला हवं.
- योग्य निवड करावी : दुःख आल्यानंतर तुमच्यात शारीरिक आणि मानसिकरीत्या कोणकोणते बदल होतात, हे पाहण्याने तुमची सहनशक्ती वाढेल त्यानंतर तुम्ही दुःख धैर्यानं सहन करायला शिकाल. दुःख सहन केल्यानंतरच योग्य निवड (योग्य कर्म) करणं शक्य होतं.
* दुःखाश्रूंची समज : योग्य निवड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दुःखद अश्रूंना समजून घ्यावं लागेल. सामान्यपणे मनुष्य दुःखात असताना आनंदाचीच याचना करतो. अशा वेळी माझी आनंदाचीच इच्छा पूर्ण होत आहे, ही समज ठेवायला हवी. या समजेला बळ दिलंत तर काही चांगलं समोर येतंय हे तुम्हाला दिसू लागेल. कारण प्रत्येक समस्येवरील, दुःखावरील इलाज तुमच्या आजूबाजूलाच असतो. परंतु डोळ्यांत अश्रू आल्याने म्हणजेच नकारात्मकतेनेे समस्येवरील उपाय दिसणंच बंद होतं. यासाठीच ‘मला दुःखाश्रू पुसून त्याकडे खुशीने पाहायचं आहे’ याची स्वतःला आठवण करून द्यायची आहे. दुःखातही सकारात्मकतेची कास धरली, तर तुमच्या डोळ्यांत आनंदच झळकू लागेल. त्याचबरोबर त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्गही गवसेल.
* दुःखात उपहार दडलेला असतो : ‘जीवनात दुःख येणं ही सामान्य बाब आहे’ एकदा का हे पक्कं झालं, की दुःखाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलून जाईल. दुःखावर चौफेर नजर फिरवल्यानंतर, दुःखाचे सर्व पैलू पाहिल्यानंतर तुम्हाला त्यात दडलेले उपहार दिसू लागतील. जसं, दुःख ही विकासाची शिडी आहे, शिकवण आहे, जोकर आहे, आनंदाचं कारण आहे. दुःख आनंदाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे, तुमची क्षमता वाढवण्याची व्यवस्था आहे, आव्हान आहे. अशा प्रकारे दुःखात दडलेले उपहार पाहिले, तर तुम्ही दुःखापासून कधीही पलायन करण्याचा प्रयत्न करणार नाही.
सर्वसामान्यपणे मनुष्य दुःखाने घेरला जातो, तेव्हा त्यातून मुक्त होण्यासाठी अंतःकरणपूर्वक प्रार्थना करतो, ‘वाट्टेल ते झालं तरी, मला आता या व्याकूळतेतून (दुःखातून) बाहेर पडायचंच आहे. माझी सगळी दुःखं नष्ट करून मला नव्याने सुरुवात करायची आहे.’ अशा मनोमन केलेल्या प्रार्थनेला बळ मिळतंच. मग मनुष्य पुढील मार्गक्रमण करू लागतो. केवळ दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यानेच दुःखाची ताकद क्षीण होते आणि त्या दुःखात दडलेलं वास्तव समोर येतं. हे वास्तव म्हणजेच त्यात दडलेला उपहार. हा उपहार मिळाल्यानंतर दुःख आनंदात परिवर्तित होतं.
* आनंद पास आहे : अगदी एखादी क्षुल्लक बाब असो वा एखदा गंभीर आघात असो, तुम्हाला एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे, ‘आनंद पास आहे, दुःख नापास झालं आहे.’ अशा प्रकारे दुःखी अवस्थेत हे वाक्य मनोमन विश्वासपूर्वक उच्चारत राहिल्याने तुमच्या भावनांप्रति तुम्ही सजग व्हाल. त्यामुळे दुःखद भावनांचं ओझं हळूहळू कमी होत जाऊन तुमची मनःस्थितीही बदलत जाईल. दुःख असूनही आनंदाच्या पक्षात म्हणजेच खुशीच्या भावनेत तुम्ही राहायला शिकाल. साहजिकच दुःखमुक्तीचा मार्ग तुमच्यासाठी सुकर होईल, सुकर होईल.
या सर्व बाबी जाणल्यानंतर, त्याची प्रचिती घेतल्यानंतर राजाला आपोआपच खुश माणसाचा सदरा अर्थात, खुशीचं रहस्य गवसलं.
गुरुजींनी राजाला शिकवलेला दुःखमुक्तीचा मार्ग आता तुम्हीही जाणून घेतलाच आहे. तेव्हा दुःख येताच तुम्हीदेखील त्यातून मुक्त होण्याची कला शिका आणि तुमचं जीवन आनंदानं ओतप्रोत भरू द्या. दुःखमुक्तीच्या या वाटेवर आनंदाने मार्गक्रमण करू या.
~ सरश्रींच्या मार्गदर्शनावर आधारित
Add comment