एकदा लोकप्रिय जैन साहित्यकार टोडरमल एक ग्रंथ लिहीत होते. कालांतराने तो ‘मोक्षमार्ग’ या नावाने लोकप्रिय झाला. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते एकाग्रतेने सतत लिहीत असत. ते ग्रंथ लिखाणात इतके मग्न असायचे, की त्यांना ना सभोवतालच्या वातावरणाचं भान असायचं ना खाण्यापिण्याचं. अगदी मन:पूर्वक, समर्पण भावनेने या कार्यात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं होतं.
एके दिवशी ते आपल्या आईला म्हणाले, ‘आई, आज तू भाजीत मीठ टाकायला विसरली आहेस, असं मला वाटतंय.’ त्यावर आई हसत म्हणाली, ‘बाळा, आज तुझा ग्रंथ पूर्ण झालाय वाटतं…’
आई सांगत असलेलं शंभर टक्के खरं होतं. टोडरमल यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. न राहवून त्यांनी आईला विचारलं, ‘माझा ग्रंथ लिहून पूर्ण झालाय, हे तुला कसं कळलं? मी तर याविषयी कोणालाच काही सांगितलं नाहीये, मग तू मनकवडी आहेस की काय?’
यावर त्यांची आई हसत म्हणाली, ‘बघ बेटा, मी गेले सहा महिने भाजीत मीठच टाकत नाहीये. पण आजवर ही गोष्ट तुझ्या लक्षात आलीच नाही. कारण पूर्ण श्रद्धेने, एकाग्रचित्ताने तू केवळ लिहिण्यात मग्न होतास. पण आज तुला भाजीत मीठ कमी असल्याचं लक्षात येताच मला समजलं, की तुझं लिखाण पूर्ण झालं असावं.’
या प्रसंगावरून आपल्याला हे समजतं, की विश्वात असे कित्येक लेखक आहेत जे देहभान विसरून, रात्रंदिन ग्रंथाच्या सर्वोच्च निर्माणकार्यात योगदान देत आहेत. पण ते ज्या एकनिष्ठेने, तन्मयतेने, गांभीर्याने लेखन करतात, तितक्याच प्रांजळपणे आपण त्या ग्रंथांचं पठण करतो का?
रामायण, महाभारत, गुरू ग्रंथसाहिब, कुराण, बायबल अशा अनेक धर्मग्रंथांत मनुष्यजीवनाच्या सर्व पैलूंवर सर्वोच्च मार्गदर्शन करण्यात आलंय. आजदेखील हेे सर्व ग्रंथ मानवतेचं मूल्य दर्शवित आहेत, सर्वांसाठी दिशादर्शक ठरत आहेत. विविध माध्यमांद्वारे ईश्वर मनुष्याला मानवतेचं दिव्य दर्शन देत असतो. पण मनुष्य ते ईश्वरीय संदेश, संकेत समजू शकत नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
काही महापुरुषांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाल्यानंतर, ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी ईश्वरीय ज्ञान प्रस्तुत केलं. यात संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराच्या, विकासाच्या आणि विश्वशांतीच्या शक्यता दडलेल्या आहेत. पण असे ग्रंथ वाचणं हीदेखील एक कला आहे. ही कला आपण जेव्हा आत्मसात कराल, तेव्हाच ‘ग्रंथपौर्णिमा’ योग्यप्रकारे साजरी करू शकाल. ‘ग्रंथ हेच गुरू’ हे वाक्य आपण आधीही ऐकलंच असेल. तेव्हा योग्य प्रकारे ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करण्याची पद्धत जाणून घेऊ या. जेणेकरून ग्रंथांत दडलेला खरा अर्थ आपण रोजच्या जगण्यात अमलात आणू शकू.
आध्यात्मिक ग्रंथाचं पठण का करावं :
पुस्तकांचे अनेक प्रकार असतात, काही पुस्तकं केवळ वर-वर पाहण्यायोग्य असतात, तर काही पुस्तकं पाहताक्षणी वाचनाची इच्छा होते. पण आध्यात्मिक पुस्तकं वाचल्यानंतर मनन करावंसं वाटतं. शिवाय मनन करून त्यातील गोष्टी आचरणात आणण्यायोग्य असल्याने आपल्या जीवनाची दशाच नव्हे तर दिशाही बदलते.
परिणामी, जीवनाला निश्चित ध्येय गवसतं, आपल्या मनाचा प्रत्येक हिस्सा प्रकाशमान होऊ लागतो. चला तर मग, आध्यात्मिक ग्रंथांचे लाभ जाणून घेऊया.
पहिला लाभ : आंतरिक जागृती
एकदा एक मनुष्य कॉम्प्युटरवर प्रिंटआऊट्स काढत होता. पण प्रिंट काढल्यानंतर त्याला समजलं, की त्याने एके ठिकाणी ‘आप’ या शब्दाऐवजी चुकून ‘शाप’ हा शब्द लिहिला आहे. मग त्याने त्या प्रिंटवर पेनाने चूक दुरुस्त केली आणि पुन्हा प्रिंट काढली.
पण प्रिंट-आऊटवर तीच चूक पुन्हा पाहून तो हैराण झाला. त्याने पुन्हा त्या प्रिंटवर चूक दुरुस्त करून प्रिंट काढली. त्याचा हा खटाटोप बराच वेळ सुरू होता. तेवढ्यात कॉम्प्युटरविषयी ज्ञान असणारा त्याचा एक मित्र तेथे आला आणि म्हणाला, ‘अरे, तुला चूक दुरुस्त करायची असेल, तर बाहेर प्रिंटवर ती करून काय उपयोग? तुला तर कॉम्प्युटरवर टाईप करूनच ही चूक दुरुस्त करता येईल.’
तसं पाहिलं तर प्रत्येक मनुष्याला वाटतं, की परिवर्तन करण्याची किंवा बदलण्याची गरज मला नसून समोरच्याला आहे. पण आध्यात्मिक ग्रंथाच्या पठनाने ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट होते, ‘मलाच बदलायचं आहे, माझं चारित्र्य निर्मळ बनवायचं आहे.’ अशाप्रकारे वाचकांच्या हृदयपरिवर्तनाचं प्रचंड बळ या आध्यात्मिक ग्रंथांमध्ये सामावलेलं असतं. मनुष्याला जागृत करण्याची शक्ती ग्रंथांच्या पानांत दडलेली असते.
दुसरा लाभ : गुणांचा विकास
शरीरासाठी व्यायाम आवश्यक असतो, तसाच बुद्धीचा व्यायाम म्हणजे, वाचन. पण आध्यात्मिक ग्रंथाच्या पठनाने केवळ बुद्धीचाच व्यायाम होत नाही तर आपल्या अंतर्यामी कित्येक गुणांचा विकास होतो. जसं, संकल्पशक्ती, निर्णयक्षमता, एकाग्रता, सातत्य, वेळेचं नियोजन यांसारखे महत्त्वपूर्ण गुण आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग बनतात. कारण आध्यात्मिक ग्रंथात मनुष्यात कोणते आवश्यक गुण असायला हवेत, याचा उल्लेख असतो. जवळपास सर्वच आध्यात्मिक ग्रंथ आपल्या ‘आंतरिक अवस्थे’कडेच निर्देश करतात.
रामायण, महाभारत यांसारखे ग्रंथ वाचताना समजतं, की रामायण किंवा महाभारत तर आजही सुरूच आहे! रामायणातील प्रत्येक पात्र आपल्या आसपास
तरी आहे किंवा आपल्या अंतरंगात तरी! रामायणात ज्या राक्षसांचं वर्णन करण्यात आलंय, ते आजही आपल्याच आजूबाजूला असतात. फरक इतकाच, की त्यांचा आऊटलूक बदललाय. नात्यांमधील दुरावा, आत्मविश्वासाचा अभाव, भय, चिंता, क्रोध, बोरडम, आळस, डिप्रेशन, द्वेष, मत्सर, मनोरंजनाची वेळखाऊ साधनं… अशा विविध रूपांत हे राक्षस तुम्हाला त्रस्त करत असतात. पण हेच ग्रंथ विकाररूपी राक्षसांचा अंत करण्यासाठी आपल्याला सज्ज करतात. अंतर्यामी प्रेम, आनंद, शांतीचं रामराज्य स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन करतात. जेणेकरून आपण जीवनध्येय अगदी हसत-खेळत साध्य करण्यात यशस्वी व्हावं.
तात्पर्य, आध्यात्मिक ग्रंथ आपल्यामध्ये प्रेम, आनंद, शांती, समृद्धी, संतुष्टी, सेवाभाव, उत्साह, भक्ती आणि अभिव्यक्ती यांसारखे ईश्वरीय गुण विकसित करतात.
तिसरा लाभ : नियतीचे संकेत जाणणं
कित्येक लोकांनी संभ्रमात किंवा समस्येत गुरफटलेले असताना ग्रंथातील एखाद्या विशेष वाक्याने समस्येचं निरसन झाल्याचं अनुभवलंय. एका महान विचारवंतानं म्हटलंय, ‘पुस्तकं म्हणजे जणू विश्वाच्या खिडक्याच, ज्याद्वारे नियतीचे संकेत प्राप्त होतात.’ जीवनातल्या सर्व प्रकारच्या नैराश्यावरचा रामबाण इलाज म्हणजे आध्यात्मिक ग्रंथ! ज्ञानप्राप्तीच्या उद्देशाने असे ग्रंथ उघडले जातात आणि ग्रंथपठन पूर्ण होताना आनंदाची भावना जागृत होते.
काही पुस्तकं वाचताना आपल्याला स्वत:मधील कमतरतेची जाणीव होते. पण त्या दूर कशा कराव्यात, याचं मार्गदर्शनदेखील त्याच पुस्तकातून लाभतं. समजा, एखादा मनुष्य त्याच्या स्वास्थ्याप्रति उदासीन असेल तर ‘शारीरिक स्वास्थ्य प्राप्त करणं हेच यशाचं गमक आहे’ हा संकेतही त्याला पुस्तकाद्वारेच मिळतो. कुणाला नातेसंबंधात नवप्रकाश आणण्याचा तर कोणाला निसर्गाची कार्यपद्धत समजून घेण्याचा संकेत मिळतो. एखाद्याला पैशाविषयी योग्य समज आत्मसात करण्याचं तर कोणाला दानाचं महत्त्व समजतं. एखाद्याला त्याच्या अहंकारावर आणि रजोगुणावर नियंत्रण ठेवण्याचा संदेश मिळतो, तर कुणाला सर्व दु:खांतून मुक्त होण्याची समज मिळते.
चौथा लाभ : मनन-चिंतनाद्वारे संपूर्ण यश
‘मननचिंतनाअभावी हीरेसुद्धा कोळशासमान ठरतात; तर ग्रंथदेखील कादंबरीसारखे भासतात.’ कारण मनन-चिंतनाद्वारे मनुष्य यशाचं संपूर्ण शिखर गाठू शकतो. केवळ मनन न केल्यामुळे धार्मिक ग्रंथांचं अस्तित्व कथा-कहाण्यांपुरतं सीमित राहतं. खरंतर ग्रंथांचं पठण करताना अधून-मधून छोटासा ‘मनन ब्रेक’ घ्यायला हवा. या अवधीत ग्रंथात वाचलेल्या गोष्टींवर मनन-चिंतन व्हायला हवं.
कोणतंही आध्यात्मिक पुस्तक वाचताना आपण मनन कसं करता? त्यातील पात्रांना अवताराच्या रूपात बघता? आश्चर्य आणि रहस्यमयी-कथेच्या रूपात बघता, की एखाद्या काल्पनिक कथेच्या रूपात? आपण जर ग्रंथातील मार्गदर्शन खरोखर जीवनात आचरणात आणत असाल तरच ग्रंथाचं पठण योग्यप्रकारे झालं, असं समजा. अन्यथा इतकी सुंदर, महान रचना आपल्यासाठी केवळ एक कहाणीच बनून राहील.
पाचवा लाभ – मोक्षाचं द्वार
वाचक तीन प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे, ‘वाचा आणि विसरा’ या सूत्रानुसार वागणारे वाचक. असे लोक फक्त ‘टाईमपास’ म्हणून वाचन करतात आणि वाचलेलं लगेच विसरूनही जातात. जीवनात घडणार्या घटनेत त्यांनी वाचलेल्या गोष्टीतला बोध त्यांना मुळीच आठवत नाही. दुसर्या प्रकारचे लोक ‘वाचा आणि शेखी मिरवा’ या पद्धतीने जगतात. असे लोक इतरांसमोर बढाई मारण्यासाठीच धर्मग्रंथांचं पठण करतात. ‘मी इतके-इतके ग्रंथ वाचले आहेत… मला सर्व काही ठाऊक आहे’ अशा आविर्भावात ते जगतात.
या विचाराने ते गर्विष्ठ बनतात. अहंकाररूपी हवा स्वत:मध्ये भरून फुग्याप्रमाणे फुगतात. अशा लोकांना ज्ञानयुक्त शब्द, मंत्र, श्लोक तोंडपाठ असतात. पण त्यांचं आयुष्याचं अवलोकन करताच, त्यांनी ‘माहितीलाच’ ज्ञान समजण्याची घोडचूक केल्याचं स्पष्ट दिसतं.
तिसर्या प्रकारचे वाचक ‘वाचा आणि डुबकी घ्या’ असे असतात. जसं, रसगुल्ल्याच्या आतही रस असतो आणि बाहेरही! काही वाचक ग्रंथात इतके डुंबून जातात, की जणू ज्ञानाचा रस त्यांच्या अंतर्बाह्य पाझरू लागतो. त्यांच्या भाव, विचार, वाणी आणि क्रियेतही ज्ञान झळकू लागतं. कारण असे लोक योग्य समज ठेवून पठण करतात. परिणामी, आध्यात्मिक ग्रंथाचं पठण त्यांच्यासाठी मोक्षाचं द्वार उघडतं, त्यांना मोक्षाप्रत घेऊन जातं.
आध्यात्मिक ग्रंथ कसे वाचावेत
1) पठणाला दिशा द्या : पठणाला जर योग्य दिशा नसेल तर मनुष्यानं वाचन केलं काय आणि न केलं काय; दोन्ही सारखंच! दिशाहीन पठण केल्याने योग्य लाभ होत नाही. कित्येक लोक वर्षानुवर्षं गीता, कुराण, बायबल, दासबोध वाचतात. पण त्यांच्या आयुष्यात कुठलंच परिवर्तन आढळत नाही. कारण त्यांचं पठण उद्देश्यहीन असतं. केवळ कोणाला दाखवण्यासाठी जर तुम्ही पठण करत असाल तर त्याचा काय उपयोग? म्हणून स्वत:ला विचारा, कोणत्या ध्येयाने प्रेरित होऊन मी हे पठण करत आहे?
2) कार्ययोजना बनवून अंमल करा : पुस्तकांचे चार प्रकार असतात. काही पुस्तकं केवळ वर-वर बघण्यायोग्य असतात. यात फक्त डोळ्यांचा उपयोग होतो. तर काही पुस्तकं वाचताना आपण शब्दांचं उच्चारण करतो. याचाच अर्थ, येथे जिभेचा उपयोग केला जातो. काही पुस्तकं वाचताना डोळे आणि जिभेसोबत बुद्धीचाही वापर केला जातो. म्हणजे आपण ती वाचली आणि त्यावर विचारदेखील केला. मात्र चौथ्या प्रकारच्या पुस्तकाचं वैशिष्ट्यं असं, की आपण ती वाचतो, पाहतो, त्यावर विचार करतो आणि त्यानुसार वागण्याची कार्ययोजना बनवतो. आध्यात्मिक पुस्तकं वाचताना आपल्याला नेमकी हीच पद्धत अंगीकारायची आहे. वाचत असताना मध्ये-मध्ये थोडं थांबून, सखोलतेनं मनन करून त्या गोष्टी डायरीत लिहायच्या आहेत. आपल्याला काही नकारात्मक वृत्ती, विकारांपासून मुक्त व्हायचं असेल तर मनन करून कार्ययोजना (अॅक्शन प्लॅन) बनवा आणि त्वरित त्यावर अंमलबजावणी सुरू करा.
3) पूर्ण पुस्तक सुरुवातीपासून वाचा : काही लोक मधूनच पुस्तक वाचायला सुरुवात करतात. पण असं करून ते त्या पुस्तकाला न्याय देऊ शकत नाहीत. म्हणून आधी, ‘पुस्तकाचा लाभ कसा घ्यावा?’ हे पान वाचावं. काही लोकांना तर प्रस्तावना वाचायलादेखील कंटाळा येतो. पण मधूनच पुस्तक वाचल्याने विषयाची सखोलता लक्षात येत नाही. मग आपल्याला वाटतं, ‘कदाचित हे पुस्तक माझ्या कामाचं नसावं’ पण कोणत्या गोष्टीचा आधार घेऊन या पुस्तकाची निर्मिती झाली आहे, ही बाब आपल्या लक्षात येत नाही. त्यातील मुद्देसूदपणा ध्यानात येण्यासाठी पुस्तक प्रस्तावनेसह अखेरपर्यंत वाचणं अनिवार्य आहे.
4) तुमचं नवं पुस्तक बनवा : पुस्तक वाचताना आपल्याला महत्त्वपूर्ण वाटणारी वाक्यं अधोरेखित करा. असं करून आपण स्वत:साठी जणू एक छोटंसं नवीन पुस्तक तयार करत असता.
5) पुस्तक वारंवार वाचा : लक्षात ठेवा, जी वाक्यं आपण अधोरेखित केलेली नसतात, तीसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असू शकतात. म्हणून कुठलाही ग्रंथ एकदाच न वाचता तो वारंवार वाचल्याने आपल्या चेतनेचा स्तर वाढतो. पहिल्यांदा जेव्हा पुस्तक वाचाल तेव्हा आधी एक उत्तर आवडेल; पण दुसर्यांदा वाचाल तेव्हा दुसरं उत्तर मनाला स्पर्श करून जाईल. कारण प्रत्येक वेळी आपल्या चेतनेचा स्तर बदलत असतो. वाचता-वाचता पुढे आणखी नवीन उत्तरं गवसतील. अन्यथा लोकांना ज्या थोड्या गोष्टी समजतात, त्यांनाच ते अंतिम समजून त्यातच गुंतून राहतात. म्हणूनच नवीन गोष्टी प्रकाशित होण्यासाठी सूक्ष्मतेने वारंवार वाचणं फारच महत्त्वपूर्ण आहे.
आध्यात्मिक ग्रंथ जर या सखोलतेनं वाचले, तर आपल्या जीवनात गुरूंचं आगमन व्हावं इतपत ते साहाय्यक ठरू शकतात. यापेक्षा महान गोष्ट कोणती? ग्रंथाच्या आधारे आपण अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि बंधनातून मुक्तीकडे प्रयाण करू शकतो.
ग्रंथांचं वाचन करता-करता ज्यावेळी आपण स्वत:चंच जीवन वाचायला सुरुवात कराल तोच दिवस आपल्यासाठी धन्य, सर्वश्रेष्ठ, ग्रंथपौर्णिमेचा म्हणजेच ‘गुरुपौर्णिमे’चा असेल… याच शुभेच्छेसह… हॅपी थॉट्स!
Add comment