This post is also available in: English Hindi
‘रेडी स्टेडी गो’ यामध्ये ‘स्लीप’ हा शब्द कसा आला, हे शीर्षक वाचून तुम्ही विचारात पडला असाल. वास्तविक ‘स्लीप’ हा शब्द सुस्त लोकांद्वारे जोडला गेला आहे. कारण त्यांच्यासाठी हे वाक्य इथेच संपतं. परंतु आपण मात्र या ‘स्लीप’ला अॅक्टिव्ह, कार्यान्वित करून ‘गो’पर्यंत आणायचं आहे. कारण ही स्लीप कुंभकर्णाची सुस्ती आहे, म्हणून तिचा अंत अपयश आणि पतन यातच होतो. ही एकटीच मनुष्याच्या सर्व गुणांपेक्षा वरचढ ठरते.
आजच्या युवावर्गात हा रोग अतिशय जलद गतीने फैलावत आहे, असं त्यांच्या आई-वडिलांना वाटतं. परंतु समोर जी दिसते, ती खरोखर सुस्ती आहे का? हे इथे समजून घ्यायचं आहे. वास्तविक सुस्त होणं आणि सुस्त दिसणं, या दोन स्वतंत्र बाबी आहेत.
कधी कधी संभ्रमावस्थेमुळे किंवा एखाद्या कामाची प्रेरणा नसल्यानेदेखील लोक सुस्त बनतात, आळशी बनतात. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की ते खरंच सुस्त आहेत. जसं, एक विद्यार्थी सकाळी लवकर उठून, दिवस-रात्र अभ्यास करून परीक्षा देतो. मग ज्या दिवशी त्याची परीक्षा संपते, त्याच्या दुसर्या दिवशीच तो एकदम आळशी बनतो, सुस्तावतो. त्यानंतर सकाळी उशिरा उठणं… उशिरा स्नान करणं… उशिरा जेवण करणं… या गोष्टी सुरू होतात. अशा मुलाची आई म्हणते, ‘शाळेला सुट्टी लागताच हा अगदी आळशी बनलाय.’ मात्र, आपण याला सुस्ती नव्हे तर अप्रेरित अवस्था असं म्हणू या. मनुष्य कार्यरत राहण्यासाठी जी प्रेरणा वा ध्येय असावं लागतं, त्याअभावी असं घडतं. या विषयावर सखोल मनन केल्यानंतर जगात सुस्त लोक कमी आणि अप्रेरित लोक जास्त आहेत, हे तुमच्या लक्षात येईल.
सुस्तीचं आणखी एक मोठं कारण असतं – संभ्रम, कन्फ्युजन! जेव्हा काय करायचं, का करायचं, कसं करायचं, हेच समजत नाही, तेव्हा मनुष्य सुस्त बनतो.
आजचा युवक सुस्त कमी; पण अप्रेरित आणि संभ्रमित (कन्फ्युज्ड) जास्त आहे. ज्या कामाची स्पष्ट कल्पना असते, त्यासाठी प्रेरणाही मिळालेली असते, ते काम करण्यासाठी मनुष्याला आळस येत नाही.
असा दिखाऊ आळस आपण काही पद्धतींनी हाताळू शकतो, त्यासाठी काही पर्याय शोधून ते हँडल करू शकतो. यांतील सर्वांत पहिली पद्धत आहे, आळस असतानाही एखादं जबरदस्त प्रेरणादायी कार्य करा. उदाहरणार्थ, उन्हाळ्याच्या सुट्टीत बहुसंख्य पालक आपल्या पाल्यांना मॉर्निंग स्पोर्टस क्लास लावतात. त्याचे बरेच लाभ असतात. ज्यायोगे मुलगा सकाळी वेळेवर उठल्याने, त्याचा शारीरिक व्यायामदेखील होतो. शिवाय, तो एखाद्या खेळात प्रावीण्य मिळवतो आणि टीव्ही, मोबाइल अशा गॅजेट्सपासून दूर राहतो. अशा प्रकारे सुट्टीतही त्याची दिनचर्या व्यवस्थित चाललेली असते. एखादा युवक स्पर्धेत भाग घेतो, तेव्हा त्याची कार्यक्षमता आणि ऊर्जा वाढते. कारण त्याच्यासमोर जिंकण्याचं प्रबळ उद्दिष्ट असतं, जिंकण्याची तीव्र इच्छा असते. याचाच अर्थ, प्रेरणा (मोटिव्हेशन) आणि उद्दिष्ट आपल्याला कार्यरत ठेवतात.
सुस्ती दूर करण्याची दुसरी पद्धत आहे – हाती घेतलेल्या कार्याविषयी काही संभ्रम असेल तर तो त्वरित दूर करायला हवा. संभ्रमावस्थेत आपलं मन कोणतंही काम करायला सहजासहजी तयार होत नाही आणि मग आपला आळस वाढतच जातो. अशा वेळी सर्वप्रथम कन्फ्युजन दूर करायला हवं. यासाठी तुम्ही एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. परंतु अशा वेळी सल्ला देणाराच स्वतः संभ्रमित नसावा, ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवा.
आसपास कोणी योग्य व्यक्ती मिळाली नाही, तर किमान निसर्गाला तरी अवश्य प्रार्थना करा, की ‘माझा संशय दूर होवो, मला निःशंकतेचा आनंद लाभो.’ ही प्रार्थना म्हणजे तुमच्याद्वारे निसर्गाला दिला गेलेला जणू संकेतच आहे. तुम्ही विशिष्ट कन्फ्युजनमधून बाहेर पडू इच्छिता, असा त्याचा अर्थ होतो. परिणामी निसर्ग तुमच्यासाठी कोणता ना कोणता मार्ग शोधेलच. जसं, तुमच्याकडे एखादं पुस्तक येईल, एखादी योग्य व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा तुम्ही असा एखादा कार्यक्रम पाहाल, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होईल. निसर्गाकडे मदत पाठवण्याचे हजारो चॅनेल्स उपलब्ध आहेत. तुम्ही प्रार्थना करून तुमचं चॅनेल खोलायचं आहे, अॅक्टिव्हेट करायचं आहे.
आता आपण अशा सुस्तीविषयी जाणणार आहोत, जिच्या मुळाशी संभ्रम किंवा अप्रेरित अवस्था नव्हे, तर कमालीचा तमोगुण असतो. आपल्याला उठायचं आहे, काम करायचं आहे, हे अशा माणसाला माहीत असतं; तरीही तो काम टाळण्यासाठी आणि शरीर आरामात ठेवण्यासाठी अनेक बहाणे शोधतो, सवयी शोधतो.
अशा प्रकारच्या स्वस्त सुस्तीतून मुक्त होण्यासाठी मनुष्याने प्रथम त्याच्यात असलेल्या आळसाचं दर्शन करून त्याचा स्वीकार करायला हवा. आळसामुळे होणारं नुकसान समजून घ्यायला हवं. जेव्हा आळसातून मुक्त होण्याची इच्छा निर्माण होते, तेव्हाच मार्ग सापडतो. अन्यथा, अज्ञानी तर त्याच अवस्थेत जीवन जगून एके दिवशी मरून जातो.
आळसातून मुक्त होण्याचा एक सिद्धांत आहे, ‘आळशी मनुष्य काम करत नाही, कारण कर्म न केल्याने त्याला सुख मिळतं आणि कर्म केल्याने त्याला दुःख मिळतं. ज्या कामातून त्याला सुख मिळतं, ते काम तो आवडीने करतो आणि ज्याने दुःख मिळतं, ते टाळत राहतो.’ आळसातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा सिद्धांत उलट करावा लागेल. म्हणजेच त्याला कर्म केल्याने सुख, तर कर्म न केल्याने दुःख मिळेल.
आता आपल्याला कोणत्या कामातून सुख मिळतंय आणि जे सुख मिळतंय, ते खरंच सुख आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. कारण मनुष्याच्या मनात जेव्हा प्रश्न निर्माण होतात, तेव्हाच त्याची उत्तरं मिळतात.
यापुढे तुम्ही जेव्हा एखादं करण्यायोग्य कर्म टाळाल, तेव्हा स्वतःला प्रश्न विचारा, त्यावेळी मला कोणतं सुख लाभलं? त्याचबरोबर ते कर्म न केल्याने कोणकोणतं दुःख लाभलं? अशा प्रकारे मनन केल्यानंतर तुम्हाला समजेल, ज्याला तुम्ही सुख समजत होता, ते क्षणिक सुख होत, क्षणभंगुर होतं; पण त्याच्या बदल्यात तुम्हाला किती दुःख भोगावं लागलं? अशा प्रकारे आपल्या विवेकबुद्धीची कक्षा वाढवून योग्य- अयोग्य यांतील फरक ओळखायला शिकायचं आहे.
आळसातून मुक्त होण्यासाठी तुम्ही आणखी काही पद्धतींचा अवलंब करू शकता.
जसं –
- ‘थोडं करा, पण आजच’ हे सूत्र कायम स्मरणात ठेवा. मन जेव्हा एखादं काम टाळू लागेल, तेव्हा त्याला याची अवश्य आठवण करून द्या. मग ते काम पूर्ण करणं जरी शक्य नसेल, तरी किमान थोडं का होईना, पण अवश्य करा.
- तुमच्याकडे कामांची मोठी यादी असेल, तर त्यातील न आवडणारी कामं आधी करा. कारण आवडती कामं तुम्ही नंतर सहजतया करून टाकाल.
- तुमचं मन बहाणे देऊ लागलं, की ‘माझा काम करण्याचा मूड नाही, म्हणून मी काम नाही करणार,’ तर अशा वेळी त्याला सांगा, ‘काम करू नकोस; पण मग इतरही कामं करू नकोस.’ कारण कित्येकदा मनुष्य काम टाळून मनोरंजन करणार्या इतर गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित करतो. म्हणून त्याला इकडे तिकडे भटकण्यासाठी संधीच देऊ नका.
- एखादं काम खूप कठीण आहे, म्हणून आळस येत असेल, तर त्या कामाची छोट्या छोट्या भागांत विभागणी करून त्यानुसार ते पूर्ण करा. असं केल्याने ते काम कठीणही वाटणार नाही आणि सहजपणे पूर्णही होईल.
‘इच्छा तिथे मार्ग’ असं म्हणतात ते अगदी खरं आहे. आळसातून मुक्त होण्याची इच्छा जागृत झाली असेल, तर मग त्यावर मार्गदेखील नक्कीच मिळेल… बस! त्यासाठी आवश्यकता असते, ती केवळ तो समजून घेऊन त्याचा स्वीकार करण्याची, त्यावर कार्य करण्याची.
चला तर मग, चांगल्या कामाला उशीर कशाला… नववर्षात प्रवेश करून, नवीन संकल्पांसह यशाचं द्वार उघडू या.
हॅपी थॉट्स, हॅपी न्यू ईअर!
Add comment